Pages

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे. म्हातारे नाही.....!


 click on image

माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे. म्हातारे नाही.....!
-------------------------------- 
एक मनोगत
••••••••••••••••

आई किंवा वडील किंवा दोघंही - अत्यंत हट्टी आणि Troublesome ठरणं...त्यांचं सुनेला आणि मुलालाही जीव नकोसा करणं ह्याचा परिणाम म्हणून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होणं - अशीही काही घरं आहेत.

कित्येक घरात, आई सुनेला स्वयंपाकघराचा संपूर्ण ताबा द्यायला नाखूष असते. सून त्या योग्यतेची असूनही.
तर बापसुद्धा "तुला काय कळतंय"असं मुलाला म्हणत, आपल्याच काळात वावरत असतो. त्या घरातल्या मुलांनी काय करावं ? मुलगा व सून (सालस असूनही), उत्तम प्रकारे नोकरी करत असतात व उदंड पैसे घरात आणत असतात, तरी त्यांना 'आपल्या काळी असं नव्हतं' म्हणून आपल्याच तालावर नाचवायचं, हे कितपत बरोबर आहे.....?
नीट आजुबाजूला पाहिलं तर अशी घरं खूप दिसतील.
अर्थात प्रत्येक घरात जाऊन, प्रत्येकाशी बोलून, त्यांचे खरे प्रॉब्लेम्स समजतीलच असं नाही, पण अंदाजाने ३०% आईवडील त्यांच्या अहंकारी वागण्यामुळे खरोखरच वृद्धाश्रमात ठेवण्याच्या योग्यतेचे असतात, हे नाकारून चालणार नाही. बरेचदा केवळ 'लोक काय म्हणतील' या विचारांनी ती मुलं आपापल्या आई/वडिलांना कसे तरी, मन मारून, सहन करत सांभाळत असतात. तेव्हा नाण्याला दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. दरवेळी मुलानांच दोष देऊन मातृपितृ प्रेमाचे कढ समाजाने काढणे कितपत योग्य आहे...?

जवळजवळ प्रत्येक माणसात एक अवगुण लपलेला असतो . तो म्हणजे, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. हा अवगुण तेव्हाच ठरतो, जेव्हा ती व्यक्ती, दुस-या कोणालाही, आपली जागा घेऊ देत नाही तेव्हा. मग ते घर असो, ऑफीस असो, दोन माणसातलं नातं असो किंवा दुसरी व्यक्ती आपली अपत्य असोत. सख्खी आई सुद्धा, मुलीशी जमवून घेत नाही. बाप सुद्धा, मुलगा जर जास्त हुशार निघाला तर मुलाचा दुस्वास करतो. आणि हे उघड उघड नसतं, ते केवळ त्याच व्यक्तीलाच समजतं. म्हणून ते दु:ख दुस-यालाही सांगता येत नाही... सांगून समजत नाही. पण ज्याचं जळतं त्यालाच ते कळतं.

यावर उपाय म्हणजे दोन्ही पिढयांनी अहंगंडाच्या आहारी न जाता दोन दोन पावलं मागे येण्याचा समजूतदारपणा दाखवला तर प्रश्न सुटण्यास मदत होईल.

वय वाढणे हा निसर्गक्रम आहे म्हणून आपण स्वत:ला ‘आता आपण म्हातारे झालो असे म्हणू नका. ज्येष्ठत्व व म्हातारपण यांतील फरक समजून घ्या.

* म्हातारपण इतरांचा आधार शोधीत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते.

* म्हातारपण लपवावेसे वाटते, तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते.

* म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते, तर ज्येष्ठत्व अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी असते. विचारले तरच ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते वा सुचविते.

* म्हातारपण जीवनाच्या संध्याछायेत मरणाची वाट पाहत दिवस काढते, तर ज्येष्ठत्व संध्याछायेत उष:कालाची वाट पाहत बालांच्या क्रीडा, तरुणांचे दीपवणारे कर्तृत्व कौतुकाने पाहत आनंदाने, समाधानाने जीवन जगते.

* म्हातारपण तरुणांच्या जीवनात लुडबुड करते, तर जेष्ठत्व तरुणांना त्यांच्या मताप्रमाणे जगण्याचा अवकाश देते.

* म्हातारपण 'आमच्या वेळी असे होते...' अशी किरकिर लावते, तर जेष्ठत्व बदलत्या काळाशी जुळवून घेते.

* म्हातारपण आपली मते तारुणाईवर लादू पहाते, तर जेष्ठत्व तरुणाईची मते जाणून घेते.

* म्हणूनच ज्येष्ठांनो, मानाने, आनंदाने, समाधानाने जगा. तुमचा अनुभव व ज्ञान सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाला  आणि समाजाला द्या.म्हातारे होऊ नका तर जेष्ठ व्हा.

* चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी कपाळावर (नापसंतीच्या आठय़ा) स्पीड ब्रेकर्स पडू देऊ नका. आपली दु:खे उगाळीत बसू नका. मितभाषी व्हा. जीवन आनंदी व सुंदर आहे. जगाबरोबर जगण्याचा प्रयत्न करीत राहा.

मित्रांनो, प्रत्येक घरातील जेष्ठांनी असे राहायचा प्रयत्न केला तर संध्याछायांना न भिता त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांनाही समृद्ध जीवन जगता येईल, आणि त्यांच्या जीवनात आनंदाचा झरा वाहू लागेल, हे निश्चित....!

व्हाटस्ॲप वरून.



रविवार, ९ डिसेंबर, २०१८

कंडक्टर....


मला भावला, म्हणून पाठवला...

कंडक्टर....

आज बऱ्याच दिवसांनंतर बार्शी ते पांगरी असा एस. टी. चा प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर, तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहून बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातून माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले, आता कंडक्टर येऊन तणतण करतोय की काय; पण झाले उलटेच!
त्या दरवाज्यातून काका, मामा, दादा थोडी जागा द्या! असं म्हणत एक ऐन पंचविशीतले कंडक्टर गाडीत चढले.
गाडी तर माणसांनी भरून वाहत होती. अशात कंडक्टर सीट तरी थोडीच रिकामी राहणार?
तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या! कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या. तेवढ्यात कंडक्टर बोलले, "बसा आज्जी, मी उभा राहतो". मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशीनवर बटने दाबून लगेच तिकीट फाडून ते म्हणाले, "द्या तेवीस रूपये"! माझ्याकडे तर बरोब्बर बावीस रूपयेच होते. एक रूपया शोधून सापडेना! तेव्हा कंडक्टर मला म्हणाले, "राहू द्या, नसला तर मी भरतो"!
त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहून मी सुखावलो. एकूणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमीटरच्या प्रवासात जाणवली. इथून तिथून माझ्यासोबतच उभे राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना "साहेब, एक सेल्फी काढू द्याल का, तुमच्या सोबत" असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले!
मी सर्वांना सांगितले, "असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो, म्हणून सेल्फी काढतोय!" सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रवासाचा शीण निघून गेला. गाडीतून खाली उतरून दरवाजा ढकलला, तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जीवन प्रवासात असाच आनंद देत-घेत आलोय म्हणूनच या प्रेमाचा हकदार झालोय!
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल, पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस. टी. ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, क्लीनर्सचे खूप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहून जास्त ग्रामीण भारत यांच्याच जीवावर इकडून तिकडं अन् तिकडून इकडं फिरतोय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजूनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला!
तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यांतून गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला, तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वाहायचे आणि यातूनही प्रवासी देवो भवः म्हणायचे!
खरंच हे ग्रेट आहे.
विषय एक रुपयाच्या मदतीचा नव्हता, ती करण्यामागच्या वृत्तीचा होता.
विषय सीटवर बसण्याचा नव्हता, तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता.
विषय हक्काच्या जागेचा नव्हता, तर हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता.
विषय तिकिटाचा नव्हता, तर ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता.
विषय सेल्फीचा नव्हता, तर आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता.
विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, तर एका माणसाच्या माणुसकीचा होता!
                                           
                                          लेखक अनामिक 


मायेचा ओलावा


मायेचा  ओलावा

सहलीची सूचना वर्गावर्गातून फिरली होती.सहलीला येणा-या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांकडे नावे येत्या शनिवार पर्यंत द्यायचीहोती.सहलीला प्रत्येकी दोन हजार रुपये खर्च येणार होता.शाळेतील मुलामुलींनी आपापली नावे द्यायला सुरुवात केली होती.सातवीतील गौरीची सहलीला जायची खूप ईच्छा होती.
सहलीला जाऊन नवीन ठिकाणांची माहिती मिळवावी.प्रेक्षणीय स्थळे डोळे पाहण्याचा आनंद घ्यावा असे तिला वाटत होते.शाळेतून घरी आल्यावर तिने आईजवळ सहलीला जायचा हट्ट धरला.
आई,मला सहलीला जायचं आहे.माझ्या वर्गातील सर्वच मुलेमुली जात आहेत.” असा सूर काढत गौरी हिरमुसून बसली.आजपर्यंत तिने कधीच काही आग्रहाने मागितले नव्हते.जे खायला मिळाले ते खाल्ले.
जसे कपडे आणले तसे कपडे घातले.दुस-यांनी वापरून टाकलेले कपडेसुध्दा आनंदाने परिधान केले.जुन्या वह्यांची उरलेली पाने शिवून अभ्यासासाठी वापरली.बाजारातील जुन्या पुस्तकांना कधीच नावे ठेवली नाहीत.
वर्गातील,शाळेतील मुलामुलींशी अभ्यास सोडून इतर बाबतीत कधी स्पर्धा केली नाही.शाळेतील सर्वात हुशार व समंजस विद्यार्थीनी म्हणून शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी तिची पाठ थोपटली होती.आई काळजीत पडली.
दोन हजारांची सोय कशी लावायची याचा विचार करू लागली.मोलकरीणीचे काम करून कसेबसे पोट भरता येते.शिल्लक चोचले पुरवता येत नाहीत.हे तिला ठाऊक होते.एकुलत्या एका लेकीला सहलीला पाठवायचा निर्धार तिने केला होता.लेकीचा बाप जिवंत असता तर त्याने गौरीला सहलीला पाठवलेच असते.
एक-दोन घरी हातउसणे मागितले पण काही फायदा झाला नाही.पैशांची काहीच सोय लागत नव्हती.काय करावे तिला काहीच सुचत नव्हते.घरातील लाकडाच्या जुन्या पेटीजवळ ती हतबल होऊन बसली.गौरीच्या आईला कोणताच उपाय सापडत नव्हता.
नवरा देवाघरी जाऊन आठ वर्षे उलटली होती पण चार सोन्याचे मणी अन् एक पदकाचे मंगळसूत्र तिच्या डोळ्यासमोर तरळले.तिने पेटीतून मंगळसूत्र काढले.साडीचा पदर कमरेत खोसला.लगबगीने सोनाराचे दुकान गाठले.
सौभाग्याची आठवण म्हणून जपलेली वस्तू काळजावर दगड ठेऊन मोडली अन् दोन हजार रुपये आणले.सकाळी गौरीला शाळेत जाताना पैशे द्यायचे असे तिने ठरवले.सकाळ झाली.कामाला जाण्याआधी आईने गौरीच्या हातात दोन हजार रुपये ठेवले.
आई कामाला निघून गेली.गौरीला पैसे मिळाले.तिला खूप आनंद झाला.आईने एवढे पैसे कुठून आणले असतील? हा प्रश्न तिला पडला. आपणास सहलीला जायला मिळणार असल्याने तिने भरभर कामे आटोपून शाळेत जायला निघाली.
तिने नीशाला शाळेत सोबत चालण्यासाठी आवाज दिला.दोघी शाळेकडे निघाल्या.सहलीला येत असल्याची बातमी तिने नीशाला सांगितली.नीशालाही आनंद झाला.”काल संध्याकाळी तुझी आई माझ्या घरी आली होती.माझ्या बाबांनी तुझ्या आईला पैसे दिले.”नीशाचे बोलणे ऐकून गौरी सुन्न झाली.
गौरीच्या अंगातील त्राण संपला.डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले.नीशाला शाळेत जायचे पुढे जायला सांगून ती मागे परतली.थेट सोनार काकाच्या घरी पोचली.
काकांशी अदबीने बोलली.चौकशी केली.मंगळसूत्र मोडून आईने आपल्यासाठी पैसे आणल्याचे तिच्या लक्षात आले.आईचे समर्पण,त्याग समजण्याइतकी ती मोठी झाली होती.
तिने विनवणी करून मंगळसूत्र परत घेतले.पैसे परत केले.संवेदनशील गौरीचा समंजसपणा पाहून काकांनाही नवल वाटले.शाळा आटोपून गौरी घरी आली.आई स्वयंपाक करत होती.भाजी शिजली होती.
भाकरी थापणे सुरू होते.तव्यावरची भाकर काढली. चुलीतील आर बाहेर काढला.भाकर शेकायला ठेवत गौरीला विचारू लागली.”भरलेस काय गं,सहलीचे पैसे? कधी जाणार आमची लाडोबाई सहलीला?” गौरीने आईकडे नजर टाकली.तिच्या पापण्या नकळत भिजल्या.आपसुकच ती आईच्या कुशीत शिरली.रडायला लागली.
“का रडतेस,काय झालं?” असे विचारताच तीने सहल रद्द झाली म्हणून सांगितले.
आईने पदराने गौरीची आसवे पुसली.
गौरीने रडत रडत आईचे मंगळसूत्र आईच्या हातावर ठेवले.हातात मंगळसूत्र बघून आईने गौरीला घट्ट मिठी मारली.
दोघीही ‘मायलेकी एकमेकींना घट्ट पकडून रडू लागल्या.



शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका


“उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका !”

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत अंथरुणात लोळत पडणे, मग पुढे चार वाजता आंघोळ करणे, संध्याकाळी सहा वाजता जेवणे (या दरम्यान मोबाईल हाताशी असतोच), रात्री साडे आठ-नऊ च्या सुमारास घराबाहेर पडणे आणि साधारणपणे पहाटे तीन-चार च्या सुमारास घरी येणे अशा दिनक्रमात ही मुलं-मुली जगतात. “दहावीपर्यंत बरं चाललं होतं पण काॅलेज सुरू झाल्यापासून सगळीच अवस्था बिकट झाली असा सगळ्या पालकांचा सूर असतो.

ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच सेमिस्टर परीक्षेत सगळ्या विषयांमध्ये नापास झालेल्या एका मुलाने मागच्या सहा महिन्यांमध्ये क्लासेसच्या नावाखाली दीड लाख रूपये पालकांकडून घेतले आणि क्लासेस न लावताच ते पैसे गर्लफ्रेंडवर खर्च केले. शिवाय पाॅकेटमनी च्या नावाखाली जवळपास ७५ हजार रूपये घेतले. पालकांनी एवढा खर्च केलाच, शिवाय काॅलेजची फी भरली, ती वेगळीच. एका मध्यमवर्गीय कुटुंबात हे घडतं, यावर आता विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. 

डोक्यावर रंगवलेल्या केसांचं टोपलं, विराट कोहलीसारखी राखलेली दाढी, छप्पन्न सेंटीमीटर (इंच नव्हे) छाती, भडक कपडे, फाटक्या जीन्स, पायात मरतुकड्या स्लीपर्स, तोंडात मावा किंवा सिगारेट धरलेली अशी तीन-तीन पोरं एकाच स्कूटरवरून मोठ्यानं हार्न वाजवत गावभर उंडारत फिरत असलेली आपल्यापैकी अनेकांना दिसत असतील. चार दिडक्यासुद्धा कमावण्याची अक्कल नाही पण तरीही गाड्या उडवत फिरणारी टाळकी सध्या उदंड झाली आहेत. अशाच एका मुलानं आज स्टंट करण्याच्या नादात एका गर्भवती महिलेला जोरात धडक दिली. त्या मुलाच्या मागे एक तंग कपड्यांतली मुलगी नको तितकी चिकटून बसलेली होती, आणि बहुतेक दोघेही भर दिवसा झिंगलेले होते. आजूबाजूची माणसं धावत येईपर्यंत दोघेही पसार झाले.

पोकर खेळणे, अनिर्बंध नाईट लाईफ जगणे, बेटींग करणे यात गुंतून पडलेली अनेक मुलं-मुली पाहण्यात येतात. एखादी वीस-बावीस वर्षांची मुलगी दिवसाकाठी पंधरा-वीस सिगारेटी व्यवस्थित ओढते, हे आता कॅज्युअल झालं आहे. हुक्का पार्लर्समध्ये १७-१८ वर्षांची मुलं-मुली दिवस घालवताना दिसत आहेत. दिवसभरात खाण्यापिण्यावर, पेट्रोलवर, व्यसनांवर दोन-तीनशे रूपये तर सहजच उडवणाऱ्या मुलां-मुलींची संख्या समाजात वेगाने वाढते आहे, यावर पालकांनी सीरियसली विचार करण्याची गरज आहे.

खरं तर सांगू नये, पण सांगतो. पालक हाॅटेलमधली जेवणं, खरेदी, वाढदिवस, परदेशी सहली यात रस घेतात, पण मुलांच्या प्रश्नांकडे जितकं आणि जसं लक्ष द्यायला हवं, तसं देत नाहीत. माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबाने दुबई ट्रीपसाठी साडेतीन लाख रूपये खर्च केले, पण मुलगी सलग दोन वर्षं बारावीत नापास झाली, काॅलेजमधल्या एका मित्राबरोबर लग्न करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला, घरातून अनेकदा पैसे चोरले, घरचे दागिने गायब केले, पण तिच्या काॅलेजमधल्या शिक्षकांना भेटायला जाण्यासाठी पालकांकडे वेळ नाही आणि काऊन्सेलरची अपाॅईंटमेंट म्हणजे वायफळ खर्च असं त्यांना वाटतं.

आपण आपल्या मुलांना गाडी, मोबाईल फोन, लॅपटाॅप, इंटरनेट, स्वतंत्र खोली, पाॅकेटमनी या गोष्टी का आणि किती प्रमाणात देतो, यावर पालक काही विचार करतात का? पुष्कळ पालकांकडे या प्रश्नांची उत्तरंच नसतात. आधुनिक आणि तथाकथित ‘सुजाण पालक होण्याच्या शर्यतीत भावना,संस्कार मागे पडतात आणि या वस्तूच पुढे जातात.
इन्स्टंट गोष्टींचा जमाना आला आहे. मुलं आणि पालक दोघांनाही सगळ्याच गोष्टी इन्स्टंट आणि रेडिमेड हव्या असतात. त्या तशा मिळत नाहीत, म्हणूनच मग शेवटी फरफट सुरू होते आणि सगळं कुटुंबच अस्वस्थ होतं. सगळ्या गोष्टींना पैशाची आणि श्रीमंतीची गणितं लागू करण्याचा प्रयत्न पालक जाणते-अजाणतेपणी करायला लागतात, तिथंच त्यांच्या मुलांमध्येही हीच वृत्ती रूजली तर, त्यात नवल वाटण्याचं कारणच नाही.

शेवटी काय, उंबऱ्याच्या आतलं जग बिघडलं की, सगळंच बिघडतं..! वेळीच शहाणपण आलेलं l


शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

"बाप"


"बाप"


मॅक दाते नावाची एक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट मयुरेशनी फेसबुक वर एक्सेप्ट केली. रोजचे बोलणे चालू झाले.
हाय- हॅलो चे बोलणे काही दिवसातच पर्सनल प्रॉब्लेम्स शेअर करण्यापर्यंत वाढले आणि फेसबुकवर एक घट्ट नाते मयुरेशला मिळाले.

मयुरेश - साधारण विशी - बाविशितला मुलगा. खूप काही करण्याची तडफड, जिद्द पण त्याच बरोबर काहीसा उद्धट. सोशल जग एवढं की घर आणि कुटुंब ह्यांना वेळ न देऊ शकणारा. बापाला कधीही समजून न घेणारा. सतत आरे ला कारे करणारा हा तरुण.

मॅक दाते - ५०शितला एक पुरुष पण तरीही आजच्या तरुण पिढी प्रमाणे सोशल असणारा. इन्फोसिस मध्ये टॉप चा इंजिनिअर.

कदाचित ही वयातली तफावत सुद्धा मयुरेशला त्याच्या जवळ खेचत असेल. मॅकला मयुरेश समजायला मदत करत असेल. कारण काहीही असो; अल्पावधीत ते दोघे खास झाले हे मात्र खरे!

मयुरेशला काहीही नवीन करायचे असो; तो पहिले मॅकशी चर्चा करणार मग घरी वडिलांकडे पैसे मागणार. मग ते जिम असो, चेसचा क्लास, मुवी की अगदी एखादी पार्टी असो.

फेसबुकच्या फ्रेंडशी मॅकशी बोलणं झालं की बाबाही पटकन होकार देतात हे मयुरेशला कळु लागलं परिणामी तो मॅक शी अजून जास्त जवळीक साधू लागला.

११ फेब, २०१७ चा दिवस. संपूर्ण जग आपापल्या व्हॅलेंटाईन बरोबर १४ फेब प्लॅन करत असते. एखादीला विचारावे कसे हा प्रयत्न करत असते तेंव्हा मयुरेश मागे कसा असेल???

त्याने ही गोष्ट मॅकला सांगायचे ठरवले. ठरल्या वेळेला फेसबुकवर येऊन मयुरेश मॅक शी गिरिजा बद्दल सांगितले. पहिले खूप वेळ काहीच रिप्लाय आला नाही. बिझी? बिझी? म्हणून ४ मेसेज गेले तेंव्हा कुठे मॅक चा रिप्लाय आला.

गो अहेड. घाबरु नको. दिल खोलके रख मेरे शेर. वर एखाद दोन कॅफे ची नावेही सजेस्ट केली. दिल खुष. थॅन्क्स म्हणून; गिरिजाला विचारायचा निर्धार करून मयुरेश ऑफ लाईन जातो.

दुसऱ्या दिवशी बाबांना व्हॅलेंटाईन डे साठी पैसे मागतो तोच बाबा म्हणतात; काय गरज?? अभ्यास करा.. फालतू पार्ट्या. कसली प्रेम करता?? कोण आहे मुलगी सांग.. घरी घेऊन ये. हे असले बाहेर भटकणे बरोबर नाही.

तोच एक भडका उडतो. "काय बाबा; फालतू आहात तुम्ही. आमचं वय आहे सगळं एन्जॉय करायचं. इथे एक गोष्ट मिळत नाही प्रेमाने .. लगेच.."
"हो ना; चेस, जिम साठी भिकाच मागतोस ना जसा. या घरात राहीचे असेल तर नीट बोलायचे"
"जातो हे घर सोडून. तुमच्यापेक्षा तो मॅक बरा. तुमच्याच वयाचा. पण बघा कसे फेसबुक वापरतो. एंकरेज करतो. सतत नाही नाही म्हणत. नाहीतर तुम्ही. पिढी बरोबर चालणे माहीत नाही का काही नाही... हाड!"
"हो??? कसा दिसतो रे हा मॅक? काय करतो काय??
मयुरेश एकदम ऐटीत सांगतो; "इन्फोसिस ला आहे. प्रोफाइल पिक्चर नाही ठेवला आहे सो माहीत नाही कसा दिसतो. पण विचार जुळतात. विचार जुळायला चेहरा माहीत असणं गरजेचं थोडी असते.. काय?"
बाबा शांत होऊन; " हो तर, ते पाहतोच आहे की. पोटचा गोळा पण एक विचार जुळतो आहे का बघ. काय आडनाव या मॅक चे? ख्रिसचन वाटतो."
"नाही, कोकणस्थ आहे. दाते आहे. आपलाच. सेम आडनाव... मॅक दाते. "
"दाते असून, पन्नाशीच्या आसपास असून हे असले विचार? फुस लावतो तुला??"
"तुम्हाला फुस च वाटणार. पिढी बरोबर बदलणे आहे अहो ते. सगळ्यांना नाही जमत..."
"काय पिढी पिढी बोलतो आहेस रे सारखा. आम्ही जन्माला घातलं म्हणून आली ही तुमची पिढी. त्याचीच भीती दाखवतो सारखा? आहे काय तुमच्या पिढीत?? सतत अर्ध्या चड्या घालून हिंडायचे, हा मित्र - तो मित्र. घरात पाय टिकतात का तुमचे??
"झाले चालू.." " हो.. ऐक. घरात चकार शब्द बोलायचा नाही. सतत मोबाईल, प्रोजेक्ट, मित्र. सतत बाहेरचे लोक. ह्यात तू; तुझी पिढी एवढे गुरफटला आहात की घरच्यांना काय हवं आणि नेमके तुम्हाला काय हवे कळणार कसे रे??? तो मॅक ढीग गप्पा मारेल. पैसे घ्यायला तर बाप लागतो ना?? आणि एवढा मूर्ख झाला आहेस तू ह्या बाहेरच्या जगात सतत राहून की लोकांच्या गर्दीत घरच्यांनाही ओळखत नाहीस तू..."
"काहीही बाबा. डोळे दिलेत मला देवांनी.. ओळखणार कसा नाही.. मुळात.."
"हो? डोळे दिलेत?? मग ओळखले मॅकला? मॅक दाते.. आपल्यातलाच.. सेम आडनाव. इन्फोसिस. पन्नाशीच्या आसपास.. वर तोंड करून सांगतोस.."
मयुरेश आवाक होऊन; "बाबा....!"
एका क्षणात डोळे पाणावतात. " काय सांगू? अवाक्षर बोलत नाहीस घरात. बाप वडीलधारी असला तरी मित्र ही असतो. एवढी तर तुमची पिढी माहीत आहे मला. अंगीकारले आहे मी. पण तू नवी पिढी करत ह्या मित्राला विसरलास.. काय करणार मग?? केलं लॉग इन फेसबुकला. म्हंटले इथून जाणून घेऊ मुलाला. तू एवढेही डोके नाही लावले की आपण जेंव्हा जेंव्हा लॅपटॉप उघडतो तेंव्हा तेंव्हा वडील मोबाईल घेऊन बसतात. तेवढेही निरीक्षण नाही घरच्यांचे. सगळी उमेद दिली. आवडले मुलाचे विचार. गिरिजा बद्दल सांगितलस तेंव्हा आधी तिची प्रोफाइल चेक केली. काय करते मुलगी; कशी दिसते. मग तुला रिप्लाय दिला. काय दुर्दैव आहे हे की मुलाचा वेळ मिळायला फेसबुकचा आधार घ्यावा लागला... "
मयुरेश रडू आवरत; " सॉरी बाबा. "
प्रेमाने जवळ घेत बाबा एकच सांगतात मयुरेश ला -
"बेटा, कोणीही बाहेरचं तुला समजून घेणार नाही का नवी उमेद देणार नाही. जगात फक्त दोनच व्यक्ती ते काम आपलं समजून करतात एक गुरू आणि दुसरं .... ' घर '!!!"
मयुरेश मिठी मारत " मी नेहमी लक्षात ठेवीन बाबा."
बाबा हसत; " बाकी काही नाही एवढं लक्षात ठेव... ' हम तुम्हारे बाप हैं!"...

दोघं हसत हसत गिरिजाचे फोटो बघतात. फेसबुकवर नाही. मयुरेश च्या मोबाईल मधले...!

- अनुराज.


क्षणीक मोह


क्षणीक मोह

एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.
कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.
पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.
पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले, "भाऊ...!!"
तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."
कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?" पुजारीबाबा हो म्हणाले.
त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.
पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''
🌀 तात्पर्य ::~
स्वार्थ,मोह हा वाईट असतो*, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो.त्यामुळे नेहमी प्रामाणिक रहा.


सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

सकारात्मक विचार

सकारात्मक विचार

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
 नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.

नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली. 
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. 
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,

बुध्दांना हेच सांगायचे होते की, जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा.

मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत ....😊
👍 So Be Positive !

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा