Pages

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

"बाप-लेक"



नक्कीच वाचण्यासारखे 👇
ज्यांची मुले - मुली 18+ आहेत त्यांनी तर हा लेख नक्की वाचावा
बाप-लेकयुवक-पालक मेळाव्यातील युवक-युवतींच्या नव्याच समस्या ऐकून मन विदीर्ण झालं. आई-बाबांचा संपूर्ण आदर राखून ही मुलं फार धिटाईनं बोलत होती. आदिती नावाची मुलगी म्हणाली, 'दोघंही खूप बिझी आहेत, हे मान्य आहे; पण दोघं जेव्हा घरात येतात तेव्हाही ती दोघं विसरूनच गेलेली असतात की त्यांना एक मुलगीही आहे. एकजण लॅपटॉपवर ऑफिस उघडून तर दुसरा मोबाइलवर. अक्षरश: आमच्या दोन हजार स्क्वेअर फिट फ्लॅटच्या घरात मी पोरकी आहे! आणि अचानक ती रडायलाच लागली. सार्‍यांचेच डोळे भरून आले.
सौरभ उठला. त्यानं हातात माईक घेतला. आदितीच्या बोलण्याचं सूत्र घेऊन तो म्हणाला, 'खरंच आहे आदिती जे म्हणाली ते. आम्ही चॅटिंग करतो. व्हॉट्सअँपवर खूप रमतो, ते चूकच आहे; पण ती गरज आम्हाला का वाटते. याचा विचार कुणी केलाय का? आमचा सारा दिवस कसा गेला. हेसुद्धा पप्पा-मम्मी विचारत नाहीत. एक तर सीरियल्स नाही तर मोबाइलवर. मग आम्ही आमचं मन शेअर कुणाशी करायचं? आमचं चुकत असेल; पण त्यांचं तरी आम्हाला इतकं विसरणं बरोबर आहे का?'
सौरभ घुश्श्यातच खाली बसला. वातावरणात एक तणाव पसरला.
तन्वी विचार करत होती. बोलू की नको? हातसारखा वर पट्कन खाली घेत होती. निवेदिकेनं तिला विश्‍वासात घेतलं -
'ये, बोल मोकळेपणानं.'
तन्वी आणि ती जे म्हणाली समुपदेशकांना एक आव्हानच ठरावं.
तन्वी म्हणाली, 'आमचं आताचं वय अठरा ते वीस दरम्यान आहे. या वयात प्रत्येक मुलीला मुलाबद्दल अँट्रॅक्शन वाटतं आणि हे बट नॅचरल. वाटतंच. कुणा पुरुषाच्या आपण जवळ असावं; पण त्यात सारा भाग सेक्श्युअल नसतो. एक सेफ्टी फील करतो आम्ही. एक पुरुष फ्रेंड आहे आमचा. खरं सांगू? यात एक वेगळं सांगायचंय मला. आम्हा मुलींना आमच्या बाबांबद्दल आईपेक्षाही जवळीक वाटते. याचसाठी; पण बाबांना वेळ नाही. घरी असले तर ऑफिस डोक्यात. येणार रात्रीच्या केव्हा तरी. नाही तर फॉरेन टूर.' तन्वी थोडी
थांबली. दाटलेला गळा, आवंढा गिळला तिनं. मग धीर करून म्हणाली, 'प्रत्येक मुलीला तिचा बाबा मित्र म्हणून मिळाला नां तर आम्ही इतर पुरुष फ्रेंड करणारही नाही. आमचे बाबा आमचे मित्र व्हायला हवेत. आमच्या मनातलं आम्ही त्यांना खूप मोकळेपणाने सांगू शकायला हवं. त्यांनी आम्हाला आमचं चुकत असेल तर समजून सांगायला हवं. कित्येक प्रश्न सुटतील. काही प्रश्न तर निर्माणच होणार नाहीत. आज इथं माझे बाबा समोर आहेत. मी त्यांना सॉरी म्हणते. मी चुकत असेन, हे सांगून तर मला माफ करा. मी हात जोडते. फक्त माझे मित्र व्हा!'
तन्वीसह सारे सभागृह अश्रूत बुडून गेले. त्या आसवात फक्त दु:खाचे कढ नव्हते. नव्या पिढीचं आक्रंदन होतं. पुष्कळ वेळ एक नि:स्तब्धता होती. मग शर्वरी उठली. आता ही काय बोलते आहे याची उत्सुकता होती.
शर्वरी प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची. उंच-सडसडीत. डोळे बोलके, स्माईली, बोलायला लागली. 'माझे बाबा मात्र माझे चांगले मित्र आहेत. खूप गप्पा करतात. सिनेमालाही नेतात. मित्र-मैत्रिणींशीही छान बोलतात. मला अभिमान वाटतो. माय डॅड इज बेस्ट डॅड! मीच त्यांच्याशी आतापर्यंत वाईट वागत होते. उगीच रागावत होते. हट्टीपणानं खूप काही मागत होते. आज सर्वांच्या समोर मी म्हणते - सॉरी डॅड! सॉरी रिअली सॉरी!' शर्वरीनं सर्वांच्या समोर आपल्या बाबांची माफी मागितली. सुसंवादाच्या या कार्यक्रमात एक मन मोकळं होत आहे, याचा मला आनंद झाला; पण हा आनंद काही क्षणच टिकला. पालकांमधून एक गृहस्थ उठले. त्यांचे डोळे भरलेलेच होते. व्यक्तिमत्त्व उमदं होतं. जीन्सची पॅण्ट, टी-शर्ट यामुळे वयापेक्षा तरुण वाटत होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली.
'आता शर्वरी बोलली ना, तिचा मी बाबा.' मग एक दीर्घ श्‍वास घेऊन ते म्हणाले, 'आज माझ्या लेकीनं मला हरवलं. पूर्ण हरवलं. शी इज् रिअली ग्रेट! तिनं जे जे माझ्याबद्दल सांगितलं, त्याच्या अगदी उलट आहे मी. मी तिच्याशी अगदी इथं येईपर्यंत वाईट वागलोय. कधीही तिला प्रेमानं मी जवळ घेतलं आहे हे मला आठवत नाही. सिनेमा तर जाऊच द्या, एकत्र जेवणही खूप वर्षांत केलेलं नाही. फक्त मार्कांच्या चौकशा केल्या. कधी कुठून उशिरा आली की फक्त रागावलो न् खरं सांगतो. माझ्या या गोड लेकीला मी मारलं सुद्धा! शर्वरी, आज तुझ्या या बोलण्यानं मी बदललो गं, शर्वरी मी तुझी माफी मागतो. उद्यापासून - उद्यापासून तुझा हा डड्डा - तुझा फ्रेंड असेल, बेस्ट फ्रेंड!'
शर्वरी भावनावेगाने व्यासपीठाकडे धावत गेली सर्वांच्या समोर बाप-लेक एकमेकांच्या कुशीत स्फुंदताना सारं सभागृह रडत होतं.
नव्या मुलांचं दु:ख घरात असूनही बेघर! आई-बाप असूनही पोरकेपणाचं!
खरंच हे वाचून आपण काही समजून घेणार आहोत का?
आपण सारे या नव्या पिढीचे मित्र होणार आहोत का? तसे होऊया. ही पिढी खरंच गोड आहे. अति बिझीपणाचा डायबिटीस झाल्यामुळे हा गोडवा आपल्याला कळत नाही इतकंच!
"बाप-लेक"

वात अहंकाराची... *


वात अहंकाराची... *

आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं.
          पण रुसवाफुगवा ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही?
                  जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते.
यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वत:चा कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वात पेटतीच ठेवतो. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करायला हवा.

अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तोच मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला.

       🌿   - डॉ. शिरीष राजे
   (मानसशास्रतज्ञ, नाशिक)

सोनसाखळी


सोनसाखळी 

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.
सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्या जवळ निजायला घेई, तिच्या जवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.

सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे, "बाबा, मला भरवा. मी मोठी झाल्ये म्हणून काय झाले?" मग प्रेमाने बाप तिला घास देई.

सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत, सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला, "हे बघ, मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको, मारु नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर."

सावत्र आई म्हणाली, "हे मला सांगायला हवे? तुम्ही काळजी नका करु. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन, कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन, वेणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरुप परत या."

सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरु झाला. ती सोनसाखळीचा छळ करु लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी, भांडी घाशी. ती विहिरीवरुन पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.
एक दिवशी तर तिच्या कोवळ्या हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात, त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरु झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईने डाळिंबाचे झाड लावले.

काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा, तेथे कोणाचे काय चालणार?"

बाप दुःखी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना, झोपताना डोळ्यांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे.

त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी.

शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळींब. कलिंगडा एवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणाच तोच आतून गोडसा आवाज आला, "हळूच चिरा, मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले.

बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा, बाबा, पुन्हा मला सोडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीगत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली, "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही, असत्य पचत नाही,

 मला कळले. मी नीट वागेन."

पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीने वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.

देखणी नाती



किती देखणी असतात ना नाती

टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई
घोडा घोडा करणारे बाबा
बाळाला मांडीवर घेऊन बसणारी आत्या
न रागावता लाड करणारी मावशी
'मुलीला मांडवात घेऊन या' चा पुकारा झाल्यावर
डोळे भरून येणारे मामा
मामी

माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत
भरल्या आवाजात 'येत जा गं घरी' म्हणणारी
काकू नि गाडी वरून फिरवायला नेणारा काका

सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी मैत्रिण
आणि बाकी काही तक्रार नाही हो पण फार कमी जेवते तुमची मुलगी '
असं फोनवर सांगणारी
प्रेमळ सासू,

वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा नवरा
आणि
'आमटी फक्कड झालीय गं
माझ्या आईची आठवण करून दिलीस' म्हणणारा
सासरा

ऑफीसातून परतल्यावर 'बस घटकाभर' म्हणत
वाफाळता चहा पाजणारे
आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे
शेजारी

चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी पत्नी

मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे बाबा
आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी
नातवाला फिरवून आणणारे आबा

फेसबुकवर चिडवणारा
पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा मेहुणा

इकडे तिकडे पळत हैराण करणार्या नातवाला
गरमागरम वरण भात मायेने भरवणारी
आजी

किती स्मार्ट दिसतात ना?
पांढराशुभ्र युनिफाॅर्म घालून
हाॅस्पिटलमध्ये धावपळ करणारी सिस्टर

आश्वासक हसत
आपल्या पेशंटचा शब्द न शब्द ऐकणारा  डाॅक्टर

ऑफीसात उशीरा पर्यंत काम करताना अचानक घड्याळाकडे लक्ष जाताच
'इसे कल निपटाते है, its too late! you want vehicle?' विचारणारा बॉस...
या सगळ्या सुख दुःखात सामील होणारा मित्र परिवार

किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास...!!!
         हसत  जगा व नाती जपा आयुष्य खूप सुंदर आहे

बौद्धिक वारसा



फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात.
एका साध्या काठीला फेव्हिक्विकचे चार थेंब लावून दोन मिनिटांत मासे पकडणारा तो खेडवळ माणूस पाहिला की, त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.

स्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. लिहिता येणं आणि शैलीदार लेखन करणं यांत जसा फरक आहे, तसाच फरक काम करण्याच्या पद्धतीतही दिसून येतो.
साक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.

लिहिता-वाचता न येणाऱ्या माणसांनीच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे दुर्गम आणि अजिंक्य किल्ले उभारले, पुष्करणी बांधल्या, बारा-बारा मोटांच्या विहिरी बांधल्या. तीन-तीनशे वर्षे ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांना अखंड तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती, पण चतुर मात्र नक्कीच होती.
आता मात्र परिस्थिती उलटी फिरली आहे. पुस्तकी साक्षरता आली खरी, पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलं.

देवगिरी किल्ल्यावर अमुक एका ठिकाणी टाळी वाजवली की तमुक ठिकाणी तो आवाज कसा पोहोचतो, याचं कोडं आजही भल्याभल्यांना उलगडलेलं नाही. अजिंठ्याची चित्रं आणि त्यांचे रंग, कोणार्क-हंपी ची शिल्पकला, काडेपेटी एवढ्या डबीत मावणारी अख्खी नऊवारी अस्सल रेशमी साडी, तांब्या-पितळेच्या नक्षीदार वस्तू पाहिल्या की, भारतीय बुद्धिमत्तेचं मनोज्ञ दर्शन घडतं.

कोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव आजही तोंडात बोटं घालायला लावतो. ते मंदिर घडवणारे शिल्पकार कोणत्या महाविद्यालयातून शिकलेले होते? सालारजंग वस्तुसंग्रहालयासारखी ठिकाणं पालकांनी आवर्जून पहावीत आणि डोळसपणे आपल्या मुलांना दाखवावीत अशी आहेत. कारण, ती केवळ कला-कुसर नाही, तर भारतीय बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे. केरळीयन पंचकर्म आणि अभ्यंग ज्यांनी विकसित केलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपण लक्षात घेतला पाहिजे. पंचांग ही आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धिमत्तेची पावतीच आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर सर्वसंगपरित्याग करायला शिकवणारी आपली संस्कृती आज सबंध जगाच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय आहे. हीच तर आपल्या बुद्धिमत्तेची कमाल आहे.
कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्राविण्य हे कैक पटींनी अवगत करायला कठीण असतं. म्हणूनच, ते दुर्मिळ असतं.

येरागबाळ्याचे काम नोहे असं जगद्गुरू संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, त्यांचा गर्भितार्थ आपण समजून घेतला तर बेरोजगारीसारखी समस्या आपल्याला भेडसावणार नाही. दुसऱ्याचं अंधानुकरण न करता ज्यानं-त्यानं स्वत:चा वकुब ओळखावा, मग जीवघेणी स्पर्धा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचा त्रासच नाहीसा होईल, हेच तुकोबाराय सांगत असावेत.
आपण मात्र ते समजून न घेता, केवळ ‘घोका आणि ओकाच्या स्पर्धा भरवत बसलो आहोत.

अर्जुन, एकलव्याचा वारसा सांगणारा आपला देश आज तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर स्वत:चं कर्तृत्व का सिद्ध करू शकत नाही? बहिर्जी नाईकांसारखी अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेची माणसं आपल्याकडे होती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घडवणारं जगातलं सर्वोत्कृष्ट हेरखातं आपण का विकसित करू शकलो नाही?

आपल्याकडच्या पालकांनाच. आपला खरा  वारसाबौद्धिक पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. आपला बौद्धिक परंपरेचा इतिहास आपण पार विसरून गेलो, हीच आपली मोठी घोडचूक झाली आहे.

रामानुजन,भास्कराचार्य,जगदीशचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच्यावरचे माहितीपट घराघरातून दाखवण्याऐवजी आपण घराघरातून विवाहबाह्य संबंध आणि पाताळयंत्री सासू-सुनांच्या सिरीयल्स दाखवायला लागलो, तिथंच आपण चुकलो. न्यायमूर्ती रामशास्त्री किंवा चाणक्य यांच्या गुणांना मनावर बिंबवणारे उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सिनेमे आम्ही केलेच नाहीत, आम्ही सैराट,शाळा,टाईमपास,फॅंड्री यांच्यातच रमलो, तिथंच आपण चुकलो.
कौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता आलं असतं. ते केलं असतं, तर शेतकऱ्याला कर्जबाजारीपणही आलं नसतं आणि त्यानं आत्महत्याही केली नसती. आपण ते केलंच नाही.
शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, खंडोजी खोपड्याचे हात-पाय कलम केले, त्यांच्या कठोर शिस्तीचं आणि नैतिकतेचं महत्व आपण आपल्या मुलांना नीट शिकवलं का? ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का? आपण ते केलंच नाही.
मग, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पिढीला उत्तमरित्या घडवण्यासाठी आपण नेमकं केलं तरी काय? एक पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नीट ओळखली आहे का?

गेलेली वेळ पुन्हा परत येईल का? येणार नाही.
डोळ्याला उघडपणे दिसणारी वस्तुस्थिती आणि आपला भूतकाळ यांचं नातं जोडण्याचा थोडासा तरी प्रयत्न करूया. आपल्याला ते प्रयत्नांनी जमेल.
व्यवहारात चतुर, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रियता या चार गोष्टींचा अंगिकारच आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवेल...

मंथन


मंथन
🌸सायीला विरजण लावून ठेवले होते पण घुसळायला वेळच मिळत नव्हता. शेवटी एकदाचा मुहूर्त मिळाला नि दही घुसळायला घेतले. हळूहळू लोणी जमा होत होते.

रवीने मंथन करताना विचार आला का मनाचेही असेच असते ना दह्यासारखे. रोज वेगवेगळ्या विचारांची साय जमा होत रहाते. एकावर एक विचार , आठवणी जमा होत रहातात. त्यांचा गुंता व्हायच्या आधी एकदा निवांतपणे मनाचेही मंथन करावे.

मन घुसळायला घेतल्यावर चांगल्या विचारांचे लोणी एकत्र येऊ लागते. ते नीट बाजूला काढावे. वाईट कटू आठवणींचे ओशट आंबूस ताक नकोच, ते खुशाल ओतून द्यावे.

काही आठवणी पक्क्या असतात. त्या अगदी बुडाशी घट्ट चिकटून बसतात. त्याना अलगद बोटांनी निपटून काढायचे. ते खास आठवणींचे लोणी मग काळाच्या विस्तवावर कढवत ठेवायचे. काही बिन महत्वाच्या आठवणींची वाफ होते ती दवडू द्यायची. वास्तवाच्या विस्तवावर ज्यांचा निभाव लागत नाही त्याची बेरी होते. अशा आठवणी सोबत घ्यायच्याच नाहीत. त्यांची सोबत तेवढ्यापुरतीच. या सर्वातून तावून सुलाखून निघालेल्या निघालेल्या खासम् खास आठवणींचे कणीदार रवाळ तूप होते. ते मात्र मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवायचे. त्याचा घमघमाटच पुरेसा असतो आयुष्य खमंग करायला.

मग हेच अमूल्य आठवणींचे टिकाऊ तूप आपले जीवन स्निग्ध करते. जेव्हा गरज पडेल तेव्हा वंगणाचेही काम करते
एकूणच आयुष्य कसे चवदार करते

वेडेपणातले शहाणपण



वेडेपणातले शहाणपण

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.

शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.

मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.

तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.

डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.

तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना " वॉटर मॅन ऑफ शहादा " असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.

नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "

खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता  शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा