Pages

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

गाठ




किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.

पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल. त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.

तर तो प्रश्न होता की.....
" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? ”

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते, तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.

तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.

चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."

सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर
योद्धा अशी होती.

तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.

आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.

पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले. लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.

तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की....

" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो "

हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.

शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.

विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.

धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?

त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.

आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात
राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.

यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल. पण रात्री एकांतात काय ?

अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?

आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?

तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.

कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा. माझी कसलीही हरकत राहणार नाही.

हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन. कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
.
.
.
.
तात्पर्य :
" स्रियाला मनाप्रमाणे योग्य रीतीने  वागू द्या, जीवन सुंदर होईल
नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे "

रविवार, ७ एप्रिल, २०१९

मराठी भाषेची मजा ...


मराठी भाषेची मजा ...

मराठी भाषा शिकायला सोपी नाही.

१. म्हणे शिरा खाल्ल्याने  शिरा आखडतात.
२. काढा पिऊन मग एक झोप काढा.
३. हार झाली की हार मिळत नाही.
४. एक खार सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर खार खाऊन आहे.
५. पळ भर थांब, मग पळायचे तिथे पळ.
६. पालक सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, पालक इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.
७. दर वर्षी काय रे दर वाढवता?
८. भाव खाऊ नकोस, खराखरा भाव बोल.
९. नारळाचा चव पिळून घेतला तर त्याला काही चव राहत नाही.
१०. त्याने सही ची अगदी सही सही नक्कल केली.
११. वर पक्षाची खोली वर आहे.
१२. खोबर्‍यातला मुलांचा वाटा देऊन मग बाकीच्याची चटणी वाटा.


हॉटेलींग....



हॉटेलींग....
एक विचार करण्याचा मुद्दा.

हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो,
 हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे.

मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे,
 काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग रहायचे....

मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो.....
बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते.
मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो.

१-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते....

तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन ’पाणी साधे का बिसलेरी असे विचारतो......
दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी म्हणून सांगतो....

मग बराच वेळ ताटकळत ठेऊन,
८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", कोल्डींग ई. गोष्टी येतात....

या सर्व गोष्टी आल्यावर,
हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही,
पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो....

सहाजिकच स्टार्टर्स ची क्वांटीटी कमी असल्याने, जेमेतेमे एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो...पण आम्ही एकदम मस्त मुडमधे !

मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटर कडे आपण आशाळभुतासारखे पाहून थोडासा अवधी मागुन घेतो....

कोणी व्हेज, कोणी नॉन व्हेज असे ठरत ठरत आपण शेवटी, वेटर नी ’सजेस्ट केलेले पदार्थ ऑर्डर करतो.....

त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेश मधे राहीलेले स्टार्टर्स चे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस ई. पदार्थांचे सेवन, सो कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते.....

तो पर्यंत आजुबाजुला असलेल्या एखाद्या ग्रुप मधे जोरदार हाश्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो.....

त्यातच एखादे अगम्य "म्युझीक" ’बॅग्राउंडला लावलेले असते...

थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतय, पण ए.सी. तर चालू असतो. मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला सांगतो,
तो ’वाढवल्यासारखे करून निघून जातो,
 थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही. मग खूपच गर्दी आहेना, ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्स च्या वाटणीच्या मागे लागतो....

काही चांगल्या, काही अपेक्षाभंगीत, काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मुड मधे जेवण सुरू करतो....

मग सुरूवातीला काही विनोद,
मग एस.एम.एस, मग ’नेबर्स बद्द्ल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्कींग प्रॉब्लेम... इ. इ. इ. विषय ’डिस्कस करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणी वातट रोटी अजून शिल्लक आहे......

मग ती रोटी कशीबशी संपवून न-वाफाळणारा ’स्टीम राईस समोर येतो... आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल सांगीतली जाते जी डाल, राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा कींवा दह्या बरोबर ढकलला जातो......

लगेच फिंगर ’बोल ची आज्ञा सुटते आणी नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बोल येतात.....

कसे तरी बुचकळून हात ’साफ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. ...

बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो कॉल्ड ’डेझर्ट आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.....

एका पापडाचे १० -१५ रू;
एका रोटीचे १५-२० रू;  
एका सुपचे ७५-८० रू;
एका भाजीचे ८० -१०० रु;
नॉन व्हेज डीश चे प्रत्येकि २००-४०० रू: व
जर मत्स्याहार केला असेल तर तर एका डीश चे ६००-८०० रू;
असे एकुण १८०० ते २२०० रू. चे बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो. ....

मग त्या बिलाचा राग म्हणा कींवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा,
पण आपण सुगंधीत बडीशोप, चवळ्या मटक्या व टूथपिक, भरभरून घेतो.....

 बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्या सारखा,
आपण १०-२० रू. टिप ठेवतो आणि बाहेर पडतो.

मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.....

जरा विचार करा की
आपण खालेल्या पदार्थांचे मुल्यांकन पटण्यासारखे असते ?
कितपत स्वादिष्ट व आरामदायक होते ते जेवण ?
किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ?

हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी,
जेमेतेमे २०-२५ मिनीटांच्या गप्पा,
आणी निम्याहुन अधिक खिसा रिकामा.
मला हे अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठीकाणी नसेल सुध्दा पण बहुसंख्य ठीकाणी आहेच.....

त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरतो ?
का नेहमी स्वत:चीच समजुत घालत बसतो ?
आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे पण म्हणून असे पैसे उडवायचे...?

त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ करून आणून घराच्या हॉल मधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा...?

तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितितरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर जेमतेम निम्मा होतो.....

बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते....

"रिलॅक्सेशन" हे कारण असते हॉटेलिंग करण्यामागे, पण मलातरी वाटत नाही की प्रत्येक वेळेस ते साध्य होते....!

कांदे आणि बटाटे.


कांदे आणि बटाटे.
परवाचीच गोष्ट. सहजच फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि लक्षात आलं, आज रविवार ! गावातल्या आठवडी बाजाराचा दिवस! गावात अगदी अलिकडेच आठवडी बाजार भरायला सुरूवात झाली होती. तेव्हा हा आठवडी बाजार आहे तरी कसा ते पाहावं या विचारात असतानाच पावले त्या दिशेने केव्हा वळली ते कळलेच नाही.
बाजाराच्या जवळ येऊन ठेपलो असेन नसेन तेवढ्यात जोरदार हाळी ऐकू आली, ' ऐ कहांध्येss बट्टाट्टीssय्ये ' आणि मला एकदम लहानपणात शिरल्यासारखे वाटले.
आमच्या लहानपणी घराजवळच्या पाणंदीतून डोक्यावर पाटी घेऊन जाणारा एक फिरस्ता अशाच खणखणीत आवाजात आरोळ्या ठोकून कांदेबटाटे विकत असे. उन्हातान्हातून फिरावे लागत असूनही तो स्वभावाने मोठा गमत्या असे.
गुरुजी आम्हांला शाळेत शिकवत असताना वर्गातल्या ढढ्ढम पोरांना 'डोक्यात कांदेबटाटे भरलेत काय रे तुझ्या?' असं विचारीत असत.ते कांदेबटाटे आपणच भरतो असं तो फिरस्ता सर्वांना मोठ्या ऐटीत सांगे आणि आम्हांला त्यावेळी ते खरंही वाटे. त्याच्याकडून कोणी कांदेबटाटे विकत घेताना आम्ही कधीच कुणाला पाहिले नव्हते. त्यामुळेच पुढचे कित्येक दिवस आमचा तो समज तसाच टिकून राहिला होता.
खरं तर रांगत्या वयातच कोणाच्या तरी पाठुंगळीला आपण कांदेबटाटे म्हणून बसलेले असतो, आईच्या हातून काऊचिऊचा घास घेताना दूधभातात, दहीभातात उकडलेला बटाटा कुस्करून खाल्लेला असतो तेव्हापासूनच बटाटा हा जीवनसाथी आपल्या आयुष्यात 'जेवण'साथी बनून गेलेला असतो. निदान माझ्या बाबतीत तरी तसं म्हणणं खरं आहे.
लहानपणी शाळेत भर वर्गात गुरूजींनी 'अकलेचा कांदा' असा उल्लेख केल्याच्या रागातूनही असेल कदाचित, पुष्कळांना कांदा अजिबात आवडत नाही. तुमचं ठाऊक नाही, पण मला कांदा न आवडण्याचं हे कारण मात्र नक्कीच नाही. उग्र वासाची पेयेसुध्दा मी हातभर अंतरावर ठेवतो, तिथे उग्र वासाच्या कांद्यापासून चार हात दूर न राहिलो तरच नवल !
बटाट्याचं मात्र तसं नाही. शुध्द पाण्याला चव, वास, आकार इत्यादि गुणधर्म नसतात. बटाटाही तसाच आहे अगदी !
वाटाणा, मूग, चवळी, मटार, हरभरा अशा कोणत्याही उसळीत तो शिजवा, त्या उसळीचा स्वाद दुणावलाच म्हणून समजा.
तीच गोष्ट विविध भाज्यांची ! कोबी, फुलकोबी, वांगी, फरसबी किंवा पडवळ दोडकी यासारखी अन्य कोणतीही भाजी घ्या, केवळ या बटाट्यामुळेच त्या स्वादिष्ट लागतात हे कोणीही मान्य करील.
बरं, हा बटाटा कशातही वर्ज्य नाही. शेवबटाटापुरी, बटाटेवडे, बटाटाभजी, बटाट्याचे तळलेले काप, बटाटेभात यांसारख्या शाकाहारी पदार्थांपासून ते खेकडारस्सा, मसाला कोलंबी, हिरव्या वाटपाची कोलंबी, एकशिपी रस्सा ! किती म्हणून पदार्थ सांगू!
बटाटा हे फळ आहे की मूळ, खोड आहे की कंद याच्याशी काहीच कर्तव्य नाही आपल्याला! त्याचं बाह्यरूपही म्हणजे त्याचा वेडावाकडा आकार, रंग हे काही फारसं आकर्षक नाही हेही मान्य आहे मला, पण म्हणून काही तेवढ्या कारणासाठी त्याला नावे ठेवली जाणं अनुचित ठरेल.
उपवासापासून ते सहवासापर्यंत नित्यनूतन प्रकारे उपयुक्त असलेला बटाटा हा एकमेव खाद्यपदार्थ आहे.
तुमच्या मनातली शंका आलीय माझ्या लक्षात.
उपवासाचं ठीक, पण सहवासात कसा काय उपयोगी ठरतो बटाटा हेच घ्यायचंय ना जाणून तुम्हांला?
ठीक आहे, सांगतोच तर आता !
आपण नेहमी कुणाच्या सहवासात असावं असं तुम्हांला वाटतं ?
अर्थातच प्रिय व्यक्तींच्याच !
बरोबर?
या प्रिय व्यक्ती म्हणजे नक्की कोण ?
अर्थातच आपले मित्र !
बरोबर?
हे मित्र आपल्याला निवांतपणे भेटण्याची वेळ कोणती ?
अर्थातच सुटीच्या दिवशी उशीरा संध्याकाळी!
बरोबर ?
मित्रांसोबत गप्पा मारायला 'बसलात' , की तुम्हांला अधूनमधून तोंडात टाकायला काय लागतं?
बटाट्याच्या अगदी पातळ चकत्या!
अर्थात वेफर्स!
बरोबर?
मग आता लक्षात आला ना बटाटा नि सहवासाचा किती निकटचा संबंध आहे ते?
मग कधी बोलावताय मला तुमच्या सहवासात?
कोणत्या सुट्टीच्या दिवशी, उशीरा संध्याकाळी?
उग्र वासाची पेये हातभर अंतरावर ठेवून गप्पा हाणता हाणता वेफर्स खायला 

चांगले - वाईट दिवस...


चांगले - वाईट दिवस...
----------------------------
चांगले - वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काही वेळा आपल्या जीवनात काय चालले आहे, हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते...
अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूती शिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशा वेळी न रडता, न घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे...

मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो, ते स्वत:वर करा. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही.,
अशा वेळी तुम्ही काय करता...??
मोबाईल आणि संगणक जसे ‘हँग होतात तसेच आपल्या मेंदूचेही होते. विचार पांघरूण डोक्यावर ओढून झोपून जातात आणि मेंदू हँग होतो. तेव्हा सारखी बटणं दाबत बसू नका...
डोकं का चालत नाही...?”
या मुद्यावर स्वत:चा छळ करू नका. हँग झाल्यावर मोबाईलची बॅटरी काढून त्याला फुंकर मारून, परत मोबाईलमध्ये घालून चालू करण्याचा अनुभव सर्वांनाच असेल.तसेच करा...

काही वेळापुरता सर्व विचार बाजूला सारा.
काय होत नाही...??
किंवा
का होत नाही...??
यावर वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. स्वत:ची बॅटरी काढा. थोडे मोकळे व्हा. जे आवडते ते करा. मित्रमैत्रिणींना भेटा. छंद पूर्ण करा. जमेल त्यानुसार एक किंवा दोन दिवस मनाची बॅटरी चांगल्या रितीने चार्ज करा...
मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा. जगातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष घाला. एकटेच दूरपर्यंत चाला. स्वत:शी चांगल्या गप्पा मारा. काम आणि जबाबदार्‍यांमध्ये अडकल्यामुळे इतर वेळी जे करणे राहून जाते ते करा. यालाच म्हणतात वैचारिक शटडाऊन...

हे सगळे करून बॅटरी नक्कीच चार्ज होईल. मग पुन्हा नव्याने रिस्टार्ट करा. जुने वाद, प्रसंग, दु:ख, त्रास यांच्याकडे नव्याने पहा. विचारांमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल...

आपले मन म्हणजे एखाद्या मोबाईल सारखे असते. दिवस -रात्र वापर करीत असताना अनेकदा त्याची बॅटरी लो होते. ती वेळोवेळी चार्ज करावी लागतेच. त्याचबरोबर ‘मन हँग झाले की पूर्णपणे शटडाऊन करून रिस्टार्टही करावे लागतेच...

मनाची काळजी घ्या...,
बॅटरी चार्ज करीत राहा...,
आणि
गरज भासली तर...
शट्डाऊन अॅण्ड रिस्टार्ट.....!!!

अहो....


अहो....

समस्त नवरेमंडळींसाठी धडकी भरणारा हा शब्द.

ही साधी दोन अक्षरे, पण तमाम नवरे मंडळीना सळो की पळो करून टाकतात.

झोपडी राहणारा साधा कामगार असू देत नाहीतर एखाद्या करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक.
या नुसत्या दोन अक्षरी "अहो" शब्दाच्या पुढे नतमस्तक असतो.

या 'अहो' मध्ये वचक आहे, धाक आहे, प्रेम आहे, माया आहे.
असं खूप काही आहे या 'अहो'त

तुम्हाला सांगतो लग्नाच्या आधी अरे-तुरे करणारी ती आपल्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून आपल्याच नावाच कुंकू लेवून जेंव्हा अचानक आपल्याच घराचा उंबरा ओलांडत  हळूच 'अहोजाहो' वर येते ना तेंव्हा छाती दोन चार इंच अशीच फुगते....
ऊर भरून येतो....
ती आपली पत्नी असल्याचा जबरदस्त अभिमान, गर्व आणि काही प्रमाणात माज ही असतो. दोन फूट पावले हवेत असतात.
आणि या 'अहो' च्या प्रवासाला सुरुवात होते.

"अहो, नाश्त्याला पोहे करू का उपमा?..."
असं गोड आवाजातील ते पहिलं 'अहो' तनामनाला गुदगुदल्या करून जातं.
 तिच्या त्या 'अहो' मध्ये पराकोटीचे प्रेम असते.
हा तिचा पहिला पहिला 'अहो' ऐकला की वाटायच जाऊन तिला गच्च मिठी मारावी.

मग हळूहळू हा 'अहो' रुळू लागतो.
जसजसा तो जुना होतो तसतसा तो मुरलेल्या लोणाच्यासारखा होऊ लागतो.

आता त्याच्या वेगवेगळ्या छटा आणि रंग दिसू लागतात.

या 'अहो' च्या उच्चारात, आवाजाच्या चढ उतारात, बोलण्याच्या लयीत जो काही अदृश्य, गहन अर्थ किंवा इशारेवजा सूचना असते ना, ते सर्व भाव माझ्यासारखा अस्सल मुरलेला नवराच समजू शकतो.
आता त्यासाठी अनुभवाचे कितीतरी 'अहो' खर्ची पडलेले असतात.
अभ्यास दांडगा झालेला असतो.

आताशा मी केवळ आवाजावरून तिच्या चेहऱ्याकडे न बघताही या ' अहो ' चा अर्थ लावू शकतो.

आता एक एक करून या अहो चा प्रवास बघुयात.

आता या 'अहो' मधला अ पासून ते हो पर्यंतचा आवाजाचा प्रवास कोमल स्वर ते मध्यमा पर्यंत गेला आणि भुवयांचा धनुष्यबाण झाला की आपण समजून जावे की आपलं काही तरी चुकलय...
जागेवर सुधारायला पाहिजे....
आणि तसे लगोलग दुरूस्त ही करून घ्यावे म्हणजे मग पुढची शाब्दिक उठाठेव टळते.

सीआयडी प्रद्युन्म टाईपचा ......" अहो, मला एक सांगा..." असा शंकास्पद 'अहो ' ऐकू आला की समजून जायचं की आपलं काहीतरी भांड फुटलं.
काही तरी बिंग उघडं पडलंय.
पण हा 'अहो' शंकेखोर असतो.
त्याला नक्की खात्रीने काही माहीत नसतं बरं का.

अश्यावेळी लगेच उत्तर द्यायचे नाही.
अनुभवाने तसा मेंदू तल्लख झालेला असतोच, तो लगोलग बचावाचे दोन चार पर्याय फटाफट पुढे करतो.
आपण परिस्थिती सांभाळून घ्यायची.

चढ्या आवाजातील ... " अहोsss हे कायं हे....."
अस तीक्ष्ण बाणासारखे कानाला शब्द येऊन टोचले की यावेळी सपशेल माफी मागायची तयारी ठेवायची कारण हा 'अहो'  चूक आपलीच आहे हे खात्रीने ठणाणा  सांगत असतो.
तिकडे बचाव नकोच.
अर्धापाऊस तास वादळ घोंघावतं आणि शांत होतं.
अशा वेळी शक्य होईल तेवढा 'पडेल' चेहरा तुम्हाला ठेवता आला पाहिजे.
वादळ शमलं की आपला 'पडेल' चेहरा बघून 'आपण जरा जास्त बोललो का?' हा अपराधीपणा तुम्हाला बायकोच्या चेहऱ्यावर पेरता आला पाहिजे. पुढच्यावेळी मग असं जरा वादळ विचारपूर्वक येतं.

मधूनच कधीतरी " अहो ऐका ना प्लिज...." अस अगदी फुलासारख्या मऊ भाषेत ऐकू आलं की समजून जावे आज तुमचा बकरा होणार आहे.
हा 'अहो' जरा कोमल, थोडा तुटक तुटक अगदी मधूर लयीत असतो.
अशावेळी संधीसाधूपणा करायचा.
आता आपला बकरा बनणार आहेच तर मग आपण उगाच नाही म्हणण्यात काही अर्थ नसतो.
मग वाद घालत बसण्यापेक्षा सरळ मान पुढे करून कापायला द्यायची पण या खालमानेने व कपटी मनाने तुमच्या काही अटी आणि शर्थी शिताफीने मान्य करून घेण्याइतका कावेबाजपणा तुमच्याकडे असलाच पाहिजे.
कारण एकदा का या त्या 'अहो' ची मागणी मान्य झाली की तो मऊ मुलायम " अहो " अचानक गायब होतो आणि त्याचा सावत्र भाऊ 'अहो ला काहो' हजर होतो... 

"अहो ऐका ना ...मी काय म्हणते..." असं विलक्षण मृदू आवाजातील 'अहो ' ऐकलं की कानात प्राण आणून ऐकावे.
 तुम्हाला सांगतो या 'अहो' मध्ये बराच धूर्त डाव असू शकतो.
या 'अहो' मध्ये तिच्या द्विधा मानसिकतेचा भाव असतो.
यात काहीही गुगली असू शकते.
अशा वेळी तुमच्या अंगात सचिन आणि राहुल दोघेही असायला हवेत.
 वेळ पडली सिक्स किंवा नाहीतर साधा बॉल तटवता आला पाहिजे ते ही जास्तीत जास्त तोशीस लागू न देता.

कधी कधी बायको उगाचच आपल्या अगदी जवळ येत परीटाने शर्टच्या बाहीवर मारलेल्या इस्त्रीच्या घडीला  आपल्या तर्जनी आणि अनामिकेच्या बोटाच्या नखाने पून्हा पुन्हा इस्त्री करत जेंव्हा लाडाने तोंडाचा चंबू करून " अहो..    " म्हणते ना तेंव्हा पुन्हा ते लग्नाचे नवनवेले नवीन दिवस आठवतात.
या 'अहो' मध्ये मात्र काही खास डिमांड असते..
काही नवीन खरेदी, सासुरवाडीचे कोणी येणार असतं किंवा हिला माहेरी जायचं असतं.
आणि सगळ्यात भीती त्या दागिन्यांची. याची तर काही मागणी नसेल ?
अशा वेळी नीट ऐकून घ्यावे. उगाच लगेच प्रतिक्रिया देऊ नये.
.'नवरा' म्हणून आता तुमच नाणं खणखणीत वाजवायची ती वेळ असते.
अशी संधी फार कमी वेळा येते.
तेंव्हा अजिबात आततायीपणा करायचा नाही.
कुठलाही निर्णय घ्यायचा नाही.

'आता जरा कामात आहे बोलू आपण नंतर '.....असं सांगून वेळ मारून सांगोपांग विचार करून कमीत कमी फटका कसा बसेल असं तुम्हाला बघता आलं पाहिजे.
तुम्हाला सांगतो हा " अहो " तसा खूप डेंजर बरं का.
व्यवस्थित नीट नाही हाताळता आला तर लवकर 'तह' सुध्दा होत नाही..

आणि हो एक महत्त्वाचं या इस्त्रीच्या घडीच्या 'जवळकीचा' लगोलग लाभ घेण हे तुमच्या हातात.ती एक कलाच...

कधी कधी " अहो ऐका ना माझं जरा.. " अशी प्रेमाची आर्जव त्या 'अहो' मध्ये असते.
या 'अहो' त खरोखर काही कळवळा असतो .
त्याचाही सन्मान करता आला पाहिजे.
येथे मात्र सपशेल समर्पण द्यावे.तिच्या मताला प्राधान्य द्यावे.आदर करावा या 'अहो'चा....
यात तुमचाच फायदा असतो....

जस वय वाढत जात तस हा 'अहो' जरा प्रगल्भ होतो...

जरा उतार वयाकडे लागलो की एखादी बायको नुसत्या जाणिवेने आपल्या नवऱ्याला " अहोsss" अस  जोरकस आवाजात धाकाने किचन मधून म्हणते तेंव्हा हॉल मध्ये बसलेल्या डायबिटीस झालेल्या नवऱ्याचा बर्फी कडे जाणारा हात आपोआप थांबतो.
येथे खरं जाणवतं या 'अहो' च महत्व आणि अस्तित्व.
येथे ते दोघेही एकमेकांच्या समोरासमोर नसतात..पण असतो तो  'अहो '

हा 'अहो' हळूहळू उतारवयाकडे झुकू लागतो. आता तिच्या बरोबर तो ही तिला 'अहो जाहो' करू लागतो.
 त्याच्याही 'आहो जाहो' मध्ये तेच प्रेम, धाक आणि हक्क असतो.

"अहो बसा जरा येथे निवांत, कामवाली बाई आली की करील ती....कशाला उगाच किचनमध्ये डोकावताय"  अशा त्याच्या कापऱ्या आवाजातील त्याची वाक्ये त्या 'अहो' मधलं एकरूपता दाखवत.

" अहो तुमची औषध घेतलीत का.. ?." हे त्याचं वाक्य त्याची काळजी दाखवत.

या दोघांचे हे 'अहो' आता एकरूप झालेले असतात.
येथे स्वतंत्र 'अहो' नसतोच.

हा 'अहो' कायम दुकटा असतो..  

आणि जरा कुठे या दोघांतला एक धागा तुटला की हा
 " अहो " सैरभैर होतो. एकाकी होतो.

सगळ्यांचा हा 'अहो' सदैव दुकटा राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

निसर्ग





माणसाने आपल्या जीवनात फुलांकडून स्वच्छंदपणे जीवन जगण्याचे मंत्र घ्यावे,

हिरव्या हिरव्या पानांकडून जीवनात समृद्धी घ्यावी...

खळखळणा-या पाण्याकडून जीवनात हास्य घ्यावे...

आकाशाकडून जीवन जगताना मनात शंका-कुशंका न बाळगता दुस-यांकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर सदैव घ्यावा...

कितीजरी जीवनात संकटे आली तरी डोंगरासारखी सहन करण्याची क्षमता घ्यावी...

सूर्य जसा सा-या चराचर सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाश किरणाने जगण्यासाठी प्रेरणा देतो त्याप्रमाणे आपणही या जीवनात काहीतरी दातृत्वाची प्रेरणा घ्यावी...

असे जर कुणा कुणाला काही ना काही करण्यासाठी निसर्ग प्रेरीत करतो आणि सा-यांचेच जीवन सुखासमाधानत ठेवतो...

त्याच्याजवळ कसल्याही प्रकारचा भेद नाही अशीच भूमिका आपण जर आपल्या जीवनात अंगीकारली तर आपले जीवनही नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही...

म्हणतात ना ' शिकावे ते निसर्गाकडून आणि घ्यावे तेही निसर्गाकडूनच.

मी कोण आहे?

  मी कोण आहे ? #motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment ...

आणखी पहा