नावात काय आहे?
कुणाला वडिलोपार्जित
इस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको
असला तरी मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो.
पिढ्यान पिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची
प्रथा मुळात रूढ झाली असाव, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन बरीचशी विचित्र,
विक्षिप्त, लाजिरवाणी आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. अशा
आडनावांची संख्या थोडीच असली तरी, ती धारण करणार्या कुटुंबांना खूपच मनस्ताप सहन करावा
लागतो हे मात्र निश्चित. इतकी विविध आणि वैचित्र्यपूर्ण मराठी आडनावे कशी प्रचारात
आली? रूढ झाला? इतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान्पिढ्या कसा चालू राहिला,
हा खरोखर सामाजिक संशोधनाचा विषय आहे.लेखात ज्या ज्या आडनावांचा मी उल्लेख केला आहे
ती आडनावे खरोखर प्रचारात आहेत, रूढ झालेली आहेत, म्हणूनच मी ती विचारात घेतली आहेत,
कुणाचीही स्तुती, उपहास, हेटाळणी किंवा टिंगलटवाळी करण्याचा माझा उद्देश नाही. कोणीही
प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.
परिचय उपनाम किंवा
कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला
जातो. आडनावाचा अर्थ जरी उपनाम,कुलनाम किंवा अधिकनाम असा होत असला, तरी त्याची व्युत्पत्ती
वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितली जाते. ‘अर्ध’ या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप म्हणजे आड असे काहींचे म्हणणे
आहे. तसेच ‘अड्ड’ या समानार्थी कन्नड शब्दावरून आड हा शब्द आला असावा, असे अन्य
काहींचे म्हणणे आहे. ज्याच्या आश्रयाने आपण वावरतो ते नाव, अशीही आडनावाची व्युत्पत्ती
करण्यात येते. आपण आपल्या घराच्या, गावाच्या, धंद्याच्या किंवा गुणाच्या आश्रयाने वावरत
असतो;त्यामुळे ही व्युत्पत्ती अधिक योग्य वाटते.एकच व्यक्तीनाम धारण करणार्या अनेक
व्यक्ति समाजात एकत्र आढळल्यामुळे व्यक्तीस निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या
व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली अशा परिस्थितीत काही
काळ तरी व्यक्तीच्या पित्याला प्राधान्य असलेल्या समाजात पित्याचे नाव व्यक्तीच्या
नावाला जोडण्याची प्रथा होती. रंगो बापूजी, दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, महम्मद
बिन कासीम वगैरे उदाहरणे सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियांना त्यांच्या
पतीच्या नावाने ओळखले जात असे. अमुक स्त्री (तिचे नाव) भर्ता अमुक पुरुष (त्याचे नाव)
म्हणजे त्या पुरुषाची ती पत्नी, असे समजले जात असे. परंतु व्यक्तिनिर्देशाला ही पद्धतसुद्धा
अपुरी पडू लागली, तसेच समाजात कुटुंबाचे महत्त्व वाढीस लागून प्रत्येक व्यक्ती ही तिच्या
कुटुंबाच्या योगे ओळखली जाऊ लागली; त्यामुळे कुटुंबाच्या अगर कुलाच्या नावाची म्हणजेच
आडनावाची आवश्यकता भासली असावी.
समाजात, आडनावामुळे
तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. ही प्रथा आपल्याच देशात नव्हे तर सार्या जगातील देशात
आणि धर्मात आहे. स्त्रीला नवर्याचेच आडनाव आपल्या नावासमोर लावावे लागते. आनुवंशिकता
विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्य
पिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोझोम्समुळे येतात. क्रोमोझोम्सवर जनुके आणि
डीएनएचे रेणू असतात. सर्वच सजीव प्रजातींच्या बाबतीत हे खरे आहे. ते अपत्य मुलगा असो
की मुलगी असो, अर्धी गुणसूत्रे, म्हणजे 23 गुणसूत्रे (गुणसूत्रांना रंगसूत्रे असेही
म्हणतात पण ते, चुकीचे आहे ) वडिलांकडून व अर्धी गुणसूत्रे, म्हणजे 23 गुणसूत्रे आईकडून
आलेली असतात. म्हणजेच अपत्यावर पितृवंशाचा जेव्हढा अधिकार असतो तेव्हढाच मातृवंशाचाही
असतो हे ओघाने आलेच.आपल्या पूर्वजांनी, अनेक मातापित्याचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा
आणि केसांचा रंग, चेहर्याची ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, दमा, मधुमेहासारखे
रोग वगैरे आणि
‘जात’ म्हणजेच आनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे, आडनाव म्हणजेही जात
असे समीकरण झाले. आता आपल्या लक्षात येईल की, आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी
आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतू कालांतराने विचित्र आडनावे निर्माण झाली आणि
ती पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरण्याची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर
फारसा होत नसे. इंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरण्याची प्रथा रूढ झाली आणि
आता आडनांव नसलेली व्यक्ती जवळजवळ दुर्मीळच आहे.
आपल्यात ‘खरे’ आहेत तसे ‘खोटे’ ही आहेत. ‘गोरे’ आहेत तसेच काळे, सावळे, हिरवे, पिवळे,
निळे, जांभळे, भुरे, करडे, शेंदरे आणि तांबडेही आहेत. शेवटी सगळ्या रंगांचे मिश्रण
म्हणजे पांढरे, पांढरकर आणि पांढरकवडे ही आडनावे देखील आहेत. लहाने आहेत त्यांना लांबट
आणि लांबे विरोध करतात. दांगट आहेत तसेच लुकडे आणि लुळे आहेत. टिल्लूही आहेत. लुगडे
आणि धोत्रे ही देखील आडनावे आहेत. सदरे, गोटे, परकुटे, उघडे आणि दिगंबरे देखील आहेत.
उखळे-मुसळे, चिमणे-कावळे, लांडगे-कोल्हे, उन्हाळे-हिवाळे, कडू-गोड, गाढवे-शहाणे, ढेकणे-चिलटे
अशाही जोड्या आढळतात.निसर्गात आढळणारे प्राणी तर आम्हाला इतके प्रिय आहेत की त्यांच्याशी
आडनावरूपाने आम्ही पिढ्यान्पिढ्या संबंध ठेवला आहे. वाघ, अस्वले, कोल्हे, लांडगे, जिराफे,
काळवीट, गेंडे, मगर ही आडनावे वन्य प्राण्यांशी; तर गाढवे, घोडे, ढेकणे,मुंगी, चिलटे,
कुत्रे, कुत्रेकर, मांजरेकर, डुकरे,इंगळे, एडके, बकरे, गायधनी, गायतोंडे, ढोरे वगैरे
आडनावे माणूस वस्तीतल्या प्राण्यांशी सख्य दर्शवितात. वाघमारे, वाघडोळे, वाघमोडे आणि
वाघचोरे देखील आहेत. आता वाघ ही काय चोरायची वस्तू आहे. पण आडनाव रूढ होण्याइतके वाघचौर्य
त्यांच्या पूर्वजांनी करून दाखविलेले दिसते. वाघमारे सारखेच ढोरमारे आणि माणूसमारे
देखील आहेत. चिमणे, कावळे, कोकीळ, गरूड, घारे, मोरे, साळुंके ही आडनावे आमचे पक्षीप्रेम
दर्शवितात. आवळे, आळवे, आंबे, एरंडे, कणसे, फणसे, काकडे, कारले, कांदेकर, कोथमिरे,
खारके, खोबरे, नारळे, गवारे, जांभळे, भोपळे, मुळे, भेंडे, दोडके, पडोळे, पडवळ हीआडनावे
फळे आणि भाज्या तर; खराटे, दगडे, कुदळे, पावडे, कुर्हाडे, गोटे, कुयरे, कुलपे, खुंटे,
घागरे, उगळे, मुसळे, पाटे, चाके, पलंगे, पतंगे वगैरे आडनावे नित्याच्या वस्तूंशी निगडीत
आहेत.हिरे, माणके, सोने, चांदे, तांबे, पितळे, जस्ते, कथले ही रत्ने आणि धातू तर डोळे,
डोके, काने, हाते, माने, पोटे, पाठे, कपाळे, मांडे, गुडघे, नाके, दाते, दाढे, सुळे,
हिरडे वगैरे शारीरिक अवयव देखील आडनावरूपाने वावरतात. डोईफोडे, पाठराबे, पोटदुखे, कानपिळे,
कानतोडे, कानफाटे, कानतुटे, बहिरे, आंधळे, वाकडमाने, लंगडे, लुळे, थिटे, एकबोटे, अक्करबोटे
अशी आडनावेदेखील प्रचारात असून ती आम्ही स्वीकारली आहेत.काही आडनावे तर फारच भव्य व
पल्लेदार आहेत. उदा. प्रचंड, अचाट, अजिंक्य, अपराजित, अयाचित, सहस्त्रबुध्दे, सहस्त्रभोजने,
हजारे, लाखे, सवालाखे, कोटे, करोडे, कुबेर वगैरे.स्वभाव वैशिष्ठ्यावरूनही कित्येक आडनावे
रूढ झाली आहेत. आगलावे, आडमुठे, आळशी, बोंबले, कंटक, कलंके, उदार, उदास, उकिडवे, चतुर,
शहाणे, गोडबोले, थोरबोले, वगैरे शरीराच्या गुणावगुणावरूनही कित्येक आडनावे रूढ झाली
आहेत. पिसाट, बहिरट, बोबडे, पाचपोर, पाचपुते, अष्टपुत्रे, सातपुते, बारपुते, दशपुत्रे,
चारभाई, पाचभाई, सातभाई, बारभाई तेरभाई, वगैरे मंडळी आडनावांप्रमाणे खरोखरच वागलीत
तर लाल त्रिकोणाची वाट लागलीच म्हणून समजा.पुणेकर, नगरकर, धुळेकर, नाशिककर अशी प्रत्येक
गावाला किंवा खेडयाला ‘कर’ जोडून तर हजारो आडनावे रूढ झाली आहेत.कुळकर्णी, देशपांडे, पांडे,
पाटील, देशमुख, सोनार, सुतार, लोहार, तेली या आडनावांसंबंधी वेगळे लिहायची गरज भासत
नाही.कोकणस्थांची आडनावे त्या मानाने बरीच मर्यादित आहेत. फडके, बापट, अभ्यंकर, दामले,
दांडेकर, आपटे, गाशे, भिडे, गोगटे, लेले, नेने, पटवर्धन, पेठे, पेंडसे, पोंक्षे, मराठे,
साने, सोमण, दाते, गाडगीळ, कर्वे, बर्वे, खरे, गोखले, टिळक, केतकर, बेडेकर, थत्ते,
मुळे, लागू अशी बारा म्हणांची आडनावे वाढत वाढत एकूण साठ आडनावे झाल्यानंतर साठावे
आडनाव साठे झाले असा समज आहे. कोकणस्थांची निवासदर्शक आडनावेही बरीच आहेत. उदा. आगरकर,
पाटणकर, नानिवडेकर वगैरे.सीकेपी कुटुंबातही मोजकीच आडनावे असतात. राजे, प्रधान, गुप्ते,
मथुरे, फणसे, दळवी, जयवंत, सुळे वगैरे.परंतू बंदसोडे, होनमोडे, बारसोडे, तूपसमुद्रे,
तक, फळ, गदो, भातलवंडे, तरकसबंध, भूत, भुते, ब्रम्हराक्षस, रावण, हडळ, हगवणे, हगरे,
चाटुफळे, पिसाट, घरबुडवे, भानचोद, झवकिरे, लवडे, माणूसमारे,ढोरमारे, चणेचोर, पगारचोर,
दाढी यासारखी आडनावे देखील कशी प्रचारात आली हे खरोखर गूढच आहे.
आडनावांच्या बाबतीत
अनेक विनोदी किस्सेही आहेत. उदा. पिसाटांचा मुलगा घरबुडव्यांची मुलगीआणि हा विवाह जुळविणारे
मध्यस्थ जर आगलावे असतील तर त्या संसाराची काय अवस्था होईल ह्याची कल्पनाच केलेली बरी
!!
इतकी विविध आणि विचित्र्यपूर्ण
आडनावे कशी प्रचारात आली, रूढ झाली, अतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान्पिढ्या
कसा चालू राहिला, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे.
कोणतेही आडनाव रूढ
होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रथम ते स्वीकारले पाहिजे. जोशी, पाटील, कुलकर्णी,
पांडे, देशपांडे, देशमुख किंवा सोनार, सुतार, वैद्य अशी व्यवसायावरून पडलेली आडनावे
किंवा नागपूरकर, पुणेकर, नाशिककर यासारखी त्या गावी निवास दर्शविणारी आडनावे कुटुंबातील
व्यक्तींनी स्वीकारणे फारसे कठीण नाही हे आपण समजू शकतो. तसेच धैर्यवान, अजिंक्य, अपराजित,
सहस्त्रबुद्धे, बुद्धीसागर, ज्ञानसागर, महाबळ, महाजन, कोटीभास्कर अशी सद्गुणदर्शक आडनावेही
स्वीकारणे फारसे कठीण नाही. परंतू गाढवे, ढेकणे, चिलटे, कुत्रे, घोडे, आळशी, बाहिरट,
पिसाट, चिकटे, आगलावे, मुसळे, कानफाटे, एकबोटे, बारशिंगे, पोटदुखे, नवरे, ननवरे,डोईफोडे,
बोंबले, चणेचोर, चाटुफळे, दीडमिशे यासारखी आडनावे कुटुंबातील व्यक्तींनी स्वीकारली,
पिढ्यान्पिढ्या आपल्या नावासमोर लावली, यामागे काहीतरी प्रबळ कारण असले पाहिजे किंवा
समाजाने बळजबरीने ही आडनावे त्या कुटुंबावर लादली असावीत आणि काही पिढ्यांतर ही आडनावे
नाईलाजाने पचविली गेली असावीत.काही आडनावे तर इतकी अश्लिल आहेत की ती उच्चारणे म्हणजे
देखील असभ्यपणाचे ठरेल. ही अश्लिल आडनावे कशी रूढ झालीत ह्याची कारणे शोधायला हवीत.
वरवर विचार करता असे वाटते की, ज्या काळात ही आडनावे रूढ झालीत त्या काळात त्या शब्दांना
वेळा अर्थ असला पाहिजे आणि कालांतराने आजचा अश्लिल अर्थ प्राप्त झाला असला पाहिजे.
दुसरेही एक कारण असू शकते. परप्रांतीय भाषेतील शब्दावरून ही आडनावे रूढ झाली असावीत
आणि ह्या परप्रांतीय भाषांत त्या शब्दांना वेगळा आणि चांगला अर्थ असला पाहिजे.एकच आडनाव
वेगवेगळ्या कुटुंबांना वेगवेगळ्या करणांनी रूढ झाले असण्याचीी शक्यता नाकारता येत नाही.
आज जी आडनावे प्रचलित
आहेत, त्यापैकी बरीच आडनावे बदललेली असण्याची आणि भविष्यात बदलली जाण्याची शक्यता आहे.गाढवे
कुटुंबातील एखादा मुलगा अतिशय बुद्धिमान निघाला आणि त्याने आपले आडनाव सहस्त्रबुद्धे
असे बदलवून घेतले किंवा कारकून ह्या आडनावाचा मुलगा स्वकर्तुत्त्वामुळे मोठया अधिकाराची
जागा भूषविता झाला आणि त्याने आपले आडनाव अधिकारी असे बदलवून घेतले तर त्यात काहीही
वावगे नाही. ‘ढेकणेचे’ चे ‘देखणे’ आणि बोंबलेचे महाशब्दे झाले असे ऐकिवात आहे.
कुलनामाच्या प्रथेची
सुरवात कुलनामाची अगर आडनावाची प्रथा नक्की केव्हा सुरूझाली, हे सांगणे कठीण आहे. हिंदू
लोकांप्रमाणेच पूर्वी हिब्रू, मिसरी, असुरी, बॅबिलोनियन, ग्रीक इ. लोकांतही आडनावाची
पद्धत नव्हती. इंग्लंडमध्ये नॉर्मन दिग्विजयानंतरच्या काळात म्हणजे अकराव्या-बाराव्या
शतकांपासून कुलनामाचा वापर होऊ लागला, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातही त्याच सुमारास
तऱ्हेतऱ्हेच्या कुलनामांचा वापर सुरू झाला असावा, असे काही लोकांचे मत आहे. शिलालेख
किंवा ताम्रपट यांतील नामनिर्देशांवरुन हा निष्कर्ष काढण्यात आला असावा. परंतु त्यांतील
कुलनामांना आनुवंशिक स्वरूप प्राप्त झाले होते की नाही, हे सांगता येत नाही, असेही
त्यांचे म्हणणे आहे. ही उपनामे त्या काळात कुलनामे म्हणून जरी रुढ नसली, तरी व्यक्ती
निर्देशक:करिता उपनामे वापरण्याची पद्धत तेव्हा रूढ असावी, असे वाटते. आडनावाचे महत्त्व
खऱ्या अर्थाने पेशवाईनंतर इंग्रजी अंमलात वाढले.कुलनामे ही प्रथमत: खऱ्या किंवा काल्पनिक
मूळ पुरुषांच्या नावांवरून किंवा कुटुंबाच्या इतिहासात प्रसिद्धी पावलेल्या व्यक्तिंवरून
बहुश: घेतलेली असावीत. अमुक पित्याचा मुलगा म्हणून व्यक्तीचा परिचय करून घेण्याची ही
पुढची पायरी असावी. इंग्लिंश लोकांतील हॅरिसन, जेफरसन, जॅकसन, अॅडम्स इ. उदाहरणे या
सदरात येतात. सिंधी लोकांमधील रामचंद्रानी, हेमराजानी, कृपलानी, मीरचंदानी इ. नावेही
त्या त्या घराण्यातील मूळ पुरुषाकडून अगर प्रसिद्ध व्यक्तीवरून आली, असे म्हटले जाते.
त्याचप्रमाणे ऋषीच्या वा गोत्राच्या नावावरूनही अत्रे, जमदग्नी, वसिष्ठ, गर्गे इ. आडनावे
उद्भवली असावीत, असेही अनुमान करण्यात येते.वि. का. राजवाडे यांनी पौराणिक व श्रौतसूत्री
गोत्रांवरून अनेक आडनावांची व्युत्पत्ती लावली आहे. उदा., फाण्टा: वरून फाटक, कौरव्या:
वरून कर्वे, श्वानेया: वरून साने इत्यादी. परंतु या नावांच्या व्यक्तींची आजची गोत्रे
ह्या व्युत्पत्ति कल्पनेस पोषक ठरत नाहीत. महाराष्ट्रीय प्रथावरील पैतृकनामसदृश आडनावे
वगळल्यास इतर अनेक कारणांवरूनही आडनावांची व्युत्पत्ती झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रीय
आडनावांची पुढीलप्रमाणे ठोकळ विभागणी केली जाते : स्थलनिर्देशक (पुणेकर, विजापूरकर,
निझामपूरकर, डोंगरे, पर्वते इ.) , व्यवसाय निर्देशक (जोशी, देशमुख, उपाध्ये, पाध्ये,
व्यास, पुराणिक, कुलकर्णी, चौगुले, पोतदार, सोनार, पाटील, देसाई, देशपांडे, चिटणीस,
फडणीस, कर्णिक इ.),
वर्णवाचक (काळे, गोरे,
ढवळे, हिरवे इ.),
प्राणिवाचक (वाघ, लांडगे,
कावळे, हंस, राजहंस, मोरे,
कोल्हे, गाढवे इ.)
वनस्पतिवाचक (पिंपळे,
फुले, मोगरे, पडवळ, भोपळे इ.), पदार्थवाचक (तांबे, पितळे, सोने, लोखंडे इ.),
शरीरावयव निर्देशक
(पोटे, डोळे, काणे इ.),
नातेदर्शक(पोरे, पित्रे,
नातू, सातपुते, नवरे इ.),
गुणवाचक (धैर्यवान,
अजिंक्य, सहस्रबुद्धे इ.),
निंदाव्यंजक (आगलावे,
बोंबले, पोटफोडे, जीवतोडे इ.)
त्याचप्रमाणे गुजराती
लोकांत उपाध्याय, भट, देसाई, मेहता, पटेल, कापडिया इ. व्यवसाय निदर्शक आडनावे आहेत.
बंगाली लोकांत मुखर्जी (मुख्योपाध्याय), बॅनर्जी (बंद्योपाध्याय), चतर्जी (चट्टोपाध्याय),
बोस (बसु किंवा वसु), दत्त, मित्र, सेन, ठाकूर इ. आडनावे व्यवसाय सूचक अगर जातिवाचक
असलेली दिसून येतात. उत्तर प्रदेशातील दुबे, द्विवेदी, त्रिपाठी, चौबे, चतुर्वेदी,
दीक्षित, पंत, पंडित, शर्मा, श्रीवास्तव आणि मद्रास-म्हैसूरकडील अय्यर-अय्यंगार, पिळ्ळै,
नायडू; तसेच केरळमधील नायर, नंबुदिरीपाद इ. नावेही जातिवाचक अगर व्यवसाय वाचक आडनावे
होत. महाराष्ट्रात व इतरत्र आलेल्या काही दक्षिणी लोकांमध्ये स्वत:च्या घराण्याच्या
आणि वैयक्तिक नावांच्या आद्याक्षरांपुढे ‘राव’ ही उपाधी आडनावाप्रमाणे वापरण्याची प्रथा आहे. उदा., संयुक्त
राष्ट्रसंघात पूर्वी भारताचे प्रतिनिधी असलेले बी. एन्. राव यांचे संपूर्ण नाव बेनेगल
नरसिंग राव असे होते. पारशी लोकांतही डॉक्टर, बाटलीवाला, दारूवाला, मोटारवाला इ. व्यवसाय
वाचक आडनावे आढळून येतात.
उत्तर भारतात व्यक्ति
नावांच्या शेवटी येणाऱ्या राम, दास, लाल, चंद इत्यादींसारख्या नावांचा उपयोग आडनावांसारखाही
करतात. शीख व रजपूत लोकांत आडनावे नसतात. ते आपल्या नावापुढे सिंग (सिंह) लावतात. मुसलमानांत
आडनावाची पद्धत सर्रास रूढ झालेली नाही; तरीपण हल्ली ते शेख, सय्यद, काझी, फकीर, गुलाम
इ. पंथवाचक. नदाफ, मुजावर वगैरे व्यवसायदर्शक, तसेच ऐतिहासिक किंवा पदवीदर्शक नावांचाही
उपयोग आडनावांसारखा करू लागले आहेत.
मालकांची आडनावे नोकरांनी
घेण्याच्या पद्धतीमुळेही काही काही आडनावांची उसनवार झाली आहे. इचलकरंजीचे जहागीरदार
जोशी हे घोरपडे झाले. आंग्रे यांच्या पदरी असलेले बिवलकर नावाचे ब्राह्मण पुढे आंग्रे
झाले. या कारणामुळे व उच्च जातीची आडनावे स्वत:च्या घराण्यास लावण्याच्या आवडीमुळेही
छेत्रे, गोरे, जोशी, मंडलिक इ. ब्राह्मण आडनावे मराठ्यांत; चव्हाण, मोरे, गायकवाड,
जाधव, कदम, शेलार, शिंदे इ. मराठ्यांची आडनावे महारांत आणि साठे, राजगुरू, नांदे, लोखंडे,
इ. उच्चवर्णीय आडनावे मांगांत सापडतात. भारतात आडनावे बदलण्यास कायद्याने बंदी नाही,
त्यामुळे आडनावे बदलण्याची ही क्रिया आजही चालू आहे.आडनावांची सुरुवात व्यक्ति निर्देशाकरिता
जरी झाली असली, तरी त्यांचा सामाजिक परिणाम फार व्यापक आहे. ज्या समाजात घराण्यावरुन
व्यक्तीचे सामाजिक स्थान ठरते, त्या समाजात आडनावाला विशेष महत्त्व येणे क्रमप्राप्त
आहे.