Pages

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

मायेचा ओलावा


मायेचा  ओलावा

सहलीची सूचना वर्गावर्गातून फिरली होती.सहलीला येणा-या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांकडे नावे येत्या शनिवार पर्यंत द्यायचीहोती.सहलीला प्रत्येकी दोन हजार रुपये खर्च येणार होता.शाळेतील मुलामुलींनी आपापली नावे द्यायला सुरुवात केली होती.सातवीतील गौरीची सहलीला जायची खूप ईच्छा होती.
सहलीला जाऊन नवीन ठिकाणांची माहिती मिळवावी.प्रेक्षणीय स्थळे डोळे पाहण्याचा आनंद घ्यावा असे तिला वाटत होते.शाळेतून घरी आल्यावर तिने आईजवळ सहलीला जायचा हट्ट धरला.
आई,मला सहलीला जायचं आहे.माझ्या वर्गातील सर्वच मुलेमुली जात आहेत.” असा सूर काढत गौरी हिरमुसून बसली.आजपर्यंत तिने कधीच काही आग्रहाने मागितले नव्हते.जे खायला मिळाले ते खाल्ले.
जसे कपडे आणले तसे कपडे घातले.दुस-यांनी वापरून टाकलेले कपडेसुध्दा आनंदाने परिधान केले.जुन्या वह्यांची उरलेली पाने शिवून अभ्यासासाठी वापरली.बाजारातील जुन्या पुस्तकांना कधीच नावे ठेवली नाहीत.
वर्गातील,शाळेतील मुलामुलींशी अभ्यास सोडून इतर बाबतीत कधी स्पर्धा केली नाही.शाळेतील सर्वात हुशार व समंजस विद्यार्थीनी म्हणून शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी तिची पाठ थोपटली होती.आई काळजीत पडली.
दोन हजारांची सोय कशी लावायची याचा विचार करू लागली.मोलकरीणीचे काम करून कसेबसे पोट भरता येते.शिल्लक चोचले पुरवता येत नाहीत.हे तिला ठाऊक होते.एकुलत्या एका लेकीला सहलीला पाठवायचा निर्धार तिने केला होता.लेकीचा बाप जिवंत असता तर त्याने गौरीला सहलीला पाठवलेच असते.
एक-दोन घरी हातउसणे मागितले पण काही फायदा झाला नाही.पैशांची काहीच सोय लागत नव्हती.काय करावे तिला काहीच सुचत नव्हते.घरातील लाकडाच्या जुन्या पेटीजवळ ती हतबल होऊन बसली.गौरीच्या आईला कोणताच उपाय सापडत नव्हता.
नवरा देवाघरी जाऊन आठ वर्षे उलटली होती पण चार सोन्याचे मणी अन् एक पदकाचे मंगळसूत्र तिच्या डोळ्यासमोर तरळले.तिने पेटीतून मंगळसूत्र काढले.साडीचा पदर कमरेत खोसला.लगबगीने सोनाराचे दुकान गाठले.
सौभाग्याची आठवण म्हणून जपलेली वस्तू काळजावर दगड ठेऊन मोडली अन् दोन हजार रुपये आणले.सकाळी गौरीला शाळेत जाताना पैशे द्यायचे असे तिने ठरवले.सकाळ झाली.कामाला जाण्याआधी आईने गौरीच्या हातात दोन हजार रुपये ठेवले.
आई कामाला निघून गेली.गौरीला पैसे मिळाले.तिला खूप आनंद झाला.आईने एवढे पैसे कुठून आणले असतील? हा प्रश्न तिला पडला. आपणास सहलीला जायला मिळणार असल्याने तिने भरभर कामे आटोपून शाळेत जायला निघाली.
तिने नीशाला शाळेत सोबत चालण्यासाठी आवाज दिला.दोघी शाळेकडे निघाल्या.सहलीला येत असल्याची बातमी तिने नीशाला सांगितली.नीशालाही आनंद झाला.”काल संध्याकाळी तुझी आई माझ्या घरी आली होती.माझ्या बाबांनी तुझ्या आईला पैसे दिले.”नीशाचे बोलणे ऐकून गौरी सुन्न झाली.
गौरीच्या अंगातील त्राण संपला.डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले.नीशाला शाळेत जायचे पुढे जायला सांगून ती मागे परतली.थेट सोनार काकाच्या घरी पोचली.
काकांशी अदबीने बोलली.चौकशी केली.मंगळसूत्र मोडून आईने आपल्यासाठी पैसे आणल्याचे तिच्या लक्षात आले.आईचे समर्पण,त्याग समजण्याइतकी ती मोठी झाली होती.
तिने विनवणी करून मंगळसूत्र परत घेतले.पैसे परत केले.संवेदनशील गौरीचा समंजसपणा पाहून काकांनाही नवल वाटले.शाळा आटोपून गौरी घरी आली.आई स्वयंपाक करत होती.भाजी शिजली होती.
भाकरी थापणे सुरू होते.तव्यावरची भाकर काढली. चुलीतील आर बाहेर काढला.भाकर शेकायला ठेवत गौरीला विचारू लागली.”भरलेस काय गं,सहलीचे पैसे? कधी जाणार आमची लाडोबाई सहलीला?” गौरीने आईकडे नजर टाकली.तिच्या पापण्या नकळत भिजल्या.आपसुकच ती आईच्या कुशीत शिरली.रडायला लागली.
“का रडतेस,काय झालं?” असे विचारताच तीने सहल रद्द झाली म्हणून सांगितले.
आईने पदराने गौरीची आसवे पुसली.
गौरीने रडत रडत आईचे मंगळसूत्र आईच्या हातावर ठेवले.हातात मंगळसूत्र बघून आईने गौरीला घट्ट मिठी मारली.
दोघीही ‘मायलेकी एकमेकींना घट्ट पकडून रडू लागल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा