Pages

बुधवार, १० एप्रिल, २०१९

"मी माणूस घडवतोय."


एका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते.
काही शास्त्रचर्चा सुरू होती.
एक शिष्य आत आला. दार लावलं. पादत्राणं काढून ठेवली. गुरूंच्या समोर येऊन बसला.
गुरू थोडा वेळ शांत राहिले. मग अगदी मृदू स्वरात म्हणाले, "बेटा जा, दाराची आणि जोड्यांची माफी मागून ये."

शिष्य उठला, दारापाशी गेला, माफी मागितली, जोड्यांचीही माफी मागितली.

पाहुणे अचंबित झाले. म्हणाले, हा काय प्रकार? दाराची आणि जोड्यांची माफी?

गुरू म्हणाले, तो आला तेव्हा घुश्शात होता, त्याने दार जोराने आपटलं आणि जोडे रागाने भिरकावले होते.

पाहुणे म्हणाले, पण म्हणून निर्जीव वस्तूंची माफी मागायची?

गुरू म्हणाले, निर्जीव वस्तूंवर राग काढता येतो, तर त्यांची माफी का नाही मागायची?

पाहुणे म्हणाले, पण, याच्या रागाचा किंवा माफीचा दरवाजावर किंवा जोड्यांवर काय परिणाम होणार?

गुरू म्हणाले, पण, मी कुठे दरवाजा किंवा जोडे घडवतोय..........

"मी माणूस घडवतोय."

स्त्रिच सौंदर्य




सौ. सुधा मुर्ति म्हणतात .........

बऱ्याच स्त्रियांना शारिरीक
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,
मी समाजात, वावरत असतांना
माझ्या निरीक्षणात येतो...

पण, खर सांगू मैत्रिणींनो...
पुरूषांना कांय आवडेल,
याचा विचार करून स्वतःला
घडवू नका...

पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य
तोलणं, म्हणजे स्वतः मधील
स्त्रीत्वाचं अधःपतन करवून
घेणं आहे...

सकाळी उठून सडा-संमार्जन
झाल्यावर स्वतःच्या हातानं
काढलेली रेशीमरेषांची रेखीव
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...

स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ 
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!

तुम्ही शिक्षिका असाल, तर
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे
लिहिलेल्या अक्षरात असेल.
विषयाचं आकलन झाल्यावर
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे,
ही तुमचीच सुंदरता आहे...

सौंदर्य कपड्यात नाही,
कामात आहे....

सौंदर्य नटण्यात नाही,
विचारांमधे आहे...

सौंदर्य भपक्यात नाही,
साधेपणांत आहे...

सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे...!!

आपण करत असलेलं
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच
सादरीकरण असतं...!!

आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली
पाहीजे...

प्रेमानं बोलणं
म्हणजे सुंदरता...!!

आपलं मत योग्य रीतीनं
व्यक्त करता येणं
म्हणजे सुंदरता...!!

नको असलेल्या गोष्टीला
ठाम नकार देण्याची हिंमत
म्हणजे सुंदरता...!!

दुसर्‍याला समजावून घेणं
म्हणजे सुंदरता...!!

आपल्या वर्तनातून, विचारातून
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.

हाती आलेला प्रत्येक क्षण
रसरशीतपणे जगण्यांत
खरी सुंदरता आहे...!!

आपण करीत असलेल्या
कामात कौशल्य प्राप्त झालं,
की आपोआपच आत्मविश्वास
वाढतो, आत्मसन्मानाची
जाणीव येते...

अशी आत्मविश्वासानं
जगणारी स्त्री आपोआप
सुंदर होते, हा माझा 
स्वानुभव आहे...

इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर
निर्णयक्षमतेत होतं,...

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या
ठोशात आहे...

बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या
असामान्य प्रतिभेत होतं...

लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...

वेळ प्रसंगी या सर्वजणींची
आठवणच आपलं जगणं
सुंदर करायला मदत करेल...

आपण जशा जन्माला आलो
आहोत, तशा सुंदरच आहोत,
ही खूणगाठ मनाशी बांधून
टाकली, की सौंदर्याकरीता
दुसर्‍या कुणाच्या पावतीची
गरज पडत नाही आणि 
अवघं विश्व सुंदर भासतं...!!!

वाऱ्याच खरं सामर्थ्य...




पतंग जेंव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेंव्हा त्याचं सगळं श्रेय पतंगाची दोर
ज्याच्या हातात आहे त्यालाच जातं...
पतंग उडवणाऱ्याला पण ते श्रेय ढगात नेऊन पोहोचवत... त्यालापण खरतर तेच हवं
असतं...

पण त्या पतंगाला खरी भरारी देणारा तो वारा... त्याचं काय...!!!
तो यथेच्छ दुर्लक्षिला जातो... कारण तो वारा कुठलाही जाब विचारत नाही की
कुठलीही बढाई मारत नाही...
तो अगदी मुकाट्याने आपलं काम करतो... तो पतंगाला तर आकाशात उंच भरारी घेऊन
देतोच पण पतंग उडवणाऱ्याला सुद्धा पतंग 'आपल्या' कौशल्या मुळे उडतोय हा भाबडा
भास ही देऊन जातो... तेच त्या वाऱ्याच खरं सामर्थ्य...

आयुष्यं पण तसं काही वेगळं नाही... इथे काही लोकं अशी भेटतात जी तुमच्या
सफलतेत फक्त दोरीला झटके मारायचं काम करतात, अन तुम्हाला सफलतेच्या शिखरावर
पोहोचवण्याच संपूर्ण श्रेय ते घेऊन जातात... अगदी काहीच न करता सुद्धा... कारण
त्या गगनभरारी मागे खरं कर्म असतं वाऱ्याएवढा अर्पनभाव असणाऱ्या काही
लोकांचं.. ही लोकं शांतपणे आपलं काम करतात... तुमचं सुखं कशात आहे हे ते
ओळखतात, अन मग तुमच्या नकळत, स्वतःवर दुखं ओढवूनही, ते तुम्हाला तुमची ती
गगनभरारी घ्यायला मदत करतात... पण त्या वाऱ्या सारखीच ही मंडळी सुद्धा यथेच्छ
दुर्लक्षिली जातात... कारण ती जाब मागत नाहीत... त्यांना श्रेय नको असतं...
त्यांना हवी असते तुमची ख़ुशी... त्यातच ते आनंद मानतात... पण अश्या लोकांना
ओळखण्यातच आपण बहुतेक वेळा चूक करतो...

"फाइंडिंग सेल्फ"


 "फाइंडिंग सेल्फ" 


पूर्वी सर्कस मध्ये एका गोलात एक माणूस फटफटी चालवून दाखवायचा...कधी कधी दोन असायची माणसे  ..आपले  निरनिराळे खेळ प्राण्यांचे  आणि विदूषकाचे पाहून झाले कि एक गंभीर वातावरण तयार केलं जायचं...आणि अंधार केला जायचा....आणि सूचना यायच्या कि जीव मुठीत धरून मी ते पाहायचे....गोलात जाताना तो माणूस आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना बाय  वगैरे करायचा  आणि थोडं अधिक वाईट वाटायचं..सं..एक माणूस  राजीखुशीने जातोय ते धाडस करायला म्हणून...तरीही पुढची काही मिनिटे श्वास रोखून आपण ते पाहायचो....मला तो अंधार आणि फटफटीचा  कर्कश्य आवाज आणि ते कर्तब आज लाईफ लेसन शिकताना.आठवते ...

 निरनिराळ्या  टप्प्यांवर सगे सोयरे...समाज यांच्याशी आपल्या समजुतीची फारकत होतंच असते...कधी घरी दारी ठीक असतं तर कामाच्या ठिकाणी वातावरण बिघडतं....कधी कामाने समाधान मिळतं तर घरी काही निखळतं...कधी सगळं  सुरळीत असताना मोठं संकट जसं कि घरफोडी...जवळच्या नातेवाईकाचा अपमृत्यु ..अशा अनेक घटनांनी जगण्याची सर्कस गंभीर वळण घेते...
आणि मन त्या मृत्यू गोलातल्या मनासारखे गरगर फिरू लागते ...त्या गोलात थांबण्याची सोय नाही कारण वेग कमी झाला कि कोलमडते तो  स्वार ... आणि एक आक्रन्दन सुरु होतं आतल्या आत....रोजच्या आयुष्यात मुद्दाम  बसून सांगू असे कुणी जुळलेले सूर असतीलच असं नसतं....जगरहाटी सांत्वन करून बाजूला झालेली असते...
आता त्या मोट्ठ्या गोलात फटफटीवर बसलेल्या आपल्या  गरगर  फिरणाऱ्या मनाला धरून आणण्याचे काम आपल्याकडे लागतं...
आणि हे दिसून येत नाही ...तेव्हाच "फाइंडिंग सेल्फ" चा धडा गिरवायला सुरवात करावी लागते...
आणि  सापडलेल्या आपल्या  मनाला एका नव्या पॅराशूट ला बांधायला  लागतं... पॅराशूट  अवकाशात हवेशी संधान बांधत बांधत दिशेच्या तत्वावर चालतं.... दिशा आणि वेग हवेवर सोडावा लागतो...आणि मग एका तालावर ते हेलकावे घेऊ लागतं..मनाच्या या अवस्थेतच झालेल्या "लॉस"..चं निरीक्षण शक्यं   असतं....आणि मग तारतम्याने ...हळू हळू फटफटी शांत होते आणि पुन्हा एकदा "फाईन लँडिंग" साठी मन  सज्ज होतं.... पॅराशूट मधेही  भीती असतेच कि ते कशात अजून गुरफटलं तर मग अंतच....तरीही मृत्युगोलात म्हणजे एका साच्यातच त्याला फिरवत राहण्यापेक्षा  एक निराळा आसरा म्हणून मोकळ्या हवेत सोडायची तयारी दाखवावीच लागते ..कारण तरच थोड्या अंतरावरच्या  संधी...मार्ग मनाला दिसतात आणि होप्स संपण्याच्या  भीतीपासून लांब जात पुन्हा जगण्याकडे कल येत जातो....
जगण्याच्या सर्कशीत आपले मन हे मृत्युगोलात फिरत ठेवायचे कि पॅराशूट ला बांधून  निराळे आयाम शोधायचे ..हा प्रश्न आयुष्य बऱ्याचदा विचारतच राहते ..चॉईस  आपण करायचाय दोस्त.... फाइंडिंग  सेल्फ..... इज  अ बेटर चॉईस.........#संगीताशेंबेकर

'मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत'


संदीप  वासलेकर यांचा एक लेख....

इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफी शॉपमध्ये मी मित्रांसोबत बसले होते. आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली. दोन कॉफी....अन् एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीसाठी !
माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे  पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला, एक कॉफी ऑफ कप.

         आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.

         काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की, वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.

        त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.

         हे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला. या शहरातील गरिबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे  होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही असे पद्धधतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

        नकळत आमच्या डोळे पाणवले. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती तो खिशात पैसे नसताना आला होता.  त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.

           'मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत'

सुंदर....वाचा आनंदे !



सुंदर....वाचा आनंदे  !

इलॅस्टिकचा जमाना आल्यापासून लहानग्या पोरींचा वास्ता गाठींशी फारसा पडत नाही. आमच्या लहानपणी आमच्या अत्यंत घाईच्या वेळा गाठींशी झुंजण्यात, त्या सोडवण्यात किंवा तोडण्यात जायच्या. त्यामुळे गाठींशी कसं वागायचं याचं प्रशिक्षण आम्हाला नकळतपणे लहानपणीच मिळायचं. मला गाठींचा ‘फोबिया आहे. कुठेही जातांना, मला शिंक किंवा खोकला येईल आणि माझ्या कपड्यांत असलेली एखादी अत्यंत जबाबदार गाठ तटकन तुटेल आणि अनवस्था प्रसंग येईल अशी धास्ती मला सतत कुरतडत असते. त्यामुळे माझ्या पर्समधे कायम सर्व आकाराच्या सेफ्टीपिन्स आणि एक नाडी असते.

गाठी तरी कसकसल्या असतात. (आता आपण परकर, पायजमा, शलवार, वगैरेच्या जरा पलीकडे जाऊ.) ऋणानुबंधाच्या गाठी रेशमाच्या गाठी मनातल्या गाठी..!! प्रेमाच्या गाठी..!! आतली गाठ..!! नात्यांची गाठ.. मैत्रीची गाठ.. सुरगाठी-निरगाठी.. बाप रे..!! एका संकल्पनेची इतकी रूपं..?? आणि तरी ही सगळी ‘निर्गुण रूपं आहेत. सगुण गाठी आहेतच अजून. टायची गाठ, स्कार्फची गाठ, रिबीनची गाठ, गिफ्टपॅकची गाठ, बुटाच्या लेसची गाठ, यातही वेगवेगळ्या गाठी असतात. खेळाडू, सैनिक, विद्यार्थी आणि उच्च अधिकारी या सगळ्यांच्या बुटाच्या गाठी वेगळ्या असतात. किती गाठी भवताली..?? आजच हे आठवायला एक कारण झालंय. मी अनेकदा गानाडॉट कॉम  वर गाणी ऐकते. ही साईट लोड होतांना एकमेकीत गुंफलेल्या दोन पोकळ गाठी एकमेकींच्या जीवात फिरत राहतात. ते पाहून मला घुसमटल्यासारखं होतं. कधीतरी मी त्यात अडकेन असं वाटत राहतं.

माणसांच्या नात्यातल्या गाठींना ‘रेशीम गाठ म्हणतात. रेशीम कितीही नाजूक असलं तरी त्यावर गाठ घट्ट बसते. सुटता सुटत नाही. ती सोडवायची म्हणजे तोडावीच लागते. आणि महत्प्रयासाने सोडवली जरी, तरी रेशमावर तिचे वळ राहतात. हट्टाने ते वळ काढायचे म्हंटले तर उकळत्या पाण्यावर चाळणीत ते रेशीम ठेवावं लागतं. ते चटके बसून सरळ होतं, पण त्याची चमक जाते, रया जाते. हे सारे ‘मानवी नात्याच्या संदर्भातही होते. हट्टाने सोडवलेल्या गाठीचे रेशीम कधीच पूर्वीसारखे सरळ, चमकदार होत नाही. आणि मग वरवर पाहता नाती सुरु राहिली तरी ती आतून निर्जीव होतात. हे पाहिल्यावर वाटतं, कुणी बरं सर्वप्रथम या नात्यांना ‘रेशीम-गाठ म्हंटलं असेल? त्याला सलाम.

मी शक्यतो कुठलीही गाठ तोडत/कापत नाही. अगदी वाणसामानाच्या पिशव्यांच्या गाठी असल्या तरी त्या निगुतीने सोडवते. गाठी सोडवण्याच्या या सवयीमुळेच कदाचित, मी एकदा जोडलेली नाती कालपरत्वे बदलली तरी पूर्णपणे तुटत नाहीत. माझा गोतावळा वाढत राहतो. काहींच्या बाबतीत मनात वळ राहतात. ते काढण्याचा हट्ट न करता तसेच जपत राहते. हे बरं की वाईट मला माहीत नाही. पण गाठी मी तोडत नाही हे मात्र नक्की. मला गाठ तुटण्याची धास्तीच वाटते. त्यापेक्षा मुकाट्याने वळ जपत राहणे परवडले.

दुसरी अत्यंत महत्वाची गाठ म्हणजे जी आपण कुणाच्या तरी विरोधात मनाशी बांधतो. बघा, शब्द तोच. पण भावना एकदम वेगळी. रेशीम गाठीत जो एक दिलासा आहे, तसल्ली आहे, ती या गाठीत अजिबात नाही. ही अगदीच नकारात्मक गाठ आहे. अशा गाठीही अनेकजण वर्षानुवर्ष जपत असतात. कधी त्या गैरसमजातून आलेल्या असतात, कधी तात्कालिक रागाच्या भावनेतून. या गाठी ठसठसत्या असतात. त्यात तिरस्काराची दुर्गंधी असते. पण गाठी न तोडणे हा जसा एक स्वभाव असतो तसाच मनातल्या गाठी विनाकारण जपत राहणे हाही एक स्वभावविशेषच. अशी माणसं गाठीवर गाठी बांधत राहतात. या लोकांनी पायांनी मारलेल्या गाठी आपण हाताने सोडवू शकत नाही. हतबल व्हायला होतं मग.

हल्ली स्कार्फची अशी काही गाठ मारतात की ती खेचली तर सरळ फासच. भीती वाटते ती गाठ पाहून. टायची गाठ हेही एक कौशल्यच. तसं तर पक्की बसणारी कुठलीही गाठ कौशल्यानेच मारलेली असते.

याच गाठींचं एक मनोरम रूप मी काश्मीरमधे पाहिलंय. तिथले कलावंत गाठींचा एक टेबलक्लॉथ बनवतात. आपल्याला तो टेबल-स्प्रेड म्हणून वापरायचा नसेल तर त्या सगळ्या गाठी सोडवायच्या, त्यातून फूल उमलावं तसा गालिचा उमलतो. हेही गाठीचेच एक रूप. मनातल्या तिरस्काराच्या सगळ्या गाठी जर अशाच सहज सुटून, फुलासारख्या उमलू शकणाऱ्या सुरगाठी असत्या तर..??

एक सुंदर लेख सापडला.... म्हणून सगळ्यांसाठी पाठवला...🙏🙏

प्रवीण दवणे यांचा लेख

प्रवीण दवणे यांचा लेख


आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.
"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'
"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'
तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'
दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल; सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा