Pages

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार

पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार


पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक
एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. 
अचानक काही आठवलं म्हणून त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....
या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं 
आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं.
याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली 
आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली.
याच वर्षात माझ्या वडिलांच्या निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं
याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे! जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!
आणि शेवटी त्यांनी लिहिले ..…. 
"खरंच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!
इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. 
भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतीकडे पाहताच त्यांना काहितरी वेगळं असल्याचा अंदाज आला.
सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला
आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या.
थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता.
तो कागद त्यानी त्यांच्या पतीच्या कागदा शेजारी ठेवला. 
लेखक महाशयानी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली. 
त्यात लिहिले होते...
गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढून टाकले. 
आता मला कुठलाही त्रास नाही. 
मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!
याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.
आणि एक चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो, 
आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!
याच वर्षात माझे तिर्थरुप वडील वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न रहाता इहलोकीची यात्रा संपवून शांतपणे मार्गस्थ झाले ..!!
याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, 
जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला 
आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत जोमाने अभ्यासाला लागला....!!!
आभारी आहे देवा ...!!
किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तू मला ..!!"
बघा मित्रांनो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! 
नकारात्मक विचार बाजूला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!
आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.
आपण ज्या दृष्टीने त्याकडे पाहतो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच..!!!
त्या घटनेची वाईट बाजू न पहाता चांगली बाजू, सकारात्मक बाजू डोळ्यासमोर ठेवायला शिका.
जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपूर्वक विचार करा ...!! 
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!
Every Dark cloud has a silver lining …!!!
प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!!
शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे.
आपल्याकडं काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेऊन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!
दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!
शेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात.!!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं!
सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत 
कि गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा....!!

मित्रांनो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!


जीवनसाथी


जीवनसाथी


एकदा एक मित्र आमच्या घरी आला होता.                  चहा,नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या.
बोलता बोलता मी मधेच उठून उभा राहिलो.
मी प्लेट्स धुवून लगेच परत येतो.”
मी असं म्हणताच तो माझ्याकडे अशा काही विचित्र नजरेने पाहत होता जणू मी त्याला सांगितलंय की
मी रॉकेट बनवायला चाललोय.’
मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला.
मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस.मी नाही करत मदत. कारण माझ्या बायकोला त्याचं काही कौतुकच नसतं. आता हेच बघ ना ,मागच्या आठवड्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली....
तर तिने साधं छान ही म्हटलं नाही....”
मी किचनमधून परत आलो.
मी बायकोला ‘मदत करत नाही.खरं तर तिला मदतीची गरजच नसते. तिला हवा असतो ‘पार्टनर.आणि घरात ,समाजात मी तिचा पार्टनर आहे.
पण मी  काही घरतल्या कामात तिची मदत करत नाही.
घर स्वच्छ करण्यात मी तिला ‘मदत करत नाही ,
कारण मीही याच घरात राहतो आणि त्याची स्वच्छता माझीही गरज आहे.
स्वैपाकात मी तिला ‘मदत करत नाही,
कारण जेवण ही माझीही गरज आहे आणि म्हणून स्वैपाक करणं माझंही काम आहे.
जेवणानंतर मी ताटं धुतो ,
कारण ती ताटं मीही वापरत असतो.
मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही.
कारण ती माझीही मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे  एक बाप म्हणून ते माझंही काम आहे.
कपडे धुणे, वाळवणे, घड्या घालून ठेवणे या कामात मी तिला मदत करत नाही.
कारण ते कपडे माझे अन माझ्या मुलांचे असतात.
मी घरात तिला ‘मदत करत नाही,
कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे.

अन् मुद्दा राहिला तो तिने तुझं कौतुक करण्याचा तर आठवून बघ, तिने जेव्हा घर स्वच्छ केलं,कपडे धुतले, स्वैपाक केला, मुलांना संभाळलं तेव्हा तू तिला साधं ‘थँक्यू तर बोललास का ?
बोलायला हवं.
अगदी कोणत्याही मर्यादांचा बाऊ न करता बोलायला हवं.
मी बोलतो.
पण थोडं वेगळ्या स्टाईलने.
जसं, “थँक्यू डार्लिंग....!!
तुझी खरंच कमाल आहे!!”
तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित.
जणू एखादी नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय,
असे तुझे डोळे मोठ्ठे मोठ्ठे झालेत.

पण खरं  तर असं काहीही नाही,
आयुष्यात एकदाच फारशी पुसून तू एका मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण, खरं सांग तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का?

तुझ्यासाठी म्हणून सांगतो,
या कामांसाठी फार मेहनत अन संयम लागतो.
जो आपल्यात नसतो.
आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात. पण आपली आई,बायको जे काम करत असतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते.
कदाचित आपल्याला हेच शिकवलं जातं की हे काम तितकं मेहनतीचं नसतं.
साधं बोटही फिरवावं लागत नाही.
खरं तर हे काम केल्यावर समजतं.
जर तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत असशील तर तिच्याही कामाचं कौतुक कर. अगदी मनापासून.
तिला हात दे, तिच्या ‘पार्टनरसारखा.
एखाद्या पाहुण्यासारखा नको जो फक्त जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा केवळ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घरात येतो.
आपल्याला हे बदल आपल्या घरापासून सुरु करावे लागतील. आपण आपल्या मुलींना अन मुलांना ‘मैत्रीचं खरं मर्म शिकवायला हवं. तेव्हा ते एकमेकांचं कौतुक करतील अन त्याहून अधिक एकमेकांच्या कामाचा आदर करतील.





मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

मासा आणि हंस

आजची बोधकथा बोधकथा


मासा आणि हंस
एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.
तात्पर्य
मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

दहीहंडी

दहीहंडी 

                          मित्रांनो नुकताच दहीहंडीचा सण आपण अनुभवला. तरुणाईचा  जल्लोष, उत्साह बघायला मिळाला. मीडिया दिवसभर तेच दाखवत होती. मागणी तसा पुरवठा. मोठं मोठ्या राजकीय  नेत्यांनी दही हंडीचे आयोजन केले होते. त्यात सिने तारे, मालिका कलाकार बोलावण्यात आले होते. मोठं मोठ्या बक्षिसांचे आकडे टीव्ही वर सांगत होते. अनेक  नृत्यांगना बेभान होऊन  आपली कला सादर करीत होत्या. त्यामुळे गोविंदांना उत्साह वाटत होता.  डीजे च्या तालावर तरुणाई थिरकर होती. कित्येक दिवस केलेल्या प्रॅक्टिसची किमया आज जगाला दाखवायला सज्ज होते. मेहनत, सांघिक भावनेने केलेले प्रयत्न आज फळाला येत होते. मेहनतीचं चीज झाल्या सारखा वाटत होतं. 
                           त्याच वेळी टीव्ही वर बातम्यांच्या खाली लाईन ला बातमी वाचली. एका २०वर्षीय  गोविंदाचा मृत्यू , ८८ जखमी. त्याच क्षणी मला समोरच्या टीव्ही वरची दृश्य बघून भीती वाटू लागली. एकीकडे हा जल्लोष त्या वेळी त्या मृत गोविंदाच्या घरी काय अवस्था असेल या कल्पनेनेच अंगावर काटा आला. जखमी,  आयुष्यभर जायबंदी झालेल्यांच पुढे काय ?
                          खरंच तरुणाईची रग दाखवायला  हे सर्व आवश्यक आहे का ? कानठळ्या बसवणाऱ्या दुर्लक्ष करून केवळ सण अथवा  धार्मिक पण  सिद्ध होते का? आज राजकीय नेते कुठल्याही सणाचे  इव्हेंट करून आपली ओळख किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पैसे अशा इवेन्टवर  खर्च करतात. किती करतात त्याचा हिशोब नाहीच. पण त्यात  वापरली जातेय ती तरुणाई ! त्यांच्या जीवावर बेतणारी .
                           नक्की काय साध्य होतं ?  आयुष्यभर जायबंदी होणाऱ्यांचं नुकसान  काही हजारात मोजले  जाते. जीवानिशी जाणारा काही शाहिद होतं नसतो. त्यांच्या कुटुंबाचं काय? हे  प्रश्न जल्लोषात पडत नाहीत तर,  दुःखात पडतात.
                          आजही खेडे गावात  बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने  दहीकाला उत्सव साजरा केला जातो. आदल्या आदल्या दिवशी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी ला रात्रभर पारंपरिक नाच गाणी करून साजरा केला जातो. त्यामुळे समाजात एकोपा वाढतो. शाळांमध्ये खूप छान पद्धतीने  लहान मुले साजरा करतात. आता हाच बघा ना बोलका फोटो. खूप काही शिकवून जातो. सॅल्यूट त्या भारताला !


                       
       

आयुष्य म्हणजे काय


जरुर वाचा



आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.!
मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.!
तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका.
मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.

जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही.
या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या.
आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो नं.. "आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!

डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो, पण माथ्या आड गेलेला "जिवलग" परत कधीच दिसत नाही"


रविवार, २ सप्टेंबर, २०१८

कावळा आणि बैल


कावळा आणि बैल




बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो.
              तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन  आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता. जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली.
              मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते.

      पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,
          मरेपर्यत टिकतात..
      कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
          इतिहास घडवतात..
       
घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....
""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे "" 

कुणाच्या नशिबाला हसू नये
               नशिब कुणी विकत घेत नाही
      
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
           वाईट वेळ सांगून येत नाही.!

बुद्धी कितीही तल्लख असली तरी
          नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
 
 बिरबल बुद्धीवान होता तरीही तो          
             राजा होऊ शकला नाही.!

     समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.

"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामगील दुःख
रागवण्या मागील प्रेम
*आणि शांत रहाण्यामागील कारण."

कपडे नाही
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!

चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा
एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं.



आपल्या चिमुकल्यांसाठी


आपल्या चिमुकल्यांसाठी एवढी पोस्ट नक्की वाचायलाच हवी.



पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा - ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’
सगळे हात वर होतात.

असं विचारलं की - ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’
तरी सगळे हात वर.

मी आणखी एक प्रश्न विचारते -
इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’
बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही.

मग विचारावं की - ठीक आहे.
आता दुसरा प्रश्न विचारते -
'असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं, आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’
पुन्हा एकही हात वर होत नाही.

पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं.
रडू येतं. मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’

एकदा असं झालं की, पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला.
ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’

मला फार नवल वाटलं.
मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का?
आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’

ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले, 'ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’
...आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले.

आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’

पुन्हा मोठा हशा झाला.

क्वचित काही पालक भेटतात न मारणारे.
आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’

कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’

काही असं सांगतात की, ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’

मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’

पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं!’

असं आपण जेव्हा म्हणतो की, 'आम्हाला राग आवरत नाही.'

तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण?

एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर?
तर लगेच आपण राग आवरतो.

मग एखाद्या छोट्या मुलीला मी माइकपाशी बोलावते.
तिला विचारते, 'अगदी सोपा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’
ती 'हो' म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो.
मग मी तिला म्हणते, 'समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत-धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’

अर्धा मिनिट ती विचार करते आणि म्हणते, ''आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, 'दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.''

सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘छान उत्तर दिलंस.'

आता दुसरा सोपा प्रश्न.
'समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत-धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’

मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो.
ती म्हणते, ‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, 'मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’

पालक पुन्हा जोरदार हसतात.
मुलीला मी शाबासकी देते.
छोटं बक्षीस देते.

आपलं असं ठरलेलंच असतं की,
'चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठ्या माणसांना मात्र माफ.
जो आपल्याला उलट मारू शकतो, त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?'

मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं.
आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.'

'आज आईने मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.'

आज दोघं मला खूप रागावले.
मला असं वाटतंय की, 'जगात माझं कुणीच नाही.'

इतकं जर मुलांना वाईट वाटतं,
तर का मारायचं मुलांना?

'छडी लागे छम-छमवर अनेक पालकांचा विश्वास असतो.
'मारलं नाही तर मुलं बिघडतात' अशी त्यांच्या मनात भीती असते.

काही पालक तर हमखास असं सांगतात, 'मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो.'

मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.'

पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं?
कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत.
सर्वांच्या तब्बेती उत्तम आहेत.
पैशाचा काही प्रश्न नाही.
घरात काही भांडण नाही.
अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.'

आणि याऐवजी,
'समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पैशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे.
अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही.
त्याला मार तर बसतोच,
वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात.
हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो.
अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते.
आवडीच्या गोष्टी घडल्या तर, पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.

तेव्हा एक लक्षात ठेवायचं -
'मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत,
तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, 'याची जरूर आहे का?'

९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल -
'जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.'

तेव्हा प्रश्न संयमाचा आहे.
'मारणं' हा आपला शॉर्टकट असतो.
खरं तर,
कोण समजावून सांगत बसणार?
घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात.
वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे.
...आणि मुलं इतकी चिवट असतात की, ती आपला अंत पाहतात.
खरंच आहे. तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत.
तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.

मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल.
रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा.
त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा.
आणि त्याला हे सांगा की, 'आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, 'मला अमूक पाहिजे म्हणून' आणि 'रडायला लागलास' ते मला आवडलं नाही.
किती खेळणी आहेत तुझ्याकडे !
तरी हट्ट करायचा का?
मूल पण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते.
तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी.
कधी नाही मिळालं तर हट्ट करू नये.
तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला/तिला पटवून द्या.
हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं.
आई उगाचच ‘नाही म्हणत नाही.
त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.

'पालकत्वाची सत्ता' ही न वापरण्यासाठी असते.
ती चांगल्यासाठी जरूर वापरावी.
...पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये.

पटतंय ना?

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा