Pages

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

अन्नहेपुर्णब्रम्ह....



अन्नहेपुर्णब्रम्ह....

   एका लग्नाला गेलो. जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते. स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या.
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला....
हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो...

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते.
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल"
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले..
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता..

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला,
"सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
"हि तुमची डिश आहे ना??
"होय, मी परत उत्तरलो.
"हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळी ही जेवू शकाल"

मी चकित झालो. थोडा रागही आला. त्याच रागात बोललो,
"आहो थोडे राहिले अन्न?
काय हरकत आहे.
नाही अंदाज आला.
म्हणून काय घरी न्यायचं"??

"रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ. आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा..

म्हणून आम्ही ही शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता "........ का ???

कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का??
"आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही. हे आम्हीच ठरविले आहे. त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा." मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज ही वाटली आणि पटतही होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय....
इतक्यात सौ. म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे. हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ....

( आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता....
एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....
?पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही ...) ??

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

व्यवसायाचे गूपित



व्यवसायाचे गूपित :

Business Formula - 1000 X 1000

श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.

मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.

अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.

श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.

श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.

एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

कारण त्याला 1000 X  1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.

हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.

हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.

हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.

माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.

वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला  बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला

ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.

तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला

श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो

मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.

जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा  का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.

अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवा

हा लेख कोणाचा आहे. माहीत नाही.सर्वांच्या माहीतीसाठी सादर करत आहे.

सौजन्य : महाराष्ट्र उद्योग समूह पूणे .

बाबाचे पैसे


बाबाचे पैसे

व्योम आता पाच वर्षाचा होईल 4-5 महिन्यात, त्याला वेळीच वस्तूंची पैशाची किंमत कळायला हवी असे अलीकडे वाटू लागलंय मला. आणि त्याचा परिणाम म्हणून तो जेव्हा काही फेकतो, मोडतो, तोडतो, पडतो.. बेजबाबदार पणे ढिल्ला वागतो, तेव्हा तेव्हा मी त्याला त्या त्या वस्तू विषयी, 'त्याला किती पैसे पडतात माहितीये का?.... बाबाला किती काम करावे लागते पैसे कमावण्यासाठी!.. हे जे तुटलं ना अत्ता त्या पैशात तू गेमिंग झोन मधे किती गेम खेळू शकला असतास माहितीये का.. अशा आशयाचे डायलॉग चिपकवत असतो.

(माझा मलाच राग येतो नंतर खरं तर प्रत्येक वेळी. त्याला एवढे बोललो म्हणून प्रासंगिक... जेमतेम साडे चार वर्षाच्या मुलाकडून मी किती अपेक्षा ठेवतो असा वैचारिक.... आणि पैसे कामावण्याकरता खूप कष्ट करावे लागतात असा भीतीयुक्त विचार त्याच्या मनात रुजवत मी कदाचित खूप मोठी चूक करतोय, असा अंतर्मुख करून लाज वाटायला लावणारा मूलभूत विचार मनात येतो नेहेमी)
तरी पालथ्या घड्यावर पाणी या न्यायाने त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही, आणि माझ्या तेच आणि तसेच चुकीचे बोलण्यातही. असो

तर.. परवा असेच त्याच्या खेळण्यांपैकी काहीतरी एक त्याने पाडले आणि ते तुटले. मी पुन्हा माझी कॅसेट चालू केली. तो माझ्याकडे बघत होता, ऋचा त्याच्या मागे बसलेली. त्याला कळणार नाही अशा प्रकारे तीने मला सांगितले की ते खेळणे त्याला गेल्या आठवड्यात एका मित्राच्या बिर्थडे चे गिफ्ट म्हणून मिळाले... हे कळल्यावर माझा जोम आपोआपच ओसरला आणि विषय संपवायचा म्हणून मी आवरते घेतले.
माझे सगळे बोलून झाल्यावर तो म्हणाला, डोंट वरी बाबा.. हे तुटले तर श्रे च्या बाबाचे पैसे वाया जातील, तुझे नाही अरे.

मी पुन्हा एकदा निरुत्तर.

सुबोध पुरोहित

चेहरा.


 "डॉ .हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना !..

"त्या तरूणीची आई सांगत होती.

"*ग्लो येण्यासाठी म्हणजे ?

"चेहरा उजळण्यासाठी !...चेहरा असा चमकला पाहिजे."

"मग कानाजवळ दोन छोटे छोटे  एल ई डी  बल्ब लावा की ! सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल."

"डॉक्टर ,तुम्ही चेष्टा करताय हं !"

"नाही ,मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे !"

"तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत.तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ! पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय ! एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा  तेज यायला पाहिजे !"

Dr हसले

"का हसला ?"तिनं विचारलं.

"तू आधी काय वापरत होतीस?".

"फेअर अँड लव्हली ,फेअरएवर ,फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही !पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ?काडीचाही फरक नाही."

"बरोबर आहे ; पडणारच नाही.चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही.

👉🏻त्यासाठी  माणसाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.

👉🏻चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.

👉🏻मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.

👉🏻मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.

👉🏻मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.

👉🏻मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात

👉🏻तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा."

"आता काय बोलावं ?"

👉🏻"पाहा ना !इथं आल्यापासून तुमची मुलगी अजून एकही शब्द बोललेली नाही.सगळं तुम्हीच बोलताय !
👉🏻माणसानं घडघड बोललं पाहिजे ,
👉🏻खळखळून हसलं पाहिजे,
दिलखुलास विनोद केले पाहिजेत ,
👉🏻मनसोक्त रडलं पाहिजे

!थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.👉🏻त्यासाठी वाचन पाहिजे ,चिंतन पाहिजे ,खेळ पाहिजे.हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर !...

👉🏻..आजपासून हे सुरू कर आणि मग बघ कसा फरक पडतो ते !.......

👉🏻👉🏻लोक धबधबाच बघायला का जातात ? लोकांना पाण्याचं  साठलेलं डबकं का आवडत नसावं  ? माणसाचंही धबधब्याप्रमाणेच आहे ! चैतन्यमय व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं !.....आणि असं व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी
चेहरा !

👉🏻👉🏻व्यक्तिमत्व खुलवा चेहरा , आपोआप तेजस्वी होईल. जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात तेच लोक जास्त सुंदर असतात।  
अगदी मस्तच !! 👌👌👌

कशासाठी, कोणासाठी आणि किती?


कशासाठी, कोणासाठी आणि किती?... विनीत वर्तक

परवाच एका मित्राशी बोलण झाल. कॉम्प्यूटर क्षेत्रात उच्च पदावर काम करत असणारा हा मित्र अमेरिकेत जाऊन तिथलाच अमेरिकन बनला आहे. नेहमीच अमेरीकेच गुणगान तोंडावर असलेला हा मित्र तिथल्या सिविक सेन्स, स्वच्छता, अनेक मुलभूत सोयीसुविधांन बद्दल अगदी भरभरून बोलत असतो. आमचे ह्यावर शाब्दिक वाद हि होतात पण ते मैत्री पुरते. अमेरिकेत नवरा बायको दोघेही कमावते. पैश्याची अडचण नाही. इकडे भारतात हि एका सुखवस्तू कुटुंबातून एकुलता एक म्हणून आपल आयुष्य जगून अमेरिकन झालेल्या माझ्या मित्राच्या पायाशी सगळीच सुख लोळण घेत होती. पण कुठे तरी काही तरी माशी शिंकते हे त्याला नेहमीच जाणवत होत.

नक्की काय हे त्याला हि कळत नव्हत. असच फोनवर बोलताना विषय निघाला सुखाची व्याख्या काय? मी म्हंटल आर यु ह्यापी? त्यावर तो म्हणाला एस ऑफ कोर्स अस का विचारल? म्हंटल नाही पण ते जाणवत नाही. त्यावर त्याच म्हणन जाणवत नाही म्हणजे काय? म्हंटल अरे सगळ जे तु सुख मोजतो आहेस त्याची परीमाण काय? म्हणजे समजल नाही. मी म्हंटल तुझ्या मते सुख काय? पैसा, आरामाच आयुष्य, सगळी भौतिक सुख तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. वर्षातून एकदा कुटुंबासोबत फिरण आणि मज्जा. त्या सोबत काम करून जमा होणारा पैसा म्हणजे सुख. पण हे सगळ कशासाठी, कोणासाठी आणि किती?

ह्या माझ्या प्रश्नाने तो थोडा विचारात दिसला. अरे तुझ्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा. सुखवस्तू कुटुंबातून येताना तुझ्या सगळ्या इच्छा, हट्ट पूर्ण करून आई- वडिलांनी चांगल शिक्षण दिल. तु हि त्यांच्या ह्या पाठिंब्याचा आधार घेत खूप उंचावर गेलास. त्यांच्या विश्वासाला सार्थ करत उत्तुंग यश कमावलस. आपल्या जोरावर सातासमुद्रा पार एका वेगळ्या देशात आपल्या कर्तुत्वाने आपल स्वतःच अस्तित्व निर्माण केलस. तिकडेच तुझ्या आयुष्याची जोडीदार, सहचारिणी निवडलीस. आई – बाबांनी अगदी आनंदाने अक्षता टाकून तुमच लग्न लाऊन दिल. पण ह्या नंतर परिस्थिती बदलली. तु अमेरिकन झालास. नव्या नवलाईत रमलास म्हणून आई बाबांनी दुर्लक्ष केल. काही वर्षांनी एका नवीन पाहुण्याला तुझ्या आयुष्यात आणलस. तेव्हा तुला आई- बाबांची आठवण झाली का तर दोघेही नोकरी करताना चिमुकल्या जिवाचा सांभाळ करणार कोण?

मग बायकोने युक्ती लढवली. आई – बाबांना अमेरिका दाखवायच्या बहाण्याने तु त्यांना अमेरिकेला नेलस. ते हि बिचारे चिमुकल्या जिवाला बघण्याच्या बहाण्याने पटकन तयार झाले. पूर्ण आयुष्य भारतात एका छोट्या शहरात काढल्यावर त्यांना कोणती हौस होती अमेरिका बघण्याची? पण एकुलता एक मुलगा नेतो आहे म्हंटल्यावर ते हि पटकन तिकड आले. दोन तीन जागा दाखवून तु आणि तिने आपल त्यांना ८-९ महिने ठेवून घेतल ते आपला फायदा करण्यासाठी. त्यांनी हि आपल्या नातवासाठी सगळ अगदी मनोभावे केल जस तुझ केल होत. त्यात कोणताही स्वार्थ आणि अपेक्षा नव्हती.

वर्ष होत आल. गरज संपली. ते पुन्हा माघारी आले. पुढली वर्षे अशीच जात राहिली. दिवसातून काय ते दोन फोन कॉल आणि ट्रान्सफर केलेले पैसे हे करून तुझ कर्तव्य संपल अस मानून तु दिवस मोजत राहिलास. यायची इच्छा असूनही बायकोच्या अधिकारापुढे तुझ काहीच चालल नाही. इकडे आई – बाबांची तब्येत दिवसेंदिवस खंगत जात होती. पण रोज काय सांगणार आणि सांगून पण तुला त्रास देऊन तुझ्या सुखी आयुष्यात त्यांना मिठाचा खडा व्हायच नव्हत. त्यामुळे ते हि न बोलता खेचत राहिले आयुष्य. आता २-३ वर्ष झाली न त्यांनी तुला बघितल न त्यांच्या छोट्या जिवाला. तु मात्र कुटुंब घेऊन जग फिरत राहिलास. पण त्याचं जग मात्र हिरावून घेतलस.

आज कुठे आहेत रे ते? काल मला काकू दिसल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना शोधत फिरत होत्या. हातात बरेचश्या फाईल होत्या. काका एका बेड वर निपचित पडून होते. कुठे जायच, कोणाला भेटायच, काय सांगायच काहीच कळत नव्हत. मी बघितल्यावर त्यांची मदत केली. साध लिफ्ट च बटन दाबायच ते हि कळत नव्हत. इकडून तिकडे फिरत होत्या. त्यांची हि अवस्था बघून मला स्वतःचीच लाज वाटली रे. त्या मोठ्या घरात हे दोन म्हतारी माणस एकेमेकांना आधार देऊन कस जगत असतील रे? एकेकाळी तुझ्या हसण्याची, रडण्याची, आवाजाची सवय असलेल ते शांत घर आज त्यांना खायला उठत नसेल का रे? ह्या उतरत्या वयात तुझ्या आधाराची गरज भासत नसेल का रे? सगळ सोडून मायेची गरज भासत नेल का रे? तु कुठे आहेस रे ह्या सगळ्यात? कुठेच नाही.

आपण धावतो आहोत फक्त घाण्याला जोडलेल्या बैलासारखे. कोणासाठी, कशासाठी आणि किती ह्याचा कुठलाच विचार न करता. काय मिळवतो आहोत? काय निसटते आहे? ह्याचा कसलाच विचार न करता फक्त आपण पुढे जात आहोत. भौतिक सुखांच्या मागे. ते खरच सुख आहे का? ह्याचा विचार तु कर? जमल्यास एकदा ये. भेट त्यांना. कदाचित ते जायच्या आधी तुला सुखाचा अर्थ समजेल. माझा फोन कट झाला होता. मी त्या फोन कट झालेल्या टोन ला ऐकत रिसिव्हर खाली ठेवला.    

ता. क. :- ह्या गोष्टीचा अर्थ माझ्या कोणत्याही मित्राशी लावू नये. ह्या गोष्टीतील पात्र काल्पनिक असून कोणाशी जुळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

अबोल माणूस



अबोल माणूस-  एक निर्जन बेट......!  क्लीन कम्युनिकेशन इज  एॅन   आर्ट....!

आपल्या जन्माच्या वेळीही  खणखणीत टाहो फोडून या जगात येणारा माणूस इतर प्राण्यांहून वेगळा ठरतो ते त्याला निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या वाणी आणि वाचेने....ही त्यालाच दिलेली विशेषता आहे कि त्याची जगाची समज जशी जशी वाढेल तशी तशी त्याला वाचेच्या मदतीने शब्द आणि वाक्य रचना करता येते.....हत्ती .. घोडे ...वाघ सिंह या सगळ्या प्राणीमात्रात आणि त्याच्यात इथे पहिली प्रगतीची फारकत होते....   आपल्या शास्त्रात वाणीला "ब्रम्ह"..म्हटलं आहे....शब्द कधीच लोप पावत नाहीत....निसर्गात चिरंतन राहतात... ध्वनी कानाने ऐकून त्याची वाचा आणि वाणी होणे हे प्रगत लक्षण आहे ...मानवाच्या  मेंदूचे.
वाणी आणि वाचा याचा वापर जरी आपल्याला उपजत असला तरी कालमानाप्रमाणे प्रत्येक माणूस त्याचा वापर निरनिराळा करताना दिसतो...जन्मापासून कळण्याच्या वयापर्यंत उस्फुर्त असलेला हा प्रवास विचारांचे अडसर आले कि ठरतो कसा होणार ते...समज मग विचार आणि मग स्वभाव जडण घडण...या पायर्यांनी पुढे जाणारा हा प्रवास बोलका आणि अबोल...मोकळी वाणी कि दबका मितभाषी माणूस होणार हे ठरतं....स्वानुभव ...आजूबाजूचे वातावरण ...आणि माणसाने माणसाला बोलण्याचे केलेलं मार्गदर्शन....याचा पहिला प्रभाव पडतो...मग पुढे जाऊन बोलणे आणि त्याला मिळणार प्रतिसाद  हे ठरवतो कि त्याची बोलण्यात प्रगती होणार कि वाचा वापरायलाच तो माणूस  घाबरणार....आणि तिथेच एक गाठ पडते....माणूस जेव्हा शब्दांचा आधार घ्यायला घाबरतो तिथे त्याची उस्फुर्त विचार निर्मिती निराळा मार्ग घेते....वाचेला विचारांचा आणि समजुतींचा अडसर येतो....बोलणे म्हणजे चूक ही धारा बनते ..एकतर अशी व्यक्ती अगदी अबोल होते किंवा कटू बोलणारी होत जाते....तिथे रोखतो आहोत निसर्ग आपण हे त्या व्यक्तीला कळते पण ते पत्करून  ती अबोलपणा स्वीकारते ...अव्यक्त राहणे सुरक्षित वाटू लागते ... काम होतंय ना रोजचं..? मग कशाला बोलायचं..? अशा मताचा पगडा ठाम होत जातो मनात....आणि मग ती व्यक्ती  मनातही काही गोष्टी विचार करणे थांबवते....कुणी काही बोललेच तरच ती काही बदल करते आपल्यात अन्यथा..चलने दो   ...तत्वावर आयुष्य पुढे जातेच.... आम्ही अबोल असू तर राहू देत आमचं काही अडत नाही.....हे ठाम होत जातं....पण अशा व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्ती जर विरुद्ध  ऊर्जेच्या निघाल्या तर तिथे मग अडथळ्यांची शर्यत सुरु होते....अबोल आई आणि बोलकी मुले....अबोल वडील व बोलकी आई...अबोल भाऊ व बोलकी बहीण...अशा जोड्या दिसतात आपल्याला...नवरा बायको या नात्यात मात्र या  सिद्धीचा  कस लागू शकतो.... अबोलपणा हा निर्जन बेटा सारखा असतो....तिथे सगळं असतं....पण नेमकी वर्दळ हरवलेली असते....आपली वाचा आणि वाणी जर आपल्याला योग्य जागी मदत करत नसेल आणि हे आपल्याला जाणवत असेल तर यावर नक्कीच काही बदल होत जातो पण जर लक्षात आलंच नाही किंवा लक्षात येऊनही मान्य केलंच नाही तर मात्र तो माणूस समृद्ध असूनही  आपल्या माणसांच्या मनाच्या स्टेशनवर पोचत नाही....समोर दिसतो..जाणवतो..पण स्वच्छ वाणीचा माणूस जसा पारदर्शी नाती  निभावत दुसऱ्यांनाही चांगले भाव देऊ शकतो तसा हा माणूस देऊ शकत नाही....मनातले विचार जर शब्दात वापरू शकत नसू आपण तर नक्कीच कुठेतरी वायरिंग अपूर्ण राहते आणि हवी ती ऊर्जा निर्माण होत नाही.....ऊर्जेचा नियमच आहे इथून समोर गेली तर समोरून येते....म्हणजे यावी तरच ऊर्जेचे वर्तुळ पूर्ण होते....अन्यथा  उदासीन ऊर्जा राहते तिथे......एका हरवलेल्या निर्जन बेटासारखी.....!  आपण माणूस आहोत....कुठल्याही मार्गाने नीट व्यक्त झालो तर शरीराने आणि मनाने हेल्दी राहता येतं..... नक्कीच  समृद्ध बेट होऊ....ऊर्जा छान वापरू....आणि  सुदृढ राहू....क्लीन कम्युनिकेशन इज  एन   आर्ट....! .शुभास्ते पंथानः.....  #संगीताशेंबेकर

सोमवार, १ एप्रिल, २०१९

तीन गाळण्या



बोधकथा- 
तीन गाळण्या

सैक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,
" अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सैक्रेटिसने त्याला थांबवले .
" कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो ."

" तीन गाळण्या ? काय , आहेत तरी काय त्या?"

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "

" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .

" ठीक आहे ." सैक्रेटिस म्हणाला .
" आता दुसरे गाळणे . मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे?"

" ओ ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .

" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सैक्रेटिसने विचारले .
" ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."

" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "

" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .

" हे पहा ," सैक्रेटिस म्हणाला ,
" जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही ,
माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही
आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार ?
म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "

.....आणि सैक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .

मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी या तीन गाळण्या अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्र / सहकारी /नातेवाईक / आप्तेष्ट यांच्याबद्दलचा गैरसमज होणार नाही . आयुष्य सुखी होईल !!

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा