एखादया दिवशी मोबाईल घरी विसरुन आपण
ऑफीस/कामावर गेलो तर काय होईल? अनेकांना याची कल्पनाच करवत नाही. पण कधी कधी अस घडून जाते.
मुळात मोबाईल विसरणे शक्य नाही. कारण झोपेतून
उठण्या आधी म्हणजेच अलार्म वाजतो आणि तोच आपल्याला उठवतो. तिथून जी सुरुवात होते
ती अगदी झोपे पर्यंत पदोपदी आपल्याला त्याची सवय झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या आलेले
सोशल मिडीयाचे मेसेज वाचून सुरुवात होते. आवरा आवर करता करता अधून मधून मोबाईलकडे लक्ष जातेच. त्याच्या पोटा पाण्याची (चार्जींग) व्यवस्था करुन आपण आपल्या पोटापाण्याची सुरुवात करतो. तेवढयात आलेले कॉल घेतले जातात. किंवा केले जातात.
कामाला जायच्या आधी ट्राफीकची माहिती घेतली जाते. किंवा चालता चालता मोबाईल मध्ये डोकावणे सुरु असते. आपली
गाडी येई पर्यंत मोबाईलवर टाईमपास सूरुच असतो. कार्यालयात
/कामावर गेल्यावरही अधून मधून त्याच्यावर लक्ष असते. रस्त्यावरच्या फेरीवाल्यापासून तर उच्च पदस्थ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या हातात
तो असतो. अगदी भिक्षा मागणाऱ्या लोकांकडेही मोबाईल असतात असे
पाहणीत आढळते. प्रवासात जो-तो निमुटपणे
खाली मान घालून मोबाईलमध्ये घुसलेला असतो.
भारतात प्रवेश केल्यावर सुरुवातीला तो केवळ श्रीमंतांचाच
होता. आऊटगोईंग 16 रुपये आणि इनकमींग 8 रुपये. ज्याच्याकडे
होता त्यांनी त्या दिवसात खुप भाव खाल्ला. नंतर मोबाईलचे दर कमी
झाले. टेरीफ कमी झाले. आणि मग तो सर्वसामान्य
झाला. इतका झाला की अगदी लोकल ट्रेनमध्ये किंवा बस/टॅक्सी मध्येही तो ठणाणा करुन वाजू लागला. नविन नविन
रिंगटोनची क्रेझ आली. त्यानंतर चायना मोबाईलने हंगामा केला.
एकापेक्षा अधिक सीम आणि कॅमेरा असलेले मोबाईल तेही स्वस्तात भारतात आले.
स्पिकरचे मोठे आवाज सुरु झाले. मग काय सार्वजनिक
ठिकाणीही मोठया आवाजात गाणी लावली जायची. गाण्यांच्या आवाजाने
इतर हैराण होत. दणकट आणि टिकावू मोबाईलचा जमाना जाऊन नाजूक पण
अनेक पर्याय देण्याऱ्या मोबाईलचा जमाना आला.
इंटरनेटने बळावर मोबाईलची क्षमता वाढली. केवळ फोनची
सुविधा असलेल्या मोबाईलचा जमाना जाऊन मोबाईल स्मार्ट झाला. बँकेची कामे मोबाईल करु लागला. भाजीची जुडीचे पैसेही तो मोबाईलवरुन करु लागला. सुट्टया
पैशांचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. पैसे पाठवणे, घेणे सुरु झाले.
लग्नाच्या गाठी आणि ब्रेकअप समोरासमोर न येता होऊ लागले. नोकरीची बातमी हातात येऊ लागली. संधी उपलब्ध झाल्या.
केवळ ऐकू येणाऱ्या मोबाईल मधून व्हिडीओ कॉलने समोरची व्यकती दिसू लागली.
आणि हळू हळू केवळ संवादाची गरज म्हणून वापराचे उपकरण मुलभूत गरज होऊन
गेले. आजच्या घडीला मोबाईल न वारणारा व्यक्ती आउटडेटेड झाली..
हे लोण शहरापुरते मर्यादित न राहता खेडयापाडयात पोहोचले आहे.
मानवाचे जीवन अधिक सुकर होत गेले.
पण माणसा माणसातला संवाद कमी झाला. अनलिमीटेड व्हाईस कॉल, मेसेजेस, इंटरनेटच्या जगात माणूसाला प्रत्यक्ष संवाद
साधणे कमी झाले. टपरीवरचा चहा पीत मनसोक्त गप्पा मारता मारता
व्यक्त होणे कमी झाले. केवळ राहीले आभासी जग. मित्र सोशल मिडीयावर, नातेवाईक सोशल मिडीयावरच राहीले.
मोबाईने माणसाला खूप काही दिले. पण त्या बदल्यात
त्यांनेही माणसाकडून महत्वाचे घेतले आहे. वेळ नावाची अमूल्य असा
ठेवा माणसाकडून घेतला आहे. जीवन मरणाच्या खेळात मध्ये असतो तो
वेळ. जो आपण इतरांना देउुन, इतरांबरोबर
घालवायचा असतो. तो माणसाने मोबाईलला दिला. वापरणाऱ्याची माहिती त्याची आवड निवड, त्याचे नातेवाईक
सगळं. इतकेच काय त्याची मन:स्थिती,
त्याचा मुड सुध्दा जाणून घेतला. आणि त्याने माणसाला
गिऱ्हाईक बनवला.
जन्माला आलेल्या बाळाचा निरोप ते मृत्युची
बातमीची देवाण घेवाण करणारा मोबाईलने माणसाची जागा घेतली. माणसा माणसाची गरज कमी झाली. आता तर चक्क कृत्रीम बुध्दीमत्ता च्या सहाय्याने गप्पाही मारता येतात.
पण यंत्राशी. खरच माणसाने जन्माला घातलेल्या या
उपकरणाने माणसातला माणूस संपवला आहे का?

















