Pages

बुधवार, १० एप्रिल, २०१९

चव....


चव....

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.
कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?

उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.

एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.
कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.

कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.

चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते !

"प्रत्येक राज्याच्या नावामागे दडलीये एक कहाणी




"प्रत्येक राज्याच्या नावामागे दडलीये एक कहाणी
माहिती संदर्भ :-  Loksatta

जाणून घ्या नावामागची आगळीवेगळी गोष्ट

एखाद्या वस्तूचे किंवा ठिकाणाचे नाव विशिष्ट का असते यामागे काही ना काही लॉजिक असते. ते नाव ठेवण्यामागे काहीतरी कारण किंवा एखादी कथाही असते. एखादा प्रदेश, भाग हा विशिष्ट नावानेच का ओळखला जातो, त्यामागे काय कारण असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आता आपल्या देशात असणाऱ्या अनेक राज्यांची नावे नेमकी कशी पडली असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर त्याची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही नावे अर्थपूर्ण असून प्रत्ये नावामागे काही ना काही अर्थ आहेच.

पाहूयात राज्यांच्या नावाविषयीच्या रंजक गोष्टी

१. मध्य प्रदेश :
 मध्यप्रदेश राज्य, ह्या राज्याच्या नावामागे अगदी सोपे लॉजिक आहे. हे क्षेत्र भारताच्या मध्यभागी आहे म्हणून ह्याला मध्यप्रदेश हे नाव देण्यात आले.

२. छत्तीसगड :
 छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेशातून विभक्त होऊन तयार झाले आहे. येथील ३६ ऐतिहासिक किल्ल्यांमुळे ह्या क्षेत्राला छत्तीसगड हे नाव पडले.

३. झारखंड :
 संस्कृत भाषेत ‘झार ह्याचा अर्थ ‘जंगल असा होतो तर ‘खंड म्हणजे जमीन. ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत म्हणून ह्या क्षेत्राला झारखंड असे नाव देण्यात आले.

४. उत्तर प्रदेश :
 उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या उत्तर भागात आहे, त्यामुळे ह्या क्षेत्राला उत्तरप्रदेश असे नाव देण्यात आले.

५. उत्तराखंड :
 २००० साली उत्तर प्रदेशातून विभक्त होऊन उत्तराखंड ह्या राज्याची निर्मिती करण्यात आली. उत्तराखंड ह्याचा अर्थ ‘उत्तरेकडील जमीन असा होतो.

६. गोवा :
गोव्याचं नाव हे संस्कृत शब्द ‘गौ म्हणजेच गाय ह्यावरून पडले असल्याचे काही लोक मानतात. तर काही लोक असे मानतात की, हे नाव युरोपीय किंवा पोर्तुगाली भाषेतून आले आहे.

७. महाराष्ट्र :
१ मे १९६० साली महाराष्ट्र ह्या राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हे नाव दोन संस्कृत शब्दांची जोड आहे. ज्यात ‘महा म्हणजे महान म्हणजेच ‘महान राष्ट्र.

८. कर्नाटक :
 कर्नाटक हा शब्द संस्कृत मधील ‘कारू आणि ‘नाद ह्या दोन शब्दांची जोड आहे. ज्याचा अर्थ ‘उन्नत भूमी असा आहे.

९. हिमाचल प्रदेश :
 संस्कृतमध्ये ‘हिम ह्या शब्दाचा अर्थ ‘बर्फ तर ‘अचल ह्या शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. ह्या दोन शब्दांना मिळून ‘हिमाचल हा शब्द बनला आहे.

१०. हरियाणा :
 ‘हरियाणा हा शब्द ‘हरि आणि ‘आना ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. ह्यात ‘हरि म्हणजेच विष्णू भगवान आणि ‘आना म्हणजे ‘आगमन. असं म्हणतात की महाभारता दरम्यान भगवान विष्णू येथे आले होते म्हणून ह्या क्षेत्राचं नाव हे हरियाणा असे पडले.

११. गुजरात :
 अठराव्या शतकात गुजरा यांनी याठिराणी राज्य केले होते, म्हणून याचे नाव गुजरात पडले.

१२. पंजाब :
 पंजाब ह्या शब्दाचा अर्थ ‘पाच नद्यांची जमीन असा होतो. हा शब्द इंडो-इरानी शब्द पुंज म्हणजेच ‘पाच आणि ‘आब म्हणजेच पाणी ह्यांच्या एकत्रीकरणातून बनला आहे.

१३. पश्चिम बंगाल :
 बंगाल हा शब्द संस्कृतमधील ‘वंगा ह्या शब्दापासून बनला आहे. ह्यालाच पुढे जाऊन फारसी भाषेत ‘बंगालह आणि हिंदीत ‘बंगाल तर बंगाली भाषेत ‘बांग्ला असे म्हटले जाऊ लागले.

१४. अरुणाचल प्रदेश :
 संस्कृतमध्ये ‘अरुणा म्हणजे ‘सकाळची किरणे आणि ‘अचल म्हणजे ‘पर्वत असा अर्थ आहे. ह्या दोघांन मिळूनच ‘अरुणाचल प्रदेशच नाव पडलं आहे.

१५. मेघालय :
 संस्कृतमध्ये ‘मेघ म्हणजे ‘ढग आणि ‘आलय म्हणजे ‘आवास, ह्या दोघांना मिळून ‘मेघालय असं नाव पडलं आहे.

१६. त्रिपुरा :
 एका कथेनुसार ह्या राज्याचे नाव येथील ‘त्रिपुर राजा ह्यांच्या नावावरून पडलं आहे. हे भारतातील तिसरं सर्वात छोटं राज्य आहे.

१७. आंध्र प्रदेश :
 संस्कृत भाषेत ‘आंध्र म्हणजे ‘दक्षिण, ह्यामुळेच दक्षिणेकडे असणारा प्रदेश म्हणून या क्षेत्राचं नाव हे आंध्र प्रदेश असं पडलं."

फ़ुलपाखरु


आपण फ़ुलपाखरु व्हायचं हे सुरवंटाने ठरवलं म्हणजे तो आपणहून स्वत:भोवती कोष निर्माण करतो. स्वत:ला कैदेत बध्द करतो. फ़ुलपाखरु होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधीच समजायची.
मग त्याचं आपोआप फ़ुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय स्विकारलेला असतो...
व.पु....
आपण फ़ुलपाखरु व्हायचं हे सुरवंटाने ठरवलं म्हणजे तो आपणहून स्वत:भोवती कोष निर्माण करतो. स्वत:ला कैदेत बध्द करतो. फ़ुलपाखरु होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधीच समजायची.

मग त्याचं आपोआप फ़ुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय स्विकारलेला असतो...                         

व.पु.

आधार ...


आधार ...

मित्राची आई 2/3 आठवडे आजारी आहे . म्हणून शनिवारी त्यांना बघायला मित्राच्या घरी गेलो होतो .

आईच त्याच सर्वस्व . आई आजारी असल्यामुळे हां अस्वस्थ झालेला . दोन आठवडे बिझीनेस सोडून आई जवळच थांबला .मला कळल म्हणून गेलो बघायला .

मोठा फ्लैट आहे . दोन बेडरूमचा . आई साठी वेगळी बेडरूम आहे . मित्राचे वडील किमान 25 वर्षापुर्वी मरण पावलेले .

घरी गेल्यावर वहिनीने सांगितले आई त्यांच्या बेडरूम मध्ये झोपल्या आहेत . मी बेडरूम मध्ये गेलो तर आई त्यांच्या बेडवर झोपल्या होत्या आणि मित्र खाली चटई टाकून काहीतरी वाचत पसरला होता .

मला बघुन उठला आणि आईला हाक मारली आणि महेश आलाय म्हणून सांगितल . मी हलकेच त्याला सांगितल झोपु दे त्यांना . थोड्या वेळाने उठव .

मी पण त्याच चटईवर खाली बसलो . मी बेडरूम न्याहाळत होतो . त्याने त्याच्या आईची बेडरूम मस्त सजवली होती . स्वतंत्र कपाट . TV . पुस्तका साठी कपाट . भिंतीवर डीझाईन आणि बरच काही .

हे सगळ बघताना मला एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे . त्याच्या आईने अंगावर जे Blanket घेतल होत त्याला सहज दिसतील अशी बऱ्यापैकी मोठी अशी दोन छिद्र होती . Blanket बऱ्यापैकी जून पण दिसत होत . मी सहज Blanket वरुन हात फिरवला .

मित्राने मी विचारण्या अगोदरच  सांगितले . हे Blanket माझ्या वडिलांचे आहे . आई गेली 25 वर्ष रोज अंगावर घेऊन झोपते . तिच्यासाठी तो आधार आहे .

पंचवीस वर्ष तिने याच आधारावर काढली . वडील गेल्यावर खचली होती . पण या Blanket च्या रुपात तिला आधार भेटला .

 या आधारावर तिने तिची नोकरी , माझ शिक्षण , येणाऱ्या अड़ीअडचणी तिने याच आधारावर सोडवली . आजही माझे वडील आम्ही या Blanket च्या रुपात जिवंत ठेवले आहेत .

 मलाही वडिलांची आठवण आली की हे Blanket जवळ घेऊन बसतो ... अस म्हणत त्याने त्या Blanket ला मुठीत गच्च पकड़ल .

त्या गच्च मुठी कड़े बघुन त्याचे वडील त्याच्या अजूनही किती जवळ आहेत हे मला जाणवल .

आधार वास्तव असो अथवा आभासी ...
पण माणसाला उभारी घ्यायला बळ देतो

ओंजळ


ओंजळ ती केवढी; 
भासते छोटी;
मात्र असते खूप मोठी.

आपली सुख-दुःखं तिच्यात मावतात.
आपल्या आकांक्षा तिच्यात सामावतात.

मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात.
ओंजळीत मायेचं चांदणं ठेवता येतं.
ओंजळीत आकाश उतरू शकतं आणि सप्तसागरांचं पाणीही बसू शकतं.

ओंजळीत म्हणे ब्रह्मांडालाही जागा असते.
जाग आल्यावर प्रथम करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे.

बोटांच्या अग्रांवर लक्ष्मी आहे; मध्यभागी सरस्वती आहे आणि मुळाशी गोंविद आहे.
करदर्शनानं आपण त्यांचं स्मरण करतो.
मगच उद्योगाला लागतो.

दारी अतिथी आला, तर त्याला विन्मुख पाठवीत नाहीत. त्याला पसाभर पीठ-धान्य दिलं जातं.

आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा वत्सल आशीर्वादही आपण ओंजळीतूनच घेतो.
सूर्याला अर्घ्य अर्पण करतो, तेही ओंजळीतूनच....

साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल, तेवढंच अन्न पुरेसं असतं.
त्यापेक्षा अधिक खाण्यानं अजीर्ण होतं.

उषःपानही ओंजळीनंच करायचं असतं.
तेवढं पाणी माणसाची तृष्णा शमवतं.

माणसाच्या अनेक कृतींशी आणि भावनांशी ओंजळीचं असं घट्ट नातं असतं.

ओंजळ हे दातृत्वाचं रूप आहे.
समर्पणाच्या भावनेचंही ते द्योतक आहे.

स्वीकारायला ओंजळ लागते, तशीच द्यायलाही ती लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही.
ती पुनःपुन्हा भरत जाते.
ओंजळ सांगते, आधी द्या, मग घ्या.

ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या,
झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या...!



बोलणं



बोलणं

'बोलण्याची शक्ती' हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत! हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

'आहे हे असं आहे',
'माझा आवाजच मोठा आहे'
'मला अशीच सवय आहे'
असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.

बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. 'कौन बनेगा करोडपती' मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ - उतार शिकायचं असेल, तर हा आवाज अभ्यासायलाच हवा, आवाजाची, बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू कळत जातं.
शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून! त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.
आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.

संदीप माहेश्वरींचे शब्द ऐका.. 'आसान है' ... हे शब्द नाहीत आतून आलेलं सत्य आहे, त्या माणसाचं अनुभवलेलं, जगलेलं.

एक प्रयोग केला होता. सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती... अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची. वाढवत जायचे हे शब्द. हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते. आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे.
शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!

सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.
वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते.
यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे ठरते.

आजकाल इंटरनेटमुळे दर्जेदार भाषणे, कार्यक्रम आपल्याला सहज ऐकता, पाहता येतात, याचा वापर बोलणे सुंदर करण्यासाठी करता येईल.
कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता - ऐकता आली पाहिजेत.

या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती (Time is Money) असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?
फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.
आजकाल टि.व्ही., इंटरनेटमुळे संवाद कमी कमी होतोय. व्हाॅट्सअॅप, मेल हीच संवादाची साधनं झालेली आहेत. पण त्यांना चेतनेचा स्पर्श नाही. बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडीच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं. वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात, पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.

बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.
बाकी प्रत्येकाला कधीतरी उतरायचं आहेच!

आयुष्य एन्जॉय करा.




आम्ही एवढा एन्जॉय का करतो.
वाचा नक्कीच १०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            प्रिय मित्रहो..
  आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.
          मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा