Pages

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

व्हाट्सअँप आणि मेसेज


 व्हाट्सअँप आणि मेसेज 

आपण सकाळी उठतो आणि आपापल्या ग्रपवर गुड मॉर्निंग चे मेसेज, इमेजीस पाठविण्याचा धडाकाच लावतो. मग पाठोपाठ सुविचारांची जणू स्पर्धाच लागते. जे बोट कापलं तरी घाबरतात ते लढ्याच्या गोष्टी फॉरवर्ड करतात. जे कारमधून फिरतात ते सायकलचे महत्व सांगतात. जे आई बापाजवळ राहत नाहीत त्यांना मातृ-पितृ महिम्याचे भरते येते. मग हे पाठवा बॅलन्स येईल, ते पाठवा दिवस चांगला जाईल, हे पाठवा आणि पहा काय जादू होते, ते पाठवा आणि पहा कसा धनलाभ होतो. आणि या आंतरजालात आपण सुशिक्षित म्हणवून घेणारेही कसे फसत जातो तेही कळत नाही.ग्रुपवर नसणाऱ्या व्यक्तीलाही प्रत्येक ग्रुपवर शेकडो शुभेच्छा देतो. आपल्याच वाढदिवसाच्या आपणच शुभेच्छा देतो.
      या सगळ्यात आपल्या ग्रुपच्या निर्मिती मागचा हेतूच आपण विसरून जातो. आपण  ग्रुपवर करत असलेल्या गोष्टींचे आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.
कांही ग्रुपवर पर्सनल चॅटींग तासन् तास चालते. जेवणाच्या, पार्टीच्या चर्चा होत राहतात. आपल्या या पोस्ट इतरांना किती त्रासदायक ठरत असतील याचा साधा विचारही आपण करत नाही.
      मग संध्याकाळी पुन्हा तत्वज्ञानाचे डोस सामुदायिकरित्या पाजण्याचे काम सुरू होते व शेवटी पुन्हा गुड नाईटच्या ईमेजीसचे वादळ.
   मित्रांनो यात आपला आणि इतरांचा किती वेळ आणि पैसा खर्च होतो याचा आपण विचारही करीत नाही.
    यापुढेतरी फक्त आपल्या ग्रुपच्या निर्मितीमागचा हेतू ध्यानात ठेवूनच पोस्ट टाकूया. पुनरावृत्ती टाळूया. राग नसावा ही विनंती...

✅1 : Whatsapp चा उपयोग चांगल्या कामासाठी करा... Data Free अमुक Free तमुक free असे msg पाठवू नका. या जगात काहीच free मिळत नाही. असे msg पाठवून आपण आपल्या अल्पबुद्धीचा परिचय देत असतो.

✅ 2 :"हा मेसेज दुस-या ग्रुप मध्ये पाठवा आणि जादू बघा काही फरक जाणवेल." अशा प्रकारचे मेसेज forward करुन आपण किती बालीश आहात हे ग्रुपला दाखवु नका...

✅ 3 : पुरुष तसेच स्त्रियांना मारहान केलेले pictures, videos सेंड करुन समाजात हिंसाचार पसरवुन आपल्यावर आई-वडीलांनी केलेल्या संस्कारांना मातीमोल करु नका....

✅ 4: जातीचा अभिमान सर्वांना असतो, Whatsapp वर धर्मप्रेम गाजवु नका तर थोरांच्या विचारांचे पालन करा, महापुरुषांची बदनामी करु नका...

✅ 5: विनाकारण Whatsapp वर वेळ वाया घालवु नका, आपल्या Carrer ला तसेच कामधंद्यांना प्राधान्य द्या Whatsapp च्या माध्यमातून आपल्याला काही फायदा घेता येेतो का ते पहा...

✅ 6 : उगाचच देवादिकांच्या नावाचे  मेसेज 11 जनांना पाठवा, आई बापांच्या वा देवाच्या नावाने शपथा घालणे असे करन तुमच्या अंधश्रद्धेचे प्रदर्शन थांबवा...

✅ 7: Whatsapp चा वापर चांगल्या कामासाठी करा... दुसऱ्यांना मनस्ताप होईल असं काहीच Share करु नका. नक्कीच Whatsapp चे खरे महत्व तुम्हाला कळेल...

✅ 8: अमक्या तमक्याची कागदपत्रे सापडली, अमका मुलगा सापडला, (2-2, 4-4 वर्षापूर्वीची), हा मेसेज फॉर्वड करा मला WhatsApp कडून पैसे मिळतील यातील गांभिर्य ओळखा हे सर्व खोटे मेसेज असतात. खात्री शिवाय फॉर्वड करू नका..

✅ 9: उगीच जुनाट तेच तेच मेसेज, शायऱ्या, सुविचार टाकून तुम्ही रिकामटेकडे आहात हे दाखवू नका, तुमच्या सुविचारांची लोंकाना गरज नाही, सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत  त्यांना रोज रोज बोअर करू नका..

✅ 10: प्रत्येक छोट्या मोठ्या सणाला, गोष्टीला शुभेच्छा देत बसू नका, द्यायच्या असतील तर भेटून किंवा फोन करून द्या,, सर्व लोकांना माहिती आहे की उगीच फॉरवर्ड टच करून एकावेळेस हजारो लोकांना पाठवता येते त्यात आपुलकी नसते...


 🙏वरील पध्दत वापरली तर तुमचा अन् इतरांचा बहुमूल्य वेळ वाचेल.
वेळ कोणासाठी थांबत नाही ... आणि  एकदा गेलेली वेळ परत  येत  नाही..

साडी_पुराण !


साडी_पुराण !


सातत्याने बदलत गेलेले पण कायम सांस्कृतिक, सामाजिक मान्यतेचा मानदंड बनून स्थिरावलेले असे काय आहे आपल्या भारतीय वस्त्र संस्कृतीत ? तर उत्तर येते 'साडी'!
बदलत गेलेले पण तरीही सातत्याने हजारो वर्षे वापरात राहिलेले, लज्जा झाकणारे पण स्त्रीच्या सोज्वळ अन् अंगप्रत्यंगाचे अतिशय मादक दर्शन घडवू शकणारे असेही हेच वस्त्र!
आपल्या भारतीय विविधतेतील एकता याचे अत्यंत मार्मिक उदाहरणही तीच.. साडी!
हजारो वर्षांपासून स्त्रीचे सौष्ठव दाखवू शकणारे,
चित्ताकर्षक, देखणे, न शिवता परिधान करता येणारे असे हे वसन. त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे.


साडी हा वैश्विक वसन संस्कृतीतला सगळ्यात जुना आणि अजूनही वापरत राहिलेला वस्त्रप्रकार आहे! साडी हे नाव संस्कृत 'शाटी' म्हणजेच कापडाची पट्टी यावरून आले आहे. त्याचेच प्राकृत रूप साडी. जुन्या जातक कथांमध्ये स्त्रीच्या वस्त्रांसंबंधी सट्टिका या शब्दाचा उल्लेख येऊन गेलेला आढळतो.बदलत्या वस्त्रविश्वाचा आढावा घेताना भारतीय स्त्रीच्या वस्त्र संस्कृतीची कशी उत्क्रांती होत गेली, हे बघत आपण जाऊन पोहोचतो ते थेट सिंधू संस्कृतीत. तसे कापसापासून वस्त्र तयार करणे हे मेसापोटेमियन संस्कृतीत सुरू झाले होते. तिथूनच हे सिंधू संस्कृतीत प्रवेश करते झाले. त्यामुळे लंगोट नेसण्याच्या आत्ताच्या पद्धतीने त्या काळात असे वस्त्र नेसले जायचे. देहाच्या वरच्या भागात काही नेसायची पद्धत पुढेही अनेक वर्षे भारतात नव्हती. अगदी थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या कातडीने वरचे अंग झाकले जाई. त्यामुळे गळ्यात विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल असे. मुळात आपल्या देशातल्या प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रकारच्या तापमानाने फार कपडे घालणे ही कधीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे भारतीय वस्त्र संस्कृतीत कपड्याचे महत्त्व हे जास्त सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रकारचे आहे.

नंतर आर्य लोक भारतात प्रवेशते झाले. त्यांच्याकडून संस्कृत शब्द मिळालाय 'वस्त्र'. आणि अग्निपूजक आर्यांनी लाल रंगाचे महत्त्व वाढवले. लाल रंगाला प्रजोत्पादन, पावित्र्य याचे प्रतीक समजले जाई. त्यामुळेच अजूनही उत्तर भारतीय लग्न ही लाल साडीत लावली जातात! तर या काळातही, सर्वांगाला गुंडाळलेले एक कापड असाच स्त्रियांचा वेष दिसतो. यात परिधान म्हणजे अंतरीय म्हणजेच कमरेला नाडी सदृश धाग्याने (मेखलेने) धरून ठेवलेले वस्त्र, थंडीत प्रवर म्हणजे चेहरा झाकण्यासाठी आच्छादन आणि उत्तरीय जे शालीसारखे खांद्यावरून घेतले जाई. हे फक्त त्या काळातल्या श्रीमंताची चैन होती बरे! गरीब स्त्री-पुरुष लंगोटीतच वावरत होते.यानंतरच्या काळात मात्र आताच्या साडीसारखे बदल हळूहळू दिसायला लागले ते मौर्यांच्या आणि संगाच्या काळात. म्हणजे सांचीचा प्रसिद्ध स्तूप बनल्याचा काळ. १८७-७८ ख्रि.पूर्व काळ हा. या काळात कमरेवरच्या काया बंधाला वस्त्र खोचले जाऊन त्याच्या निर्या आताच्या धोतरासारख्या खोचल्या जाऊ लागलेल्या त्या काळात सापडलेल्या चित्रांवरून आणि पुतळ्यांवरून दिसते.

काही शतकांनंतर गुप्तांच्या काळात शिवलेले कपडे दिसायला लागतात. याच काळात घागरासदृश वस्त्र नेसायला सुरुवात झालेली दिसते. तसेच शिवलेल्या चोळ्याही चित्रांमध्ये दिसू लागतात. याआधीच्या काळात कंचुकी म्हणजेच वस्त्राचा एक पट्टा छाती झाकायला वापरलेला दिसतो. संस्कृत साहित्यात त्याचे उल्लेख येऊन गेलेले आढळतात.

पर्शियन लोक शिवण्याची कला आपल्यासोबत घेऊन आले आणि भारतीय स्त्रियांच्या वस्त्रसंस्कृतीत बदल होऊ लागले. याच काळात अजंठ्यामधील चित्रांमध्ये शर्टासारखे जॅकेट ब्लाउझ म्हणून वापरायला सुरुवात झालेली दिसते. तरीही त्या काळातल्या उच्चवर्णीय स्त्रिया चोळी घालत नसत. नोकरवर्गात चोळी आधी वापरली जाऊ लागलेली दिसते. मुळात या बदलाचे कारणही बाहेरून आलेल्या या लोकांची वस्त्र होती. त्यांच्याप्रमाणेच आपणही वरचे अंग झाकूनही त्याचे सौष्ठव दाखवता येईल, हे दिसून आल्यावर चोळीसदृश कपडे वापरणे वाढले असावे. तसेच बौद्ध ,जैन धर्मांच्या प्रभावामुळेही आकर्षक प्रलोभक दिसू नये, म्हणून वरचे अंग झाकणे आवश्यक समजले जाऊ लागले. कालौघात या जॅकेटचे स्वरूप बदलत ते आखूड आणि फक्त छातीवर तंग बसणारे असे वस्त्र - म्हणजेच चोळी म्हणून वापरले जाऊ लागले.


संत ज्ञानेश्वरांच्या काव्यात तेराव्या शतकात 'चंदनाची चोळी' शब्द येऊन गेलेला आढळतो. या चोळीवर वस्त्राचा ओढून घेतलेला भाग म्हणजेच पदर. हा पदर मात्र आपण रोमन संस्कृतीतून घेतला आहे!
रोमन लोकांमध्ये वस्त्राचा एक भाग पुढे ओढून तो डाव्या खांद्यावर टाकलेला असे. ही झाली साडीची ओरिजिनल स्टाईल! असेच दोन पायांच्यामधून वस्त्र नेऊन मागे खोचले जाई आणि पुढे पदर ही झाली नऊवारी पद्धतीने साडी नेसायची सुरुवात!

गुप्तकाळात मात्र अशा काष्टा पद्धतीने साडी नेसणे हळूहळू मागे पडत अंतरीय लुंगीसारखे गुंडाळले जाऊ लागले. सकच्छ साडी महाराष्ट्र आणि दक्षिणेपुरतीच नेसली जाऊ लागली. त्यामुळे उत्तर भारतीय साडी नेसणे हे गुंडाळून आणि आपले नऊवारी नेसणे हे निर्या मागे नेऊन खोचणे असा फरक तयार झाला. अशा प्रकारे आपल्या खंडप्राय देशात निरनिराळे समाज या साडी नेसण्यात थोडेसे फरक करत आपले वेगळेपण टिकवू शकले आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीवर साडीचा पडलेला हा लक्षणीय प्रभाव आहे.

मुघलकाळात भारतीय वस्त्रांमध्ये उपयुक्ततेच्या पुढे जाऊन सौंदर्यीकरण होऊ लागले. तलम कापड, नक्षीकाम, कलमकारी, जरीचा वापर, कुंदनचा वापर, सिल्क मार्गाने येणारे उत्कृष्ट सिल्क अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव वस्त्र सजवण्यामध्ये होऊ लागला. मुघल सम्राटांच्या दरबारी कसलेले कारागीर जरीकाम, शिवणकाम करीत असत. मुघल जे ब्रोकेडचे कापड वापरत असत, ते त्यांच्या प्रभावामुळे जगभर 'किन्खापी' म्हणजेच 'किन ख्वाब' अर्थात 'सोनेरी स्वप्न'अशा नावाने अजूनही ओळखले जाते. चेहरे झाकण्याची पद्धत सुरू झाल्याने पदराची लांबी वाढली. सलवार-कमीझसारखी वस्त्र प्रावरणे थंड प्रदेशात लोकप्रिय होऊ लगली. याच काळात साडी घागरा पद्धतीने नेसताना पारदर्शक वस्त्रामागे अवयव झाकण्यासाठी मध्ये घागरा घातला जाऊ लागला.त्यावर घ्यायचा दुपट्टा ही साडीची वेगळी स्टाईलही लोकप्रिय होऊ लागली. मुघलांच्या कापड शौकाचा परिणाम म्हणून निरनिराळ्या गावांत विणल्या जाणार्या वस्त्रांमुळे त्या गावांची महती वाढली. बनारसी, बांधणी, पटोला, चंदेरी, महेश्वरी.....किती नावे घ्यावी! या सर्व ठिकाणांच्या साड्या आपण आजही हौशीने वापरतो!

यानंतरचा काळ म्हणजे भारतातले ब्रिटिश राज्य. तो युरोपातला स्त्रीने डोक्यापासून पायापर्यंत सर्व झाकलेले असण्याचा व्हिक्टोरियन कालखंड. याही काळात भारतात केरळ-बंगाल यासारख्या प्रांतांत चोळी घालायची पद्धत नव्हतीच. १८६०च्या आसपास रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्रनाथ हे पहिले आयसीएस अधिकारी असल्याने, त्यांना गव्हर्नरकडे पार्टीचे सपत्निक निमंत्रण असे. अशाच एका पार्टीला चोळी न घालता बंगाली पद्धतीने साडी नेसलेल्या ज्ञाननंदिनीदेवींना प्रवेश नाकारला गेला. आणि मग टागोर घराण्यातल्या स्त्रिया पाश्चात्त्य पद्धतीचे 'ब्लाउझ' घालून साडी नेसू लागल्या! जे सोयीचे आहे ती पद्धत आपोआप रुळत जाते, या नियमाला याही वेळी अपवाद न होता सर्वच प्रांतांत लज्जा रक्षणासाठी ब्लाउझ घातलेच जाऊ लागले! अर्थातच या ब्लाउझांवर पाश्चात्त्य प्रभाव जास्त होता.

महाराष्ट्रात याच काळात नऊवारी साडी काष्टा पद्धतीने नेसली जात होती. झाशीच्या राणीच्या चित्रात काष्टा पद्धतीची साडी नेसलेली घोड्यावर आरूढ राणी आपण बघितलीच आहे. राजा रविवर्म्यालादेखील मराठी पद्धतीची साडी हा पोषाख अगदी त्याच्या देवदेवतांच्या चित्रांमध्येही वापरावासा वाटला आहे. या प्रकारच्या साडीत स्त्रीचे सौंदर्य आणि सौष्ठव खूलून दिसते,असे त्याचे मत होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला बालगंधर्व नावाचे स्वप्न पडले आणि नऊवारी साडीतली मूर्तिमंत शालीनता तमाम मराठी स्त्रियांवर गारूड करून गेली. त्या काळात स्त्रियांची साडी नेसायची पद्धत चक्क एका पुरुषाने बदलली! दोन्ही खांद्यांवर पदर आणि पाय उघडे न दिसणारी नऊवारी पैठणी नेसलेली संगीत शाकुंतलमधली शकुंतला बनून आलेल्या बालगंधर्वांनी मराठी साडीचे एक युग अक्षरशः गाजवले. त्यांच्या नाटकात नेसल्या गेलेल्या प्रकारांच्या पैठण्या शालूंनी मराठी घरातली कपाटे भरू लागली!

यानंतरच्या काळात साडीवर जसा इतिहास-भूगोलाचा प्रभाव पडत गेलाय, तसाच चित्रपट सृष्टीचाही मोठा प्रभाव पडत गेलाय. १९३७ सालात आलेल्या त्या काळातल्या सुपरहिट 'कुंकू' चित्रपटात शांता आपट्यांनी नेसली तशी साडी माझी आजी नेसत असे! सध्या सुरू असलेली फुग्याच्या बाह्यांच्या ब्लउझची फॅशनही तेव्हाचीच!१९४२च्या आसपासचा काळ खादीच्या साड्यांनी भारला गेला, तर पन्नास-साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला! मधुबाला, नूतन यासारख्या सौंदर्यवती साडीत अतिशय मोहक दिसत. तरी साडी नेसायची पद्धत अगदी साधीसुधी असे. पदर बहुधा एकत्र पकडून पिन लावणे इतपतच साडी नेसणे असे!
अंग प्रत्यंग दाखवणारी चोपून बसवलेली साडी नेसायची अगदी नवी पद्धत आणली १९७५ च्या आसपास मुमताजने. अजूनही लग्नांमध्ये हौसेने अशी साडी स्वागत समारंभांमध्ये नेसताना दिसतात.
नव्वदच्या दशकात यश चोप्रांच्या सिनेमातल्या नायिका साडीमध्ये विलक्षण देखण्या दिसत. त्या साड्यांमुळे पेस्टल रंगाच्या, शिफॉनच्या प्लेन साड्या लोकप्रिय झाल्या. यश चोप्रांची चांदनी कोण विसरेल!आत्ताच्या काळातल्या नायिकासुद्धा स्टाइल स्टेटमेंट म्हणून साडी हिरिरीने वापरताना दिसतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तरुण मुली आवर्जून नऊवारी साडी नेसताना दिसतात. भले आता घोडा गेला, बुलेट आली! पण परंपरा म्हणून साडी हवीच आहे.

हजारो वर्षांपासून स्त्रीचे सर्वांग झाकूनसुद्धा स्त्रीला मोहक दिसवणारा, कोणासाठी परंपरा सांभाळणारा तर कोणासाठी स्वतःची ओळख बनलेला हा वस्त्रप्रकार, साधेपणात सौंदर्य खुलवणारा, स्त्रीची शालीनता दाखवणारा, तर कधी स्त्रीच्या सौष्ठवाचे दर्शन घडवणारा ग्लॅमरस अवतार धारण करणारा, त्याच्या मर्यादा असूनही वेगवेगळ्या प्रकारांनी कारणांनी वापरला जातोय आणि जाणार आहे,
हेच मला वाटते साडीचे स्त्री मनावरचे गारूड आहे!

नावात काय आहे?



नावात काय आहे?

कुणाला वडिलोपार्जित इस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यान पिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली असाव, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन बरीचशी विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. अशा आडनावांची संख्या थोडीच असली तरी, ती धारण करणार्या कुटुंबांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतो हे मात्र निश्चित. इतकी विविध आणि वैचित्र्यपूर्ण मराठी आडनावे कशी प्रचारात आली? रूढ झाला? इतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान्पिढ्या कसा चालू राहिला, हा खरोखर सामाजिक संशोधनाचा विषय आहे.लेखात ज्या ज्या आडनावांचा मी उल्लेख केला आहे ती आडनावे खरोखर प्रचारात आहेत, रूढ झालेली आहेत, म्हणूनच मी ती विचारात घेतली आहेत, कुणाचीही स्तुती, उपहास, हेटाळणी किंवा टिंगलटवाळी करण्याचा माझा उद्देश नाही. कोणीही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.

परिचय उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो. आडनावाचा अर्थ जरी उपनाम,कुलनाम किंवा अधिकनाम असा होत असला, तरी त्याची व्युत्पत्ती वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितली जाते. ‘अर्ध या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप म्हणजे आड असे काहींचे म्हणणे आहे. तसेच ‘अड्ड या समानार्थी कन्नड शब्दावरून आड हा शब्द आला असावा, असे अन्य काहींचे म्हणणे आहे. ज्याच्या आश्रयाने आपण वावरतो ते नाव, अशीही आडनावाची व्युत्पत्ती करण्यात येते. आपण आपल्या घराच्या, गावाच्या, धंद्याच्या किंवा गुणाच्या आश्रयाने वावरत असतो;त्यामुळे ही व्युत्पत्ती अधिक योग्य वाटते.एकच व्यक्तीनाम धारण करणार्या अनेक व्यक्ति समाजात एकत्र आढळल्यामुळे व्यक्तीस निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली अशा परिस्थितीत काही काळ तरी व्यक्तीच्या पित्याला प्राधान्य असलेल्या समाजात पित्याचे नाव व्यक्तीच्या नावाला जोडण्याची प्रथा होती. रंगो बापूजी, दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, महम्मद बिन कासीम वगैरे उदाहरणे सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जात असे. अमुक स्त्री (तिचे नाव) भर्ता अमुक पुरुष (त्याचे नाव) म्हणजे त्या पुरुषाची ती पत्नी, असे समजले जात असे. परंतु व्यक्तिनिर्देशाला ही पद्धतसुद्धा अपुरी पडू लागली, तसेच समाजात कुटुंबाचे महत्त्व वाढीस लागून प्रत्येक व्यक्ती ही तिच्या कुटुंबाच्या योगे ओळखली जाऊ लागली; त्यामुळे कुटुंबाच्या अगर कुलाच्या नावाची म्हणजेच आडनावाची आवश्यकता भासली असावी.


समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. ही प्रथा आपल्याच देशात नव्हे तर सार्‍या जगातील देशात आणि धर्मात आहे. स्त्रीला नवर्‍याचेच आडनाव आपल्या नावासमोर लावावे लागते. आनुवंशिकता विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्य पिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोझोम्समुळे येतात. क्रोमोझोम्सवर जनुके आणि डीएनएचे रेणू असतात. सर्वच सजीव प्रजातींच्या बाबतीत हे खरे आहे. ते अपत्य मुलगा असो की मुलगी असो, अर्धी गुणसूत्रे, म्हणजे 23 गुणसूत्रे (गुणसूत्रांना रंगसूत्रे असेही म्हणतात पण ते, चुकीचे आहे ) वडिलांकडून व अर्धी गुणसूत्रे, म्हणजे 23 गुणसूत्रे आईकडून आलेली असतात. म्हणजेच अपत्यावर पितृवंशाचा जेव्हढा अधिकार असतो तेव्हढाच मातृवंशाचाही असतो हे ओघाने आलेच.आपल्या पूर्वजांनी, अनेक मातापित्याचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा आणि केसांचा रंग, चेहर्याची ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, दमा, मधुमेहासारखे रोग वगैरे आणि

जात म्हणजेच आनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे, आडनाव म्हणजेही जात असे समीकरण झाले. आता आपल्या लक्षात येईल की, आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतू कालांतराने विचित्र आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरण्याची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर फारसा होत नसे. इंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरण्याची प्रथा रूढ झाली आणि आता आडनांव नसलेली व्यक्ती जवळजवळ दुर्मीळच आहे.

आपल्यात ‘खरे आहेत तसे ‘खोटे ही आहेत. ‘गोरे आहेत तसेच काळे, सावळे, हिरवे, पिवळे, निळे, जांभळे, भुरे, करडे, शेंदरे आणि तांबडेही आहेत. शेवटी सगळ्या रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरे, पांढरकर आणि पांढरकवडे ही आडनावे देखील आहेत. लहाने आहेत त्यांना लांबट आणि लांबे विरोध करतात. दांगट आहेत तसेच लुकडे आणि लुळे आहेत. टिल्लूही आहेत. लुगडे आणि धोत्रे ही देखील आडनावे आहेत. सदरे, गोटे, परकुटे, उघडे आणि दिगंबरे देखील आहेत. उखळे-मुसळे, चिमणे-कावळे, लांडगे-कोल्हे, उन्हाळे-हिवाळे, कडू-गोड, गाढवे-शहाणे, ढेकणे-चिलटे अशाही जोड्या आढळतात.निसर्गात आढळणारे प्राणी तर आम्हाला इतके प्रिय आहेत की त्यांच्याशी आडनावरूपाने आम्ही पिढ्यान्पिढ्या संबंध ठेवला आहे. वाघ, अस्वले, कोल्हे, लांडगे, जिराफे, काळवीट, गेंडे, मगर ही आडनावे वन्य प्राण्यांशी; तर गाढवे, घोडे, ढेकणे,मुंगी, चिलटे, कुत्रे, कुत्रेकर, मांजरेकर, डुकरे,इंगळे, एडके, बकरे, गायधनी, गायतोंडे, ढोरे वगैरे आडनावे माणूस वस्तीतल्या प्राण्यांशी सख्य दर्शवितात. वाघमारे, वाघडोळे, वाघमोडे आणि वाघचोरे देखील आहेत. आता वाघ ही काय चोरायची वस्तू आहे. पण आडनाव रूढ होण्याइतके वाघचौर्य त्यांच्या पूर्वजांनी करून दाखविलेले दिसते. वाघमारे सारखेच ढोरमारे आणि माणूसमारे देखील आहेत. चिमणे, कावळे, कोकीळ, गरूड, घारे, मोरे, साळुंके ही आडनावे आमचे पक्षीप्रेम दर्शवितात. आवळे, आळवे, आंबे, एरंडे, कणसे, फणसे, काकडे, कारले, कांदेकर, कोथमिरे, खारके, खोबरे, नारळे, गवारे, जांभळे, भोपळे, मुळे, भेंडे, दोडके, पडोळे, पडवळ हीआडनावे फळे आणि भाज्या तर; खराटे, दगडे, कुदळे, पावडे, कुर्हाडे, गोटे, कुयरे, कुलपे, खुंटे, घागरे, उगळे, मुसळे, पाटे, चाके, पलंगे, पतंगे वगैरे आडनावे नित्याच्या वस्तूंशी निगडीत आहेत.हिरे, माणके, सोने, चांदे, तांबे, पितळे, जस्ते, कथले ही रत्ने आणि धातू तर डोळे, डोके, काने, हाते, माने, पोटे, पाठे, कपाळे, मांडे, गुडघे, नाके, दाते, दाढे, सुळे, हिरडे वगैरे शारीरिक अवयव देखील आडनावरूपाने वावरतात. डोईफोडे, पाठराबे, पोटदुखे, कानपिळे, कानतोडे, कानफाटे, कानतुटे, बहिरे, आंधळे, वाकडमाने, लंगडे, लुळे, थिटे, एकबोटे, अक्करबोटे अशी आडनावेदेखील प्रचारात असून ती आम्ही स्वीकारली आहेत.काही आडनावे तर फारच भव्य व पल्लेदार आहेत. उदा. प्रचंड, अचाट, अजिंक्य, अपराजित, अयाचित, सहस्त्रबुध्दे, सहस्त्रभोजने, हजारे, लाखे, सवालाखे, कोटे, करोडे, कुबेर वगैरे.स्वभाव वैशिष्ठ्यावरूनही कित्येक आडनावे रूढ झाली आहेत. आगलावे, आडमुठे, आळशी, बोंबले, कंटक, कलंके, उदार, उदास, उकिडवे, चतुर, शहाणे, गोडबोले, थोरबोले, वगैरे शरीराच्या गुणावगुणावरूनही कित्येक आडनावे रूढ झाली आहेत. पिसाट, बहिरट, बोबडे, पाचपोर, पाचपुते, अष्टपुत्रे, सातपुते, बारपुते, दशपुत्रे, चारभाई, पाचभाई, सातभाई, बारभाई तेरभाई, वगैरे मंडळी आडनावांप्रमाणे खरोखरच वागलीत तर लाल त्रिकोणाची वाट लागलीच म्हणून समजा.पुणेकर, नगरकर, धुळेकर, नाशिककर अशी प्रत्येक गावाला किंवा खेडयाला ‘कर जोडून तर हजारो आडनावे रूढ झाली आहेत.कुळकर्णी, देशपांडे, पांडे, पाटील, देशमुख, सोनार, सुतार, लोहार, तेली या आडनावांसंबंधी वेगळे लिहायची गरज भासत नाही.कोकणस्थांची आडनावे त्या मानाने बरीच मर्यादित आहेत. फडके, बापट, अभ्यंकर, दामले, दांडेकर, आपटे, गाशे, भिडे, गोगटे, लेले, नेने, पटवर्धन, पेठे, पेंडसे, पोंक्षे, मराठे, साने, सोमण, दाते, गाडगीळ, कर्वे, बर्वे, खरे, गोखले, टिळक, केतकर, बेडेकर, थत्ते, मुळे, लागू अशी बारा म्हणांची आडनावे वाढत वाढत एकूण साठ आडनावे झाल्यानंतर साठावे आडनाव साठे झाले असा समज आहे. कोकणस्थांची निवासदर्शक आडनावेही बरीच आहेत. उदा. आगरकर, पाटणकर, नानिवडेकर वगैरे.सीकेपी कुटुंबातही मोजकीच आडनावे असतात. राजे, प्रधान, गुप्ते, मथुरे, फणसे, दळवी, जयवंत, सुळे वगैरे.परंतू बंदसोडे, होनमोडे, बारसोडे, तूपसमुद्रे, तक, फळ, गदो, भातलवंडे, तरकसबंध, भूत, भुते, ब्रम्हराक्षस, रावण, हडळ, हगवणे, हगरे, चाटुफळे, पिसाट, घरबुडवे, भानचोद, झवकिरे, लवडे, माणूसमारे,ढोरमारे, चणेचोर, पगारचोर, दाढी यासारखी आडनावे देखील कशी प्रचारात आली हे खरोखर गूढच आहे.

आडनावांच्या बाबतीत अनेक विनोदी किस्सेही आहेत. उदा. पिसाटांचा मुलगा घरबुडव्यांची मुलगीआणि हा विवाह जुळविणारे मध्यस्थ जर आगलावे असतील तर त्या संसाराची काय अवस्था होईल ह्याची कल्पनाच केलेली बरी !!
इतकी विविध आणि विचित्र्यपूर्ण आडनावे कशी प्रचारात आली, रूढ झाली, अतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान्पिढ्या कसा चालू राहिला, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे.
कोणतेही आडनाव रूढ होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रथम ते स्वीकारले पाहिजे. जोशी, पाटील, कुलकर्णी, पांडे, देशपांडे, देशमुख किंवा सोनार, सुतार, वैद्य अशी व्यवसायावरून पडलेली आडनावे किंवा नागपूरकर, पुणेकर, नाशिककर यासारखी त्या गावी निवास दर्शविणारी आडनावे कुटुंबातील व्यक्तींनी स्वीकारणे फारसे कठीण नाही हे आपण समजू शकतो. तसेच धैर्यवान, अजिंक्य, अपराजित, सहस्त्रबुद्धे, बुद्धीसागर, ज्ञानसागर, महाबळ, महाजन, कोटीभास्कर अशी सद्गुणदर्शक आडनावेही स्वीकारणे फारसे कठीण नाही. परंतू गाढवे, ढेकणे, चिलटे, कुत्रे, घोडे, आळशी, बाहिरट, पिसाट, चिकटे, आगलावे, मुसळे, कानफाटे, एकबोटे, बारशिंगे, पोटदुखे, नवरे, ननवरे,डोईफोडे, बोंबले, चणेचोर, चाटुफळे, दीडमिशे यासारखी आडनावे कुटुंबातील व्यक्तींनी स्वीकारली, पिढ्यान्पिढ्या आपल्या नावासमोर लावली, यामागे काहीतरी प्रबळ कारण असले पाहिजे किंवा समाजाने बळजबरीने ही आडनावे त्या कुटुंबावर लादली असावीत आणि काही पिढ्यांतर ही आडनावे नाईलाजाने पचविली गेली असावीत.काही आडनावे तर इतकी अश्लिल आहेत की ती उच्चारणे म्हणजे देखील असभ्यपणाचे ठरेल. ही अश्लिल आडनावे कशी रूढ झालीत ह्याची कारणे शोधायला हवीत. वरवर विचार करता असे वाटते की, ज्या काळात ही आडनावे रूढ झालीत त्या काळात त्या शब्दांना वेळा अर्थ असला पाहिजे आणि कालांतराने आजचा अश्लिल अर्थ प्राप्त झाला असला पाहिजे. दुसरेही एक कारण असू शकते. परप्रांतीय भाषेतील शब्दावरून ही आडनावे रूढ झाली असावीत आणि ह्या परप्रांतीय भाषांत त्या शब्दांना वेगळा आणि चांगला अर्थ असला पाहिजे.एकच आडनाव वेगवेगळ्या कुटुंबांना वेगवेगळ्या करणांनी रूढ झाले असण्याचीी शक्यता नाकारता येत नाही.

आज जी आडनावे प्रचलित आहेत, त्यापैकी बरीच आडनावे बदललेली असण्याची आणि भविष्यात बदलली जाण्याची शक्यता आहे.गाढवे कुटुंबातील एखादा मुलगा अतिशय बुद्धिमान निघाला आणि त्याने आपले आडनाव सहस्त्रबुद्धे असे बदलवून घेतले किंवा कारकून ह्या आडनावाचा मुलगा स्वकर्तुत्त्वामुळे मोठया अधिकाराची जागा भूषविता झाला आणि त्याने आपले आडनाव अधिकारी असे बदलवून घेतले तर त्यात काहीही वावगे नाही. ‘ढेकणेचे चे ‘देखणे आणि बोंबलेचे महाशब्दे झाले असे ऐकिवात आहे.

कुलनामाच्या प्रथेची सुरवात कुलनामाची अगर आडनावाची प्रथा नक्की केव्हा सुरूझाली, हे सांगणे कठीण आहे. हिंदू लोकांप्रमाणेच पूर्वी हिब्रू, मिसरी, असुरी, बॅबिलोनियन, ग्रीक इ. लोकांतही आडनावाची पद्धत नव्हती. इंग्लंडमध्ये नॉर्मन दिग्विजयानंतरच्या काळात म्हणजे अकराव्या-बाराव्या शतकांपासून कुलनामाचा वापर होऊ लागला, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातही त्याच सुमारास तऱ्हेतऱ्हेच्या कुलनामांचा वापर सुरू झाला असावा, असे काही लोकांचे मत आहे. शिलालेख किंवा ताम्रपट यांतील नामनिर्देशांवरुन हा निष्कर्ष काढण्यात आला असावा. परंतु त्यांतील कुलनामांना आनुवंशिक स्वरूप प्राप्त झाले होते की नाही, हे सांगता येत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. ही उपनामे त्या काळात कुलनामे म्हणून जरी रुढ नसली, तरी व्यक्ती निर्देशक:करिता उपनामे वापरण्याची पद्धत तेव्हा रूढ असावी, असे वाटते. आडनावाचे महत्त्व खऱ्या अर्थाने पेशवाईनंतर इंग्रजी अंमलात वाढले.कुलनामे ही प्रथमत: खऱ्या किंवा काल्पनिक मूळ पुरुषांच्या नावांवरून किंवा कुटुंबाच्या इतिहासात प्रसिद्धी पावलेल्या व्यक्तिंवरून बहुश: घेतलेली असावीत. अमुक पित्याचा मुलगा म्हणून व्यक्तीचा परिचय करून घेण्याची ही पुढची पायरी असावी. इंग्लिंश लोकांतील हॅरिसन, जेफरसन, जॅकसन, अॅडम्स इ. उदाहरणे या सदरात येतात. सिंधी लोकांमधील रामचंद्रानी, हेमराजानी, कृपलानी, मीरचंदानी इ. नावेही त्या त्या घराण्यातील मूळ पुरुषाकडून अगर प्रसिद्ध व्यक्तीवरून आली, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे ऋषीच्या वा गोत्राच्या नावावरूनही अत्रे, जमदग्नी, वसिष्ठ, गर्गे इ. आडनावे उद्भवली असावीत, असेही अनुमान करण्यात येते.वि. का. राजवाडे यांनी पौराणिक व श्रौतसूत्री गोत्रांवरून अनेक आडनावांची व्युत्पत्ती लावली आहे. उदा., फाण्टा: वरून फाटक, कौरव्या: वरून कर्वे, श्वानेया: वरून साने इत्यादी. परंतु या नावांच्या व्यक्तींची आजची गोत्रे ह्या व्युत्पत्ति कल्पनेस पोषक ठरत नाहीत. महाराष्ट्रीय प्रथावरील पैतृकनामसदृश आडनावे वगळल्यास इतर अनेक कारणांवरूनही आडनावांची व्युत्पत्ती झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रीय आडनावांची पुढीलप्रमाणे ठोकळ विभागणी केली जाते : स्थलनिर्देशक (पुणेकर, विजापूरकर, निझामपूरकर, डोंगरे, पर्वते इ.) , व्यवसाय निर्देशक (जोशी, देशमुख, उपाध्ये, पाध्ये, व्यास, पुराणिक, कुलकर्णी, चौगुले, पोतदार, सोनार, पाटील, देसाई, देशपांडे, चिटणीस, फडणीस, कर्णिक इ.),
वर्णवाचक (काळे, गोरे, ढवळे, हिरवे इ.),
प्राणिवाचक (वाघ, लांडगे, कावळे, हंस, राजहंस, मोरे,
कोल्हे, गाढवे इ.)
वनस्पतिवाचक (पिंपळे, फुले, मोगरे, पडवळ, भोपळे इ.), पदार्थवाचक (तांबे, पितळे, सोने, लोखंडे इ.),
शरीरावयव निर्देशक (पोटे, डोळे, काणे इ.),
नातेदर्शक(पोरे, पित्रे, नातू, सातपुते, नवरे इ.),
गुणवाचक (धैर्यवान, अजिंक्य, सहस्रबुद्धे इ.),
निंदाव्यंजक (आगलावे, बोंबले, पोटफोडे, जीवतोडे इ.)

त्याचप्रमाणे गुजराती लोकांत उपाध्याय, भट, देसाई, मेहता, पटेल, कापडिया इ. व्यवसाय निदर्शक आडनावे आहेत. बंगाली लोकांत मुखर्जी (मुख्योपाध्याय), बॅनर्जी (बंद्योपाध्याय), चतर्जी (चट्टोपाध्याय), बोस (बसु किंवा वसु), दत्त, मित्र, सेन, ठाकूर इ. आडनावे व्यवसाय सूचक अगर जातिवाचक असलेली दिसून येतात. उत्तर प्रदेशातील दुबे, द्विवेदी, त्रिपाठी, चौबे, चतुर्वेदी, दीक्षित, पंत, पंडित, शर्मा, श्रीवास्तव आणि मद्रास-म्हैसूरकडील अय्यर-अय्यंगार, पिळ्ळै, नायडू; तसेच केरळमधील नायर, नंबुदिरीपाद इ. नावेही जातिवाचक अगर व्यवसाय वाचक आडनावे होत. महाराष्ट्रात व इतरत्र आलेल्या काही दक्षिणी लोकांमध्ये स्वत:च्या घराण्याच्या आणि वैयक्तिक नावांच्या आद्याक्षरांपुढे ‘राव ही उपाधी आडनावाप्रमाणे वापरण्याची प्रथा आहे. उदा., संयुक्त राष्ट्रसंघात पूर्वी भारताचे प्रतिनिधी असलेले बी. एन्. राव यांचे संपूर्ण नाव बेनेगल नरसिंग राव असे होते. पारशी लोकांतही डॉक्टर, बाटलीवाला, दारूवाला, मोटारवाला इ. व्यवसाय वाचक आडनावे आढळून येतात.

उत्तर भारतात व्यक्ति नावांच्या शेवटी येणाऱ्या राम, दास, लाल, चंद इत्यादींसारख्या नावांचा उपयोग आडनावांसारखाही करतात. शीख व रजपूत लोकांत आडनावे नसतात. ते आपल्या नावापुढे सिंग (सिंह) लावतात. मुसलमानांत आडनावाची पद्धत सर्रास रूढ झालेली नाही; तरीपण हल्ली ते शेख, सय्यद, काझी, फकीर, गुलाम इ. पंथवाचक. नदाफ, मुजावर वगैरे व्यवसायदर्शक, तसेच ऐतिहासिक किंवा पदवीदर्शक नावांचाही उपयोग आडनावांसारखा करू लागले आहेत.

मालकांची आडनावे नोकरांनी घेण्याच्या पद्धतीमुळेही काही काही आडनावांची उसनवार झाली आहे. इचलकरंजीचे जहागीरदार जोशी हे घोरपडे झाले. आंग्रे यांच्या पदरी असलेले बिवलकर नावाचे ब्राह्मण पुढे आंग्रे झाले. या कारणामुळे व उच्च जातीची आडनावे स्वत:च्या घराण्यास लावण्याच्या आवडीमुळेही छेत्रे, गोरे, जोशी, मंडलिक इ. ब्राह्मण आडनावे मराठ्यांत; चव्हाण, मोरे, गायकवाड, जाधव, कदम, शेलार, शिंदे इ. मराठ्यांची आडनावे महारांत आणि साठे, राजगुरू, नांदे, लोखंडे, इ. उच्चवर्णीय आडनावे मांगांत सापडतात. भारतात आडनावे बदलण्यास कायद्याने बंदी नाही, त्यामुळे आडनावे बदलण्याची ही क्रिया आजही चालू आहे.आडनावांची सुरुवात व्यक्ति निर्देशाकरिता जरी झाली असली, तरी त्यांचा सामाजिक परिणाम फार व्यापक आहे. ज्या समाजात घराण्यावरुन व्यक्तीचे सामाजिक स्थान ठरते, त्या समाजात आडनावाला विशेष महत्त्व येणे क्रमप्राप्त आहे.


'वाट'


'वाट' 


जगातील तीन प्रकारची माणसं...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
३. 'वाट' शोधणारे

शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...

काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट' बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...

'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात...त्यांच्या आनंदाची परिसीमा तेवढीच...

त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...

आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं..
इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!


विचार


विचार 


पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,
          मरेपर्यत टिकतात..
      कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
          इतिहास घडवतात..
       
 घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....
 ""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....                                       

कुणाच्या नशिबाला हसू नये
               नशिब कुणी विकत घेत नाही
      
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
           वाईट वेळ सांगून येत नाही.!

बुद्धी कितीही तल्लख असली तरी
          नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
 
 बिरबल बुद्धीवान होता तरीही तो          
             राजा होऊ शकला नाही.!

     समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.

"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामगील दुःख
रागवण्या मागील प्रेम
*आणि शांत रहाण्यामागील कारण."

कपडे नाही
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!

चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा
एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं.


स्वयंपाक घर, घराचा आत्मा


स्वयंपाक घर, घराचा आत्मा

*******
'स्वयंपाक घर' हा घराचा आत्मा असतो. स्वयंपाक घर म्हणजे पवित्र महायज्ञाची तयारी जिथे केली जाते ती जागा. कारण उदरभरण म्हणजे ते नुसते पोट भरणे नसते तर ते एक यज्ञकर्म करणे समजले जाते व अशा उदरभरणाची सोय जिथे केली जाते ती जागा म्हणजे यजाची पवित्र जागा, स्वयंपाक घर होय! व या ठिकाणी सर्व काम पवित्र रीतीनेच केले पाहीजे. तसेच चौसष्ट कला पैकी पाककला एक उच्च दर्जाची कला समजली जाते. चविष्ट व पौष्टीक पदार्थ करणे ही एक पाक कला आहे व स्वयंपाक घर एक कला दालन आहे . तर अशा कला दालनामधे वावरताना प्रत्येकाने पाळावित अशी कांही पत्थे व करण्यायोग्य सोप्या गोष्टी.
स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे. नियमित साफ-सफाई झाली पाहीजे.
स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी शुचिर्भुत होऊन, सुती व काम करण्यास सोईचे स्वच्छ कपडे परिधान करावेत.
केस व्यवस्थित एकत्र वर बांधलेले असावेत.
नेहमी आधी साबणाने हात स्वच्छ धुवूनच मग कामाला सुरवात करावी.
स्वयंपाकात लागणारे डाळी, तांदुळ, कडधान्ये नेहमी साफ करून ठेवावीत. पीठं चाळून ठेवावीत. शेंगदाणे भाजून कुटून ठेवावेत. रवा भाजून ठेवावा. पोहे चाळून ठेवावेत.
स्वयंपाकात लागणारे मसाले तीन किंवा सहा महिन्याचेच करावेत. अशाने त्यांचे स्वाद कमी होत नाहीत. पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.
आधीचे पदार्थ आधी वापरावेत. ते जास्त जूने होऊ देऊ नयेत.
गवार, घेवडा, मटार सारख्या भाज्या आधीच निवडून, मोडून फ्रीजमधे ठेवाव्यात. पालेभाज्या, कोथिंबीर निवडून ठेवावे. आलं-लसूण पेस्ट तयार करून ठेवावी. ऐनवेळी घाई गडबड होत नाही.
भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात. चिरल्यावर नाही.
जो पदार्थ करणार आहोत त्याची आधी पुर्वतयारी करून घ्यावी. नंतरच गँस पेटवून सुरवात करावी. म्हणजे त्या पदार्थाला आवश्यक एखादा पदार्थ नसेल तर पर्यायी सोय करता येते व पदार्थ नीट बनतो. तसेच गँसचीपण बचत होते.
तयार अन्नपदार्थ नेहमी व्यवस्थित झाकून ठेवावेत.
आपल्या गरजे इतकेच अन्न पदार्थ तयार करावेत. आजच्या काळात ऐनवेळी कोणीही कोणाकडे जात-येत नाही.
शक्यतो शिळे अन्न शिल्लक राहूच नये परंतु कांही कारणाने कधी शिल्लक राहीलेच तर लवकरात लवकर त्याचा कांही नविन पदार्थ करून घरातल्या सर्वानी वाटून खाऊन संपवावा. वाया घालवू नये.
कुठे वाचलेला, खाल्लेला अथवा आवडलेला एखादा नवीन पदार्थ करून पहायचा असेल तर, आधी त्याचा पुर्ण अभ्यास करावा. लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे याची एकदा खात्री करावी. एखादी वस्तू नसेल तर आधीच आणवून घ्यावी व नंतरच शांतचित्ताने प्रयोगाला सुरवात करावी. म्हणजे पदार्थ सहसा फसत नाही.
नवीन पदार्थ करताना सुरवातीला अगदी कमीत-कमी प्रमाणात साहित्य घेऊन लहान प्रमाणात पदार्थ बनवावा. चुकून बिघडलाच तर फार वाया जात नाही. आवडला तर आणखी बनवता येते.
स्वयंपाक घरात नेहमी एखादे पेन व कागद छोट्या पँडला लावून लटकवून ठेवावे. एखादा पदार्थ संपला तर लगेच लिहून ठेवावे. म्हणजे बाजारातून सामान आणताना सर्व वस्तू न विसरता घरी येतात व ऐनवेळची धावपळ वाचते.
स्वयंपाक घर आपल्या कुवतीनुसार सर्व आवश्यक त्या जुन्या व अत्याधुनिक साधनानी म्हणजे भांडी, चमचे, पँन, कढई, तवे, मिक्सर, ब्लेडर इत्यादि.. नी सुसज्ज ठेवावे व पदार्थ तयार करताना योग्यवेळी योग्य ती साधने आळस न करता वापरावित. पदार्थ अधिक रूचकर व लवकर होतो. उदा. शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी जुन्या पध्दतिने बिडाच्या खलबत्त्यात कुटली तर अधिक रूचकर लागते.. तेच धण्या -जिर्याची पावडर मिक्सरमधे चांगली बारीक होते.
सर्वात शेवटी महत्वाचे, स्वयंपाक करताना आनंदी वृत्तीने, हास्यमुखाने, मनापासून करावा. पदार्थ अधिक चवदार व चांगला होतो. आदळाआपट करत चिडचिड्या वृत्तीने कधीच करू नये. हा अन्न देवतेचा अपमान असतो. व असे अन्न घरातल्या खाणार्याच्या कधीच अंगी लागत नाही व समाधानही मिळत नाही. बरकत रहात नाही.
एकूणच फक्त पदार्थ करता येणे म्हणजे 'सुगरण' नव्हे तर त्या जोडीला स्वच्छता, नियोजन, बचत, शास्त्र अशा सर्व कला तिला अवगत असाव्यात तरच अशा सुगरणीला अन्नपुर्णा देविचा वरदहस्त लाभतो.
आपण जे काम करतो ते मनापासून व आनंदाने करावे. पुर्ण क्षमतेने करावे. स्वतालाही आनंद मिळतो व समोरच्यालाही मिळतो.

चाक....


चाक....


प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. Love Marriage च्या जमान्यात त्यांच Arranged Marriage होत. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले. प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत. घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज. भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा. आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेस होतं होत.
आज सकाळीहि खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला. दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले. आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार ऐखाद वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे प्रियाला माहित होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.
आज ४ तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार. पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट. दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे. त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही. नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी कॉउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेउन तशीच उभी होती. "अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर" "असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू?" आजीचं गोड हसून उत्तर, थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज कॉउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत "बावळट आहेस" आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. "इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाउ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू" म्हणत आजोबा केबिन कडे गेले. "आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाहीे" प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली " अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते" "मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला आवडत" "ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे" "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली. कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.
दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेउन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता, "किती प्रेम आहे ना आजींचा आजोबांवर" बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली"अग दोघाचं बोल, आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात, नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेउन फिरतात, खूप काळजी घेतात ते एकमेकांची"
प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला. समरने काल लवकर आला तेव्हा दोघासाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं. तिने समरला फोन लावला " काही खाल्लस का?" "नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का? "नाही, चल कामं होत राहतील काहीतरी खाऊन घे, उपाशी काम करत बसू नकोस, मी हि ब्रेक घेते" संद्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.
हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.
ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओलो टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला. समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यँत प्रिया खूप चिडली होती "नोकर नाही आहे मी इथे, नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही." रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफसला निघून गेली. कॉउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसहि नव्हता काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंगली. शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला. आत पाटील आजोबा बसले होते, "प्रिया पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर, मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे त्यामुळे you can sit here and help him with all the formalities" नायर साहेब निघून गेले.
" बोला आजोबा काय करायच आहे" "मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली" कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं "I am sorry" च्या वतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते " खूप काळजी घ्याची माझी ती, सगळं वेळच्या वेळी, मी सुरुवाती पासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली, तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होत, आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होत पण तिने कधीच ऐकलं नाही, पण एक १५ दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागत तसं जेवण शिकवलं, मी तिला चिडवलं देखील कि पाटलिणबाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार" आजोबानी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाहि रडू आवरलं नाही, formalities पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाच लक्ष फोनकडे गेल, समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता "सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I will try not to do it again, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिस ला जाऊ नकोस, I feel guilty, please don't do that again. I have been pampered, spoiled brat till date and I m trying to change that, please give me time to change myself, I promise I will change, I never have said this before but I always want you in my life, No one can understand my mood the way you do, Please" काहीवेळ प्रिया  फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं "आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो." "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते"
"sorry, I too loose my control every now and then, I will also try to work on it, you too please give me time for that, I too always want you to be their in my life, you are my entire support system and we both will work towards understanding each other".प्रिया  रिप्लाय सेंड केला....

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा