Pages

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

दुखावणारी माणसं !!

दुखावणारी माणसं !!
काल एका कार्यक्रमाला गेले होते.कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता.प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका xyz व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं " अरे बाहेर अंधार आहे रे ,सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर ! " त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स  करून लोकांना काय माहित!! एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले कि कीव येते अगदी त्यांची ! बरं,हि माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!
हि अश्या प्रकारची माणसं समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत आणि बोलून झालं कि आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.
लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात  ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेलो होतो.एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे.... कुठे असतेस ,काय करतेस अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या " अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये ! " त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी  दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं " होय ,खरंय तुमचं ,काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो ! " माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!

ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बार का ह्या लोकांना कि समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे तरी विचारणार " असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोट्ठी नोकरी लागलेली दिसत्ये ! " हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.
लग्न लवकर न ठरलेल्या,मूल लवकर न होणाऱ्या , परीक्षेत,व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात ! रस्त्यात ,समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय  हि माणसं सोडत नाहीत !!
आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !! फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी ,कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना! माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? " हळू हळू,खुर्ची मोडेल " , " बापरे ,भूकंप झाला कि काय " " समोर बघून चाल , तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल ", " घसरू नको,रस्त्यात खड्डा पडेल मोठा ",
" जरा कमी जेव " किंवा " खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम  वाढून सागराला काय फरक पडेल ?" इ.इ.
कुणी अति बारीक असेल तर " फु केलं तरी उडशील " " नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?"इ इ
हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं पण हे सगळं दिसत नसतं.दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणार्यांची मुले जे दिवे लावत असतात त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो.परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं.पण... बोलायचं ... टोचायचं काम हि माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!
माझी चिपळूणची आजी ( आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता. ह्या विषयावरच आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली " समर्थानी सांगितलेलं आहे तसं वागावं म्हणजे काय तर 'नाठाळाचे माथी हाणू काठी 'स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं .!

---यशश्री भिडे

डिफॉल्ट मोड


डिफॉल्ट मोड

डॉ. यश वेलणकर

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??🤔🤔

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!

आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्कअसे नाव दिले आहे..!!

कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??🤔🤔

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!

आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!

त्यासाठीचा एक साधा उपाय करून पहा..!!

शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!

ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!

असा
अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि कळवा मला...!
 गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??

पिकलेलं प्रेम


पिकलेलं प्रेम

कधीही सगळ्यांसमोर आजीचा हात हातात न घेतलेले आजोबा ,

 आजीच्या हातदुखीचं आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे ४ वाजल्या पासून वाटतात,

आणि आजी उठल्या-उठल्या  "यांना" चहा लागतो असं म्हणत दुखरया हातानेच चहा टाकते...

आबांनी जेवणात लोणचं मागितलं की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीचं गोडलिंबाचंच लोणचं घालते...

एरव्ही दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे"
हे न सांगता
"आणि एक पोळी वाढ गं"
म्हणून पसंतीची पोचपावती देतात, अन फुगलेली पोळी वाढताना आजी  हळूच लाजते...

बाहेरून येताना पालकाच्या जुडीखाली एक मोगऱ्याची माळ लपलेली असते,
अन " केस कुठे उरलेत आता"
असं म्हणत त्या विरळ झालेल्या अंबाड्याचं वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत मळून, वाढवत असते...

आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी आजोबा आजही चोरून ऐकतात,
अन आजोबांनी आजीला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालूतुन डोकावताना दिसतं...

आजही आजोबांचे मित्र आले की  आजी आत जाते आणि न सांगता भजीची बशी सगळ्यांसमोर येते...

भाजी आणायला जेंव्हा आजी-आजोबा बागेजवळच्या मंडईत जातात,
 येताना कधी कधी मातीचे छापे धोतरावर  घेऊन येतात...

भांडण झालं दोघांच्यात की घरी  दुधीची भाजी बनते,
पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते...

कधीतरी आजोबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते आणि कपाटातून राजेश खन्नाच्या फोटो वरची धूळ पुसते...

दिवाळीला ओवाळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकंच कौतुक असतं आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत  आबा पण ताठ बसतात...

आजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते...

आजारपण मात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही,
मग ती झोपली की आजोबा हळूच तिचे पाय चेपतात अन आजीच्या बंद डोळ्यातून अश्रू घरंगळत उशीला भेटतात...

पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाही
अन बरणीला पण लोणच्याशिवाय आता करमत नाही...

नाती अशीही...


नाती अशीही...

गुंजन सोसायटीत पाचव्या मजल्यावर नवे कुटूंब आल्याची बातमी ज्येष्ठ नागरिक संघात पसरली आणि "हो का!" "कोणे कोणास ठाऊक" वगैरे संवाद रंगायला लागले..आधीच्या भाडेकरूंचे यथेच्छ गुणगान(?) करून झाले..पण नविन कोण आलय याचा मात्र उलगडा झाला नव्हता. दोन चार दिवसात एक मध्यम वयाची बाई-कम्-मुलगी, तीची दोन मुले, दोन म्हाता-या आणि दोन म्हातारे..असा कुटूंबविस्तार आहे असे कळले..पण नक्की नाव गाव कशाचा मागमूस न लागल्याने त्या उत्सुक संघात 'पराभवाचे बादल' घिरट्या घालू लागले..इतर वेळी सगळ्या बातम्या आधी फुटतात तिथे काहीच माहिती नव्हती.
पुढे तीन चार दिवसांनी ती मुलगी आणि तिची पिल्ले ही दिसेनाशी झाली.
ते दोन म्हातारे आजोबा एकमेकांची चेष्टा मस्करी करत जाता येता सोसायटीने पाहिले होते. त्या टापटीप आज्ज्या पण दुडकत दुडकत जाताना दिसल्या होत्याच..
"बहिणी वाटत नाहीत, नाई का हो देवस्थळी ?" पालव बाई म्हणाल्या.
"जावा जावा असतील..." चौधरींचा अंदाज.
"छे! ते दोघं बाप्ये भाऊ नाही हो वाटत" वगैरे निरीक्षण समोर आली.
शेवटी आपल्या बद्दलचे कुतूहल वाढतय हे त्या चौकडीच्या एव्हाना लक्षात आलं होतंच..
संध्याकाळी त्या दोन 'टापटीप बाया ' हळूहळू चालत सिनीयर लोकांच्या बाकाजवळ आल्या..

" नमस्ते, मी हेमा पटवर्धन! "
"आणि मी रंजना देशमुख!" दोघींनी एकदम आपापली ओळख करून दिली..म्हणजे जावा नाहीत..मग बहिणी असतील? पण साम्यही नाही अशी तर्कसंगती सभासदांची मनात मांडायला सुरवात झाली..ते ओळखून दोघी मनापासून हसल्या..." तुम्ही विचार करताय की आम्ही एकमेकींच्या कोण? हो ना? आम्ही विहीणी आहोत.."
सगळे एकदम गार..तमाम तर्क ,अंदाज यांना गुंगारा देऊन भलतच उत्तर आले..
"आम्ही बसू का इथे तुमच्याबरोबर? " हेमा ताई म्हणाल्यावर ओशाळून "अरे हो की.." "या ना बसा ना.." असे स्वागत झाले.
रंजना ताईंनी आता सूत्र आपल्या हातात घेतली.. " माझ्या एकुलत्या एक मुलीने यांच्या एकुलत्या एक मुलाशी लग्न केल बारा वर्षांपूर्वी.. दोघेही भरपूर शिकलेली...जसे पंखात बळ आले तशी परगावी भुर्र्कन उडून गेली. पहिली काही वर्षे छान कौतुकात गेली...पण आमच्या नोक-या संपल्यावर विचित्रच एकाकीपण आले.." आलेला हुंदका गिळायचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला..त्यांना थोपटत..
हेमा ताई म्हणाल्या " मुले गुणी आहेत हो..बोलवत असतात पण इथले सोडून जावे हे ही नाही जमत..
एकदा यांच्याकडे आम्हाला जेवायला बोलावले होते..निघताना माझा पायच मुरगळला..हलताच येईना..त्यांच्या आग्रहाखातर आम्ही तिथेच रात्री रहायचे ठरवलं.. "
त्या दोघींना जसे घडले तसे आठवू लागले..आज आजारी का होईना कोणीतरी रहाणार आहे याचा पटवर्धन दांपत्याला फारच आनंद झाला..दुसरी बेडरूम उघडली, नव्या चादरी-उशा काढल्या.. आपल्या बेडरूममधे सुद्धा नविनच बेडशीट घातली..'कोणीतरी आहे'चा आनंद होता..घरात जाग होती.

"एकाचे तीन दिवस राहिलो तिथे.." निघताना दोघी रडलो..त्या रडण्यामुळे आमचा इथवर प्रवास झाला. "आम्ही इथलेच गावात वाड्यात रहातो..म्हणजे आमचाच आहे वाडा... आणि यांचा फ्लॅट आहे पण तिस-या मजल्यावर... वाड्याची जागा तशी जुनीच...त्यातून वाढलेली वर्दळ..."
"आणि आमच्या घराचे जीने..ह्या दोन अडचणीमुळे आम्ही एका घरात राहू शकत नव्हतो म्हणून गावाबाहेर ऐसपैस जागा घेऊन एकत्रच रहावे असे आमच्या मनात आले"

"एकत्र राहिलो तर चार घास जास्त जातात, वेगवेगळे पदार्थ केले जातात, रात्री बेचैनीत जात नाहीत, असे लक्षात आले आणि आम्ही चौघांनी एकत्र च राहू असा विचार केला. नक्की कोणाच्या मनात आधी आले माहिती नाही..पण चौघांच्या मनात होतच.
आता वयाच्या या टप्प्यावर कोणते मतभेद आणि कोणती मानापमानाची नाटके? शिवाय आम्ही एकत्र असलो तर मुले ही निर्धास्त असा व्यावहारिक विचार करून मुलांना विश्वासात घेऊन ह्या निर्णयावर आलो..मुले तर खुशच झाली..सोबत मिळाली..
आता या ऐसपैस घरात आम्ही चौघे राहू, एकमेकांना सांभाळून."

हे ऐकून सगळ्या आज्यांच्या डोळ्यात पाणी आले..
"याला म्हणतात खरा सोयरा..जो सोय जाणतो तो.." शेवडे आजी बोलून गेल्या.. आणि टाळ्यांच्या गजरात दोन नव्या मैत्रिणींचे ग्रुप मध्ये स्वागत झाले!!💞


- सौ. अनघा किल्लेदार.

गुरुवार, २८ मार्च, २०१९

"सोबत"...



"सोबत"...

आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?
ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
 "स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
 "आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते.

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं.

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं.

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते...

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.
आणि सोबत छंदांची जोड....

आयुष्य नक्कीच परिपूर्ण होईल...!

पॉवर ऑफ चॉइस



पॉवर ऑफ चॉइस
सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत यानी  सांगितलेला हा किस्सा आहे.
-----------------------
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’
मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती.

वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ कॉफी आहे!’

मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’

काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’

मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.

माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’
मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली.

आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही वासु म्हणाला.
मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’

वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस बद्दल कळले!

पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले वासु म्हणाला

आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजुबाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.
झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

गरुड व्हा, बगळा होऊ नका !

वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का ?
🙏🙏 B+tive...

आरसा


  आरसा
.        (एक बोध कथा)

.         एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात.

विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.

रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला.

त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले.

शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला.

गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’

गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले.

गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास,

अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता.

मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’

तात्‍पर्य : आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा