Pages

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

मनाचा संयम


 मनाचा संयम
-----------------------
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे,
तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?' विणकर उत्तरला - '
अवघे दहा रुपये !' त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला -
 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?'
अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !' त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?' प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !'
 तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला.
 विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला. तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला -
'आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.' यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला - 'बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस...'
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला. तो खिशात हात घालत म्हणाला - 'महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो.
 बोला याचे काय दाम होतात ?' विणकर म्हणाला - 'अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस... मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?
' आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला मुलगा म्हणाला, 'महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा...
मी ताबडतोब अदा करतो..
ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !'
त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला -
"हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की,
एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सुत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.
' मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू ! त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.
 आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले.
 पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 'हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटत्ये आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.' पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला
 आणि म्हणाला, 'हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन.
पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.'
...... आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खूळखूळतोय, आपल्या घरीही आपण घरी पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष
्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या 'ग' ची बाधा ही झालीय.
ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये.

  दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास होत हे वेगळे सांगणे नको...
----------------------------------------------

"विषामृत"


 "विषामृत"

हा खेळ आम्ही खेळायचो ! ज्याच्या वर राज्य आहे तो इतरांना हात लावून 'विष'म्हणायचा आणि मग विष बाधा झालेला एका जागी बसून घ्यायचा ,इतर मग राज्य असलेल्या मुलाला चुकवून त्याला हात लावून ' अमृत ' म्हणायचे आणि तो परत खेळात पुनर्जन्म झाल्या मुळे पाळायला लागायचा 😊
    पालकांवर राज्य आहे आता ,😊 आपल्या मुलाला ते विष देतात की अमृत आपण पाहुयात 😊
 " आई मी जाणार नाही स्कूल ला !"
  " सोनू ,आपण येतांना कॅडबरी खाऊ !  आता तरी जा !"
   ------- विष !!!

" मला तो बोर्ड game घेऊन दे ना आई !"
" देईन ना बेटा ,पण आधी प्रॉमिस कर तू रोज सायकल चालवणार ग्राउंड वर !"
   ---- अमृत !!!
 " बाबा ,रिमोट द्या ना मला कार्टून पहायचे आहे !"
 " अरे आयडिया आली मला ,चल तुझ्या मित्रांना घेऊन मी पण क्रिकेट खेळतो ! "
    --- अमृत !!
" आई आज आपण पिझ्झा ऑर्डर करूयात का ?"
" हो ,चालेल ना ,त्या बरोबर कॉल्डड्रिंक पण ऑर्डर करू , जर पचन होईल मग !"
----विष
 " आजी ,मला भूक लागलीय ,पैसे दे ना ,मी कुरकुरे आणतो !"
 "हे घे ! माझा लडोबा ग !"
---- विष
  
     ही काही उदाहरणे आहेत ,तुम्ही अजून आठवून पहा !😊 मी विष म्हणते कारण त्यामुळे मुलाच्या वाढी वर डायरेक्ट परिणाम होतो , ढोबळ मानाने लक्ष्यात घ्या .....
1 चॉकोलेट 1 चपाती ची भूक कमी करते , एक मोठी कॅडबरी पूर्ण दिवसाची भूक कमी करते , ह्या empty calaries असतात ,तात्पुरते energy देतात ,पण वाढीच्या दृष्टीने शून्य उपयोग !!
  गोड खावे वाटले तर मनुके , गूळ , खजूर द्या , ड्राय फ्रुट्स द्या , खारीक द्या , तिखट वाटले खावेसे तर घरी भरपूर शेंगदाणे व खोबरे टाकलेला मस्त चिवडा द्या , अजून खूप रेसिपीज आहेत त्या you tube वर पहा आणि बनवून ठेवा ,पण शक्यतो बिस्किट्स ,चॉकलेट्स चिप्स आणि तत्सम इतर फास्ट फूड देऊ नका !
  घरचे ताजे शिजवलेले अन्न --- अमृत
  बाहेरचे फास्ट फूड ---- विष !
😊😊😊��😊😊😊
 
 राज्य तुमच्यावर आहे पालकांनो , तुम्ही ठरवा काय द्यायचे ते 👍👍

पेहराव



 व्यक्तिमत्व विकास,पेहराव आणि अंतर्मन ....
(लेखिका: सुषमा सांगळे-वनवे यांच्या पुस्तकातील हा एक उतारा) (हा उतारा जसाच्या तसा शेअर करण्यात यावा अनेक वृत्तपत्रातूनही याचे प्रकाशन झाले आहे..)
आपले फर्स्ट इम्प्रेशन पाडणारा महत्वाचा कोणता घटक असेल तर अर्थातच तो म्हणजे आपला पेहराव.
पेहराव म्हणजेच आपण जे कपडे घालतो ते.
हाच पेहराव आपले व्यक्तिमत्व घडवतो. कसे ते या लेखातून पाहुयात..
      लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कपड्याची आवड असते.लहानपणी साहजिकच कपड्याबद्दल कांही समजत नसते फक्त आमक्याला असा ड्रेस आहे मला पण तसाच घे ना एवढाच हट्ट आपण आई बाबांकडे करत असतो.हळूहळू मोठे झाल्यावर टी. व्ही.सिरीयल मधील कपडे पाहून मित्र मैत्रीणींचे कपडे पाहून आपण खरेदी करू लागतो.हीच सवय मोठे झाल्यावर हि कायम राहते.यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे शोभून दिसतात हे पाहिलेच जात नाही.मग ते कपडे कितीही महागडे घेतले तरी त्याचा उपयोग होत नाही.
         आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग कशा प्रकारचे कपडे घ्यावेत? ते हि सांगते जर आपण रंगाने गोरे असू तर डार्क रंगाचे कपडे नक्कीच खुलून दिसतात व रंग सावळा असेल तर फिकट रंगाची कोणतीही शेड उठावदार दिसते सहसा कपडे फ्रेश कलरचे निवडावेत उदा.स्काय ब्लू कलर,फिकट गुलाबी असे कलर कोणत्याही व्यक्तीला छानच दिसतात.लायनिंगचे कपडे शक्यतो उंच व्यक्तींनी घालू नयेत.त्यामुळे त्या अधिक उंच दिसतात तर असे कपडे कमी उंचीच्या व्यक्तींना शोभून दिसतात.तसेच साड्या खरेदी करतानाही साडी वर मोठ्या फुलांची डिझाइन असेल तर त्याने पोक्तपणाचा लूक येतो.त्याऐवजी प्लेन साडीत नाजूक वाटते प्लेन साड्या कोणत्याही वयोगटातील महिलांना उठून दिसतात.बारीक महिलांनी शक्यतो फुलणाऱ्या स्टार्च च्या साड्या निवडाव्यात त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सुंदर दिसते.
      थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक व्यक्ती हि वेगळी असते त्यामुळे त्याला जे छान दिसते ते मला हि छान दिसेल..या भ्रमात राहू नये .स्वतःला जे छान दिसतात असेच कपडे परिधान करावेत.
         आपले अंतर्मन व पेहराव यांचा खूप जवळचा संबंध आहे.आपल्या अंतर्मनाला सारखे वाटत असते कोणीतरी छान म्हणावे जर आपण आपल्या रंगाला शोभतील असे कपडे घातले तर नक्कीच आपण छान दिसू लागतो साहजिकच कळत नकळत आपल्याला आपली मैत्रीण अथवा घरचे तू आज छान दिसतेस असा रिमार्क मारतात.व आपले मन प्रसन्न होते ज्यावेळी आपले मन प्रसन्न आनंदी असते त्यावेळी आपली कार्यक्षमता व उत्साह वाढलेला असतो ज्यावेळेस आपला उत्साह वाढतो तेंव्हा आपल्याकडून उत्तम प्रकारचे कार्य घडते.म्हणूनच बऱ्याच वेळा मोठमोठ्या कंपनीत कपड्यांकडे विशेष लक्ष दिले जाते.
       बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला काय तो बावळटच वाटतो किंवा किती अपटुडेट असते ती असेही एखाद्याला कळत नकळत लेबल लावतो म्हणजेच आपला पेहराव आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असतो.
      मी आता थोडेसे 30-40 वयाच्या महिलांबाबत बोलते या वयातील महिलांना सहसा उत्साह आहे असे जाणवत नाही कारण याचे हेच असते. बऱ्याच वेळा त्या सहज बोलून जातात,"जाऊ दे आता काय राहिले आहे ?,झाले ना सर्व". नेमक्या याच गोष्टीमुळे त्या स्वतः कडे लक्ष देत नाहीत व चॉईस नीट करत नाहीत परिणामी त्यांच्यातील उत्साह अधिक अधिक कमी होत जातो व त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. मनाला एक मर्गळ आल्यासारखे उगीच वाटू लागते.या उलट आपल्याला शोभेल असा पेहराव त्याला साजेशी वेशभूषा ,केशभूषा केल्यास नक्कीच मनात एक उत्साह भरतो व साहजिकच घरातले हि म्हणून जातात तू एवढे काम करूनही थकत कशी नाहीस,परिणामी आपल्या कुटुंबातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहण्यास मदत होते.
        लग्न प्रसंगी,सणावाराला नवनवीन कपडे का घालण्यात येतात ?कारण त्यामुळे आपले मन प्रफुल्लित व उत्साहवर्धक होते.त्यामुळे आपल्या मनाची स्थिती चांगली राहते.साहजिकच घरातील वातावरण प्रसन्न होते.मुलगी बघायला जाताना किंवा मुलगी दाखवतानाही हि त्यांच्या पेहरावाकडे विशेष लक्ष दिले जाते.तसेच महत्वाचे म्हणजे नोकरीच्या मुलाखती वेळी सुद्धा आपण पेहरावाचा बारीक विचार करतो.अशापध्द्तीने जीवनातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगी पेहरावाकडे लक्ष दिलेच जाते.अगदी अंत्ययात्रेसमयी सुद्धा पेहराव पाहिलाच जातो त्यावेळी सुद्धा प्रेताला कफन म्हणून पांढऱ्या कपड्याची निवड केली जाते..
     थोडक्यात सांगायचे तर जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगापासून ते मृत्यू नंतर हि हा पेहराव आपली साथ सोडत नाही मग अशा महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालेल का?
    मग द्याल ना लक्ष पेहरावाकडे...
लेखिका -सुषमा सांगळे-वनवे
उच्चश्रेणी मुख्याध्यापिका,साहित्यिका सिंधुदुर्ग,देवगड
मो.नं.9420312651

प्रश्न एक उत्तर अनेक ...



प्रश्न एक उत्तर अनेक ...

तो अति हुशार आणि ती जरा साधी.....नीटनेटका संसार करणारी. दिसायला सुंदर नसली तरी चार चौघींमध्ये उठून दिसणारी.
संसार संथ गतीने चालला होता.... म्हणजे तो हुशार असुन हुशारीचा खूप फायदा न घेतलेला आणि अगदी प्रिंसिपलच्या चौकटीत जगणारा . इतकं की कंपनी कडुन दर वर्षी मिळणाऱ्या व्हॅकेशन -पॅक पण नं वापरणारा. तिने दर वर्षी म्हणावं की ह्या वर्षी जाउयातना कुठे आणि त्याने नेहमीप्रमाणे उत्तर द्यावं "अगं मी ज्याचे पैसे घेतो ते काम पूर्ण झालं नाही तर कंपनी जे फुकटात देते ते कसं घेणार . वेळेत पूर्ण झालं काम तर नक्की जाऊ" . आणि वेळेत काम संपण्याचा कधी प्रश्नच नव्हता कारण एक प्रोजेक्ट संपला कि दुसरा सुरु व्हायचा. बरं, इतकं काम करून कधी प्रोमोशन किंवा पगार वाढ वगैरे कामा प्रमाणे नाहीच ...ते कंपनीच्या नियमानुसारच होणार. अर्थात हे फक्त त्याच्या पुरतं . कारण तो कधी बॉसशी या बाबतीत बोलणार नाही . स्वतःहून या विषयी बोलायला अपमानास्पद वाटायचं. एकंदरीत काय तर नीरज आपल्या चौकटीत आयुष्य जगत होता. तो स्वतः खुश असेल तर ते पण ठीक होतं पण त्याला कळायचं की तो त्याच्याच बनवलेल्या आयुष्याच्या प्रिंसिपल्सने मागे पडलाय आणि मागेच राहाणार . पण त्या चौकटीतून निघायची हिम्मत त्याच्यात नव्हती... हेच जरा चांगल्या भाषेत म्हणायचं तर  सगळे कामचोर, भ्रष्टाचारी, घूस खाऊ असले तरी त्याला तसं बनायचं नाही . त्याला त्याच्या सरळ आणि सच्या मार्गाने चालायचं होतं . 

तिची मात्र चिडचिड व्हायची. हा इतका हुशार असुन त्या हुशारीचा तो फायदा घेत नाही असं तिला सतत वाटायचं.  ती त्याच्या हुषारीच्याच तर प्रेमात पडली होती. आणि त्याच्या ह्या प्रिंसिपल्ड आयुष्याचा पण कंटाळ यायचा तिला .
बरं या प्रोजेक्ट्स मुळे त्याला खुप फिरावं लागायचं . म्हणजे तो फक्त शनिवार-रविवार घरी. तो घरी आला कि त्याला घरचं जेवण हवं असायचं. घरी आराम करायला आवडायचं आणि तिला अगदी त्याच्या उलट.

हे असच चालु होतं ..संथ गतीचा संसार . तिला मानसिक त्रास होत होता. एकलकोंडी झाली होती ती. बाहेरचं जग मात्र तिला नावं ठेवत होतं .... एवढं सगळं चांगलं असतांना हिला कसचा त्रास होतो कळत नव्हतं त्यांना. त्यातल्या त्यात बायका तर खूप नावं ठेवायच्या तिला... सुख बोचतंय तिला, इतका चांगला नवरा मिळालाय म्हणुन तिचा हा मानसिक त्रास सहन करतोय ..वगैरे वगैरे... तिला ते सगळं कळायचं आणि ती स्वतःला आणखीनच एकटेपणांत लोटून द्यायची .
परवा तिला कॅन्सर डिटेक्ट झाला . पहिलीच स्टेज ...नीरज तिला जास्त वेळ देऊ लागला. सुट्टी काढून कुठे तरी जाऊयात ८-१० दिवसांसाठी असं म्हणु लागला . ... ती मात्र खिन्न नजरेने त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देते.

मानसिक कॅन्सर तर तिला कधीच झाला होता . उपाय तेव्हाच करायला हवा होता. हो पण यात चूक कोणाची ते नाही कळत . या मॉडर्न जिवनात तिने तिचं बाहेर पडून मार्ग शोधायला पाहिजे, स्वतःची काळजी करायला पाहिजे असंही वाटत . तिला पूर्ण स्वातंत्र आहेच. पण तिने तिचं सगळं सुख दुःख नीरजशी जोडलंय. ...

आपलं सुखदुःख आपल्या साथीदाराशी जोडणारा हळुवारपणा जपावा की थोडं स्वार्थीच असावं... प्रश्न प्रत्येकाचा आणि उत्तर मात्र प्रत्येकाचं स्वतंत्र .

शाईत भिजलेले क्षण ...
 आपल्या माणसांना वेळ ध्या ,वेळ निघून जाण्या आधी , आई वडील बहीण भाऊ बायको मूल , नवरा हे सर्व पाहिले नंतर *फेसबुक , व्हाट्सअप्प करिअर
तुम्ही पैसे खूप कमावलं पण त्याचा उपभोग घ्यायला आपली माणसे नसणा

“ओव्हरअर्निंग..!”



[8:54 AM, 4/1/2018] O D. S. Powar Sir: ओव्हरअर्निंगचं व्यसन?

 “आपण सगळेच गरजेपेक्षा खूपच जास्त काम करतो आहोत असा मुद्दा गुगलचा सीईओ लॅरी पेज यानं एका भाषणात मांडला होता. पेजचं हे विधान अर्थातच हातावर पोट असलेल्या, घराचं भाडं भरण्यासाठी किंवा रोजचं दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी काम करणाऱ्या कामगारांना उद्देशून नव्हतं. पेजला अभिप्रेत होतं ते “ओव्हरअर्निंग..!” पुरेशा गोष्टी मिळवल्यानंतरही मौजमजेसाठी वेळ न काढता अक्षरश: अहोरात्र काम करुन पैसे मिळवणं या प्रवृत्तीला शिकागो विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर हीस या प्राध्यापकानं “ओव्हरअर्निंग म्हणलं होतं.

ओव्हरअर्निंग म्हणजे काय ते समजावून सांगताना हीसनं एक मजेदार प्रयोग केला होता. या प्रयोगात विद्यार्थ्यांनी “समोरचं बटण दाबून सुरेल संगीत ऐकायचं किंवा गोंगाट ऐकायचा यापैकी एक पर्याय निवडायचा होता. पाच मिनिटांच्या पहिल्या टप्प्यात एखादा विद्यार्थी जितक्या वेळा गोंगाट ऐकणं पसंत करेल (उदा. २० वेळा) तितकी चॉकोलेटस् त्याला मिळणार होती. पण या टप्प्यात ती चॉकोलेटस खायला मात्र त्याला परवानगी नव्हती.

 याच प्रयोगाच्या दुसर््या  पाच मिनिटांच्या टप्प्यात गोंगाट ऐकून मिळालेली चॉकोलेटस खाणं सक्तीचं होतं. दुसर््या  टप्प्यात काही विद्यार्थ्यांनी शांतपणे संगीत ऐकायचा आनंद सोडून देऊन गोंगाट ऐकणं पसंत केलं. आपण साधारण ३ ते ४ चॉकोलेटस खाऊ शकू असं कबूल केलेलं असतानाही त्यांनी १० पेक्षा जास्त चॉकोलेटस मिळवली. ती खाण त्यांना शक्य झालं नाही. ते सगळे “ओव्हरअर्नर्स आहेत असं हीसनं जाहीर केलं.

ओव्हरअर्नर्समध्ये आपण खर्च करु शकणार नाही त्यापेक्षा खूप जास्त मिळवण्याची एक खोलवर दडलेली आकांक्षा असते. कामाच्या अतिरेकानं त्यांना ताण आला किंवा जगण्यातला आनंद संपला तरी त्यांना त्याची तमा नसते.

सॉयकॉलॉजिकल सायन्सच्या एका अंकात याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. काम करताना आनंद वाटतो, भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते आणि इतरांपेक्षा जास्त संपत्ती मिळवावीशी वाटते ही कारणं सांगून भरपूर पैसे साठल्यावरही खूप काम करणारी माणसं हा लेख वाचून प्रत्येकाला आठवणार आहेतच.

पण त्या यादीत आपलंच नाव पहिलं आहे का? हे तपासायला हवं..!

काही राहिलं तर नाही ना !!!*



काही राहिलं
तर नाही ना !!!*

🌀जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
"काही राहिलं तर नाही ना?”

🌀वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

🌀खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे

🌀लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.
अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार

🌀६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला
"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार

🌀स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील

🌀एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.

एकुलती एक



अति लाड म्हणजे प्रेम का?

माझा  एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्‍याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत जा!".
बस त्यावरुन भांडण करुन बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावायांना बोलावून सांगितली की, ‘‘तिची हौस-मौज करा, पैसे कमी पडले तर माझ्या कडून घ्या!’’ हे सासूबाईंचे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट पण झाला. आता यात नक्की काय घडले?.. नक्की चुक कोणाची होती?.. मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने त्याचे करीयर स्वत:च्या हिमंतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढलेली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की, मुलगी एकुलती एक..
 लहानपणी ही मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसतांना पालक विकत घेत असायचे. ‘‘काय हवे माझ्या शोनुलिला?.. बार्बी गर्ल?’’ ओके..! लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधुन एखादी मागणी आली की लगेच हट्ट म्हणून ती पुरवली जायाची.. या पध्दतीने ती लहानाची मोठी झाली. आणि लग्नझाल्यावर वर्षभराच्या आत माहेरी आली.
 पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करणच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.
 ‘‘मागीतले की मिळतं’’ ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही,  ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्‍न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटतात. मुलाला एका डान्समधुन काढून दुसर्‍या डान्समध्ये अथवा दुसर्‍या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात.. या सर्वामधुन मुलांना आयती उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.
 पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची झालर देतात आणि ती झालर म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाही, मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल’’ आणि या कृतीलाच पालक प्रेम करणे असे म्हणतात.
 खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवढा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्यामध्ये होणे गरजेचे असते.
 आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं  मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड! अति प्रेम!! शिस्त ही प्रेमाची पहिलि कृति आहे.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा