Pages

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

100 टक्के जर्म्स प्रोटेक्शन

 

100 टक्के जर्म्स प्रोटेक्शन




             आज सुट्टीचा दिवस. तोही हक्काचा दिवस. पण घरी असलं म्हणजे काम नाही अस होत नाही. घरातलं जिन्नस संपल होतं. त्यामुळे किराणा दुकानात जाणं भाग होते. सौ ने सगळी यादी करुन दिली. कोरोना जरी संपला असला तरी टीव्ही वर अधून मधून दिसायचा. त्यामुळे सौ ने आग्रहाने हँडवॉश 3 पाऊच आणायला सांगितलेले. मुले खेळून आल्यावर साबणाचा वापर करण्याकडे तिचा कटाक्ष.

              मी पायी पायीच चाललो होतो. निवांतपणे चालण्यातही मजा असते. आपल्या मनाप्रमाणे थांबून, निरखून हरवल्यागत चालायचे. जत्रेतील लहान मूला प्रमाणे. आजुबाजूचे जग कामात व्यस्त असताना त्यांचे निरीक्षण करण्यात खरचं मजा असते. आता कुणी आपल्याला बावळट म्हणोत किंवा वेंधळे. त्यानं काय फरक पडणार. मी मात्र मजा घेत चालत होतो.

        नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने केबल करीत खोदकाम चालु होते. त्यातून वाट काढत जाणारी माणसे. मोटारीचा खडखडाट. चुहू बाजुंना माणसांची लगबग. मध्येच ट्राफीक जाम. पिचकाऱ्या मारीत जाणारी माणसे. किंवा तोंडात मावा अगर गुटख्याचा चोबारा भरुन बोलण्याची कसरत करणारी माणसे. तर कुणी उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी छत्री घेऊन फिरणाऱ्या ललना. रोजच्या धावपळीत असं निवांत कधी निरखून पाहताच आले नाही.

           पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी माणसांची काय धडपड चालू असते. एका ठिकाणी मला मोबाईलचा स्टँड रस्त्यावर विकणारी बाई दिसली. त्यावर भाव काढणाऱ्यांचा घोळका. मी ही त्यात सामील झालो. तिने आजच्या दिवसाला पुरेल एवढाच माल आणला होता. अंगावर साधारण मळलेले कपडे. बाजूला तिचे साधारण 2 अडीच वर्षाचे बालक. रस्त्याच्या कडेला खणलेल्या मातीत पाय पसरून खेळत होते. काही गिऱ्हाईक तीला त्या मुलाकडे पाहण्याचा सल्ला देत होते. पण तीचे लक्ष आपल्या धंदया बरोबर मुलाकडेही होते.

           मी थोडासा विचार करीत पुढे निघालो. तेवढयात पुढच्या लिंक रोडचे काम चालु होते. तेथे धुळीने माखलेले काम करणारे बाई माणसे व गडी माणसे होती. शेजारी चार लेकरे होती. पुर्ण काळेकुट्ट झालेले कपडे. केसांपासून पाया पर्यंत मातीने भरलेले चेहरे.

            क्षणभर विचार आला. यांना कोरोना अगर जर्म्स चा प्रादुर्भाव होत नसेल का? कोणताही हँडवॉश अगर साबण न  वापरता त्यांचे कोण बरं रक्षण करीत असेल. असं कोणत कवच त्यांच्या भोवत विधात्याने त्यांच्या भोवती लपेटून ठेवलेय?

               परिस्थीती माणसाला घडवते. ते यालाच म्हणतात का? विचार करता करता उलगडा झाला. लाईलाजाने का होईना मातीशी जोडलेली नाळ त्यांना सुरक्षा कवच पुरवते. सतत निरनिराळया जर्म्स व बॅक्टेरीयाच्या संपर्कात आल्याने त्यांचे शरीर अंतर्गत अशी यंत्रणा उभी करते की त्यामुळे असे रस्त्यावरचे जर्म्सना ते भीक घालत नाहीत. अगदी अंदरसे मजबूत.

               आणि आपण मात्र आपल्या मुलांना माती पासून दूर ठेवतो. सतत साबणाने हात धुवायला सांगतो. स्वाभाविकच त्यांच्या शरीरातल्या यंत्रणेला कामच उरत नाही. मग काय जरा हवेत बदल झाला तरी शिंका सुरु. खरचं आपण प्रगत होतोय का? एवढं मात्र नक्की 100 टक्के जर्म्स पासून आपल्याला निसर्गच वाचवू शकतो. पटलं तर जरुर शेअर करा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा