असं सासर सुरेख बाई!!!
" केलेस ना आम्ही नाही म्हणत असताना लग्न??? मग आता हे घर
तुझ्यासाठी बंद आहे. आम्ही नाही येणार कुठल्या मिटिंग ला" असं म्हणून तेजल च्या
बाबांनी फोन कट केला.. तिची आई स्वयंपाक घरातून सगळं काही बघत होती.. आसवे गाळण्या
पलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते!
तेजल.. नवा प्रमाणे तेजस्वी आणि सुंदर! तिची आणि राकेश ची ओळख
कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षाला झाली.. हळू हळू
त्याचं रूपांतर घनिष्ट मैत्री आणि नंतर प्रेम ! असा साग्रसंगीत प्रवास करत गाडी लग्नापर्यंत
पोचली तेव्हा तिथे थोडीशी पंक्चर झाली! निमित्त एकमेव होते... सासूबाई! 'जात' वेगळी
असल्याने त्यांनी थोडे नाक मुरडले पण थोड्या दिवसांनी मुलाची इच्छा स्वतः च्या पदरात
पाडून लग्नाला होकार आला! तेजल च्या घरच्यांनी सुद्धा 'सावध ऐका पुढल्या हाका' असं
मनात ठेवून लग्नासाठी तयारी दाखवली... धूमधडाक्यात लग्न सोहळा पार पडला आणि लुटुपुटू
चा संसार सुरू झाला..सुरुवातीला सगळे काही अलबेल होते.. सकाळी लवकर उठायचं, चहा, नाश्ता,
डबा इत्यादी.. मग राकेश ची ऑफिस ला जायची घाई आणि महाशय एकदा ऑफिस ला गेले की चार भिंतींच्या
आत दोघी सासू सुना..! राकेश चं कुटुंब लहान असल्याने नणंद, जावा यांचं 'सुख' तेजल च्या
वाटेला आले नाही.. एक वर्ष असं सहज गेले..
आपली मराठी भाषा सुद्धा फार चपळ आहे.. एकीकडे म्हणते 'सहवासाने प्रेम वाढते'
आणि दुसरीकडे म्हणते 'अतिपरिचयात अवज्ञा'...!! या दोघींचं तसंच झालं.. एक एक गोष्ट
खटकायला लागली.. 'पुढे शिकायचंय' असं तेजल ने म्हटले की 'आता काय होणार आहे शिकून??
मला गोड बातमी हवी आहे' असं 'मोठ्ठी टिकली' (सासूबाई) म्हणायच्या! तिला ऑनलाइन शॉपिंग
ची भारी आवड! ते करताना पाहिल्यावर मोठय्या टिकलीच्या भुवया आकाशाला भिडायच्या! 'काय
आजकाल च्या पोरी!' असा शेरा हमखास यायचा. राकेश ने मध्ये मध्यस्ती करून तेजल ला शिकवण्याची
परमिशन मिळवून दिली.. पण एके दिवशी कहर झाला.. तेजल परीक्षेला जात असताना सासूबाई चक्कर
येऊन पडल्या..बिचारी तेजल, काय करणार ती तरी?? बुडवली परीक्षा, बसली घरी आणि केली सासूबाईंची
सेवा.. पण खरी गोष्ट आता सुरू झाली.. एकदा सासूबाईंच्या खोलीबाहेरील फरशी स्वच्छ करत
असताना सासूबाईंचे फोनवर मैत्रिणीसोबत चे बोलणे ऐकले..'अगं रमा, तुझी युक्ती कामी आली..
ती नाहीच गेली पेपर ला..काय acting केली मी सांगू तुला..!!' इति सासूबाई. तेजल चा मात्र
पारा चढला आणि तडक आतमध्ये जाऊन भडभडून आल्यागत सासूबाईंना बोलली.. तिचा आत्मा शांत
झाला पण समोर मात्र आग पेटली होती.. हात उगारला गेला, नको नको ते शब्द ऐकू आले आणि
'संस्कार'नावाच्या हत्याराने आपले काम चोख बजावले..भरात भर एवढी की राकेश सुद्धा वैतागून
दोघींची बाजू ऐकेनाशी झाला..! मग घरी असंख्य वादावादी, रडणे गागणे, शिव्या शाप.. काही
विचारु नका!
मीनल.. तुमच्या आमच्या सारखीच गोड मुलगी..बिचारी चं लग्न झालं
तेव्हा काही घरकाम येत नव्हते तिला.. मग सासूबाई मैदानात उतरल्या.. उचलली तलवार आणि
योद्धा बनल्या.. म्हणजेच घरकामाची अ आ इ ई पूर्ण शिकवली तिला.. आज मीनल सुगरण आणि गृहकृत्यदक्ष
तर आहेच पण सोबतच स्वतः चा छोटासा business सुद्धा सांभाळते!
जुई.... अगदी फुला प्रमाणे नाजूक...लग्नाची, सुखी संसाराची स्वप्न
उराशी बाळगलेली!पण म्हणतात ना, नशीब मनाप्रमाणे चालत नसते.. तसंच झालं.. अर्ध्यावर
सोडून गेला तिचा शेखर तिला.. ना वर्तमानाचे भान! भविष्यकाळ मात्र आ वासून उभा होता..
सासूबाई आणि सासरे सुद्धा संकटाने बिथरून गेले होते.. पण 'कूल' शेखर चे 'सुपरकूल' आई
बाबा होते ते! जुई ला पुढे करिअर ला हातभार लावायचा ठरवला! तिला नाचा चं भारी वेड!
आणले घुंगरू, जोडले काही मित्र/मैत्रिणी आणि सोडले तिला त्या रंगमंचावर..! कोमेजलेली
जुई परत एकदा बहरली आणि तिचा सुगंध आसमंतात दरवळला! तिच्या सुपरकूल सासू सासर्यांनी
तिचा बालमित्र सौमित्र सोबत तिचं थाटामाटात कन्यादान करून देऊन तिची पाठवणी केली!
हे तीन वेगळे प्रसंग! चाणाक्ष वाचकांनी विषय ओळखला असणारच! तमाम
स्त्री वर्गाची दुखरी नस म्हणजे 'सासूबाई'! अनेकदा नव्या नवरीचं घरात वाजत गाजत स्वागत
होते.. पण.. जेव्हा 'सासूबाई' असं लेबल लागते तेव्हा मान, अपमान, वर्चस्व, सत्ता या
सारखे 'षड्रिपु' डोकं बाहेर काढतात! नंतर याचं ओझं वाढत जाते आणि नात्यामध्ये घुसमट
येऊ लागते! लग्नाचा अर्थ काय हो? लग्न म्हणजे तडजोड की दोन भिन्न कुटुंब आणि त्यातील
व्यक्ती यांना जोडणारा दोर? ते म्हणतात ना, भावी पती पत्नीची पत्रिका या पेक्षा सासू
व सुनेची पत्रिका जुळत असेल तर घरातून सुमधुर बासरीचे सूर सदैव ऐकू येतील!
एका घरात अतिशय मॉडर्न सासूबाई होत्या.. सुने सोबत शॉपिंग, किटी
पार्टी,जीन्स घालणे, वन पीस घाल, दारू (वाईन) पी असं सर्व साग्रसंगीत सुरू होते.. तिसर्याच्या
नजरेत हे म्हणजे अतिशय 'सुखी' कुटुंब असं चित्र बनले असते.. पण नवरोजी.. त्यांना स्पेस
चा थोडा issue येऊ लागला, दोघींमध्ये सुद्धा जळफळाट होऊ लागला.. आणि आधीच वेगळे राहिलो
असतो तर एकमेकींची किंमत राहिली असती या दोघींना असं वाटू लागले..
एका घरात 'सासूबाई' या म्हणजे कुटुंब प्रमुख! महिन्याचा पगार आला, द्या सासूबाईंना
; अमुक अमुक नातेवाईकांकडे जायचंय , विचार सासूबाईंना, रोजच्या खर्चाला पैसे हवे, घ्या
सासूबाईंकडून! एक वेळ अशी आली की बिचाऱ्या सुनेला नैराश्याने ग्रासले.. मग गोळ्या औषधं
यांचा मारा आणि दुसरीकडे सासूबाईंचं 'वर्चस्व' अजून रंग दाखवू लागलं!
वरील उदाहरणांवरून एक आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की माणूस हा कधीच
'पूर्ण'नसतो.. त्यामुळे कुणाकडूनही अपेक्षा ठेवताना विचार करावा! संयम, मोकळेपणा,संवाद
आणि मर्यादा ही नात्याची चत:सुत्री आहे ती पाळली गेली पाहिजे!
सासूने सुनेला आणि सुनेने सासूला सांभाळून घेतले पाहिजे... सुनेला
तिची तिची स्पेस दिली पाहिजे.. सासू सुनेच्या नात्यांमध्ये 'आदर' असला पाहिजे... बऱ्याच
ठिकाणी सासूबाई एकट्या असतात,अशा घरात नवऱ्याची कुचंबणा होते.. कुठून गोळीबार केव्हा
होईल हे सांगता येत नाही..त्यामुळे बऱ्याचदा असे नवरे व्यसनाधीन होत असतात यावर वेळीच
उपाय करणे उत्तम!
तेव्हा पुरुषांनो, ते म्हणतात ना, 'स्त्री ही क्षणभराची पत्नी
आणि अंतकाल ची माता असते' हे डोक्यात ठेवून काही गोष्टी आत्मसात केल्या जसं की, उत्तम
पटवून देण्याचं स्किल्, उत्तम स्वयंपाक करणारे हात, शॉपिंगमय डोळे, स्तुती करणारी जीभ
आणि शांत राहणारं डोकं...हे पंचसूत्र तुम्हाला नक्कीच आयुष्यात जिंकवू शकते.. बाकी
वर सांगितलेली सासू सुनेनी पाळायची 'चतुःसूत्री' ही सगळी अंधश्रद्धा आहे..!