Pages

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

"बाप"


"बाप"


मॅक दाते नावाची एक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट मयुरेशनी फेसबुक वर एक्सेप्ट केली. रोजचे बोलणे चालू झाले.
हाय- हॅलो चे बोलणे काही दिवसातच पर्सनल प्रॉब्लेम्स शेअर करण्यापर्यंत वाढले आणि फेसबुकवर एक घट्ट नाते मयुरेशला मिळाले.

मयुरेश - साधारण विशी - बाविशितला मुलगा. खूप काही करण्याची तडफड, जिद्द पण त्याच बरोबर काहीसा उद्धट. सोशल जग एवढं की घर आणि कुटुंब ह्यांना वेळ न देऊ शकणारा. बापाला कधीही समजून न घेणारा. सतत आरे ला कारे करणारा हा तरुण.

मॅक दाते - ५०शितला एक पुरुष पण तरीही आजच्या तरुण पिढी प्रमाणे सोशल असणारा. इन्फोसिस मध्ये टॉप चा इंजिनिअर.

कदाचित ही वयातली तफावत सुद्धा मयुरेशला त्याच्या जवळ खेचत असेल. मॅकला मयुरेश समजायला मदत करत असेल. कारण काहीही असो; अल्पावधीत ते दोघे खास झाले हे मात्र खरे!

मयुरेशला काहीही नवीन करायचे असो; तो पहिले मॅकशी चर्चा करणार मग घरी वडिलांकडे पैसे मागणार. मग ते जिम असो, चेसचा क्लास, मुवी की अगदी एखादी पार्टी असो.

फेसबुकच्या फ्रेंडशी मॅकशी बोलणं झालं की बाबाही पटकन होकार देतात हे मयुरेशला कळु लागलं परिणामी तो मॅक शी अजून जास्त जवळीक साधू लागला.

११ फेब, २०१७ चा दिवस. संपूर्ण जग आपापल्या व्हॅलेंटाईन बरोबर १४ फेब प्लॅन करत असते. एखादीला विचारावे कसे हा प्रयत्न करत असते तेंव्हा मयुरेश मागे कसा असेल???

त्याने ही गोष्ट मॅकला सांगायचे ठरवले. ठरल्या वेळेला फेसबुकवर येऊन मयुरेश मॅक शी गिरिजा बद्दल सांगितले. पहिले खूप वेळ काहीच रिप्लाय आला नाही. बिझी? बिझी? म्हणून ४ मेसेज गेले तेंव्हा कुठे मॅक चा रिप्लाय आला.

गो अहेड. घाबरु नको. दिल खोलके रख मेरे शेर. वर एखाद दोन कॅफे ची नावेही सजेस्ट केली. दिल खुष. थॅन्क्स म्हणून; गिरिजाला विचारायचा निर्धार करून मयुरेश ऑफ लाईन जातो.

दुसऱ्या दिवशी बाबांना व्हॅलेंटाईन डे साठी पैसे मागतो तोच बाबा म्हणतात; काय गरज?? अभ्यास करा.. फालतू पार्ट्या. कसली प्रेम करता?? कोण आहे मुलगी सांग.. घरी घेऊन ये. हे असले बाहेर भटकणे बरोबर नाही.

तोच एक भडका उडतो. "काय बाबा; फालतू आहात तुम्ही. आमचं वय आहे सगळं एन्जॉय करायचं. इथे एक गोष्ट मिळत नाही प्रेमाने .. लगेच.."
"हो ना; चेस, जिम साठी भिकाच मागतोस ना जसा. या घरात राहीचे असेल तर नीट बोलायचे"
"जातो हे घर सोडून. तुमच्यापेक्षा तो मॅक बरा. तुमच्याच वयाचा. पण बघा कसे फेसबुक वापरतो. एंकरेज करतो. सतत नाही नाही म्हणत. नाहीतर तुम्ही. पिढी बरोबर चालणे माहीत नाही का काही नाही... हाड!"
"हो??? कसा दिसतो रे हा मॅक? काय करतो काय??
मयुरेश एकदम ऐटीत सांगतो; "इन्फोसिस ला आहे. प्रोफाइल पिक्चर नाही ठेवला आहे सो माहीत नाही कसा दिसतो. पण विचार जुळतात. विचार जुळायला चेहरा माहीत असणं गरजेचं थोडी असते.. काय?"
बाबा शांत होऊन; " हो तर, ते पाहतोच आहे की. पोटचा गोळा पण एक विचार जुळतो आहे का बघ. काय आडनाव या मॅक चे? ख्रिसचन वाटतो."
"नाही, कोकणस्थ आहे. दाते आहे. आपलाच. सेम आडनाव... मॅक दाते. "
"दाते असून, पन्नाशीच्या आसपास असून हे असले विचार? फुस लावतो तुला??"
"तुम्हाला फुस च वाटणार. पिढी बरोबर बदलणे आहे अहो ते. सगळ्यांना नाही जमत..."
"काय पिढी पिढी बोलतो आहेस रे सारखा. आम्ही जन्माला घातलं म्हणून आली ही तुमची पिढी. त्याचीच भीती दाखवतो सारखा? आहे काय तुमच्या पिढीत?? सतत अर्ध्या चड्या घालून हिंडायचे, हा मित्र - तो मित्र. घरात पाय टिकतात का तुमचे??
"झाले चालू.." " हो.. ऐक. घरात चकार शब्द बोलायचा नाही. सतत मोबाईल, प्रोजेक्ट, मित्र. सतत बाहेरचे लोक. ह्यात तू; तुझी पिढी एवढे गुरफटला आहात की घरच्यांना काय हवं आणि नेमके तुम्हाला काय हवे कळणार कसे रे??? तो मॅक ढीग गप्पा मारेल. पैसे घ्यायला तर बाप लागतो ना?? आणि एवढा मूर्ख झाला आहेस तू ह्या बाहेरच्या जगात सतत राहून की लोकांच्या गर्दीत घरच्यांनाही ओळखत नाहीस तू..."
"काहीही बाबा. डोळे दिलेत मला देवांनी.. ओळखणार कसा नाही.. मुळात.."
"हो? डोळे दिलेत?? मग ओळखले मॅकला? मॅक दाते.. आपल्यातलाच.. सेम आडनाव. इन्फोसिस. पन्नाशीच्या आसपास.. वर तोंड करून सांगतोस.."
मयुरेश आवाक होऊन; "बाबा....!"
एका क्षणात डोळे पाणावतात. " काय सांगू? अवाक्षर बोलत नाहीस घरात. बाप वडीलधारी असला तरी मित्र ही असतो. एवढी तर तुमची पिढी माहीत आहे मला. अंगीकारले आहे मी. पण तू नवी पिढी करत ह्या मित्राला विसरलास.. काय करणार मग?? केलं लॉग इन फेसबुकला. म्हंटले इथून जाणून घेऊ मुलाला. तू एवढेही डोके नाही लावले की आपण जेंव्हा जेंव्हा लॅपटॉप उघडतो तेंव्हा तेंव्हा वडील मोबाईल घेऊन बसतात. तेवढेही निरीक्षण नाही घरच्यांचे. सगळी उमेद दिली. आवडले मुलाचे विचार. गिरिजा बद्दल सांगितलस तेंव्हा आधी तिची प्रोफाइल चेक केली. काय करते मुलगी; कशी दिसते. मग तुला रिप्लाय दिला. काय दुर्दैव आहे हे की मुलाचा वेळ मिळायला फेसबुकचा आधार घ्यावा लागला... "
मयुरेश रडू आवरत; " सॉरी बाबा. "
प्रेमाने जवळ घेत बाबा एकच सांगतात मयुरेश ला -
"बेटा, कोणीही बाहेरचं तुला समजून घेणार नाही का नवी उमेद देणार नाही. जगात फक्त दोनच व्यक्ती ते काम आपलं समजून करतात एक गुरू आणि दुसरं .... ' घर '!!!"
मयुरेश मिठी मारत " मी नेहमी लक्षात ठेवीन बाबा."
बाबा हसत; " बाकी काही नाही एवढं लक्षात ठेव... ' हम तुम्हारे बाप हैं!"...

दोघं हसत हसत गिरिजाचे फोटो बघतात. फेसबुकवर नाही. मयुरेश च्या मोबाईल मधले...!

- अनुराज.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा