हजार सेल्फ्यांचे घडे
(कथा)
----
ती जेव्हा जन्माला
आली तेव्हाच तिच्या आईवडलांना तिची काळजी वाटू लागली होती.
या काळजीमागचं कारण
होतं, तिचं सौंदर्य. तिचे डोळे पाण्यासारखे नितळ आणि लकाकणारे होते. तिची त्वचा तुकतुकीत,
मुलायम आणि तेजवान होती. नाक सरळसोट होतं. जिवणी पातळ, पण ओठ जरासे जाड होते. जणू मद्याच्या
कुप्याच असाव्यात. रात्री ती गाढ झोपली की, तिच्या मंद श्वासोच्छ्वासातून गंध प्रसवायचा.
म्हणूनच तिचं नाव निशिगंधा असं ठेवण्यात आलं.
निशिगंधा वयात येऊ
लागल्यावर तर तिच्या सौंदर्याच्या बहराला उधाण आलं. तिच्या वक्षांना गोलाई आली, उभार
आला. तिचे काळेभोर चमकते मोकळे केस सारखे वार्याचवर उडू लागले. मांड्यांना भरदारपणा
येऊन त्या पुष्ट झाल्या. हिच्याशी संभोग केल्यावर निर्माण होणारा वंश किती सुंदर असेल,
असा विचार त्यांच्याही नकळत तरुणांच्या मनात येऊ लागला.
निशिगंधाच्या आईवडलांना
हे सगळं समजत होतं. तिने कुणाही ऐर्यासगैर्या्च्या प्रेमात पडून, पोट काढून आपल्याकडे
येऊ नये असं त्यांना वाटत होतं आणि या काळजीने त्यांच्या मनांना हजार घरं पडत होती.
निशिगंधा क्लासला, शाळेत जायला निघाली की, ते रोज देवाकडे प्रार्थना करायचे की आज तिला
प्रेमात पडण्यापासून वाचव. ती सुखरूप घरी येऊ दे.
०
मी सेल्फी –
00999. आत्ताच मी फ्रंट कॅमेर्यातून आलेय. आणि तुम्हाला सांगते, मी एवढी सुंदर आलेय,
एवढी सुंदर आलेय की फेसबुकवर मला २५६ लाइक्स त्यात ७६ लव्ह्ज आणि वॉव्ज मिळालेत. आणि
आत्ताच हाफ सेंचुरी झालीय कमेंट्सची!
चेहरा जरा वळवलेला.
केस मोकळे. काळ्या लिपस्टिकचा पाउट. नजर थेट कॅमेर्याआत. कॅमेर्याकचा कोन वरून आहे.
डोळ्यांखाली आयलायनर. आकाशी निळा पुलओव्हर. छातीची किंचित घळ दिसतेय. सोनेरी चेन चमकतेय.
पार्श्वभूमीवर खोल दरी आणि हिरवट रंग...
आणखी एक लव्ह – रियानचं.
काही लाइक्स – अंकुश, फरहान, निमा आणि देवीचं. २६० पूर्ण! हुर्रे!
०
एकदा पहाटे निशिगंधाच्या
आईवडलांना, एकाच वेळी, एकच स्वप्न पडलं. एक बिनचेहर्याचा दाढीवाला साधू त्यांना म्हणाला,
‘हे बघा, निशिगंधा नुसतीच सौंदर्यवती नाही, तर बुद्धिमानही आहे. त्यामुळे ती सहजासहजी
कोणाच्याही प्रेमात पडणार नाही. निश्चिंत रहा. एक गोष्ट मात्र नक्कीच चिंता करण्यासारखी
आहे.’
‘कोणती?’
‘तिचं स्वतःवर असलेलं प्रेम आणि त्याचा तिच्या बुद्धिमत्तेवर असलेला
अंमल. ती स्वतःच्या प्रेमात एवढी गुरफटलेली असते की आजूबाजूचं काही पाहूच शकत नाही.
त्यात त्या मोबाइल फोनमुळे आणखीन भरच पडली आहे. ती सारखी सेल्फ्या काढत बसते. त्या
काढताना तिला स्थल-कालाचं भान राहत नाही. त्यामुळे तिच्या नशीब आहे ते असं – आजपासून
ती जेव्हा कधी हजारावी सेल्फी काढेल, तेव्हा तिच्या स्वप्रेमाचा घडा भरेल. तत्क्षणी
त्या हजाराव्या सेल्फीत ती जख्ख म्हातारी दिसेल.’
०
मी कॅमेराबंद झाल्यावर
वाटलं की, चला आता या फोनच्या गॅलरीत आपण सुरक्षित राहणार, निदान काही काळ तरी. पण
मग समजलं की, माझ्याआधी सोळा सेल्फ्या आल्या आहेत. मी सतरावी. सतरा म्हणजे खतरा. चांगला
नसतो म्हणे हा नंबर. पण सेल्फ्यांना कसला आलाय चॉइस?
‘ही एक आली अजून,’ 00990 ओरडली. ‘या स्वागत आहे तुमचं मॅडम.’
मी गप्पच. मला नक्की
काय वाटत होतं हे माझं मलाच समजत नव्हतं. आपण काय बोललं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे
हेही कळत नव्हतं. मी जेव्हा सगळ्या सेल्फ्यांकडे नीट पाहिलं, तेव्हा आश्चर्यचकित झाले.
बर्याच जणी थोड्याफार प्रमाणात माझ्यासारख्याच दिसत होत्या. 00991मध्ये चेहरा नीट
दिसत नव्हता, तो अस्पष्ट होता. हात हलला असणार. तर 00992मध्ये पाउट नव्हता. हसणं जरा जास्तच होतं.
जवळपास सगळेच दात दिसत होते. से चीज! 00993 आणि 00995 अगदी माझ्यासारख्याच होत्या.
तिळ्या बहिणी! तर 00989 आणि 00990मधले भाव एवढे गंभीर होते, की आधीचे फोटो कुणाचेतरी
वेगळ्याचेच वाटावेत.
00993 माझ्या डोळ्यांत
डोळे घालून म्हणाली, ‘तूच दिसत्येस ती भाग्यवान सेल्फी!’
‘म्हणजे?’ मी विचारलं.
‘अगं, बघ की, तुझ्यानंतर आणखीन कुठे सेल्फ्या आल्यायेत? याचा अर्थ
तिचं समाधान झालेलं दिसतंय तुझ्यावर.’
‘ओह, येस.’ काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलले.
‘अभिनंदन!’ 00994 पुटपुटली. तिचा आवाज कापत होता. ती घाबरली होती.
‘आम्हाला किती मजा येत होती इथे. वाटलं ती तशीच येत राहील यानंतरही... पण आता...’
मी त्यांना आणखी काही
विचारणार, तोच कशाच्यातरी आत ओढल्यागत 00994 खेचली गेली आणि विरून गेली. 00996चंही
तसंच झालं. 00997चंही तसंच. आणि मग असंच होत गेलं. माझ्यासारख्याच दिसणार्या
00993 आणि 00995 यांनी निषेधाचा स्वर लावला. ‘आमच्यात काय वाईटे? आम्ही तर...’ आणि
शेवटी, मी सेल्फी 00999 एकटीच उरले. आणि माझ्यासोबत होते, फोनच्या गॅलरीतले इतर काही
फोटो.
०
त्या दिवसापासून निशिगंधाचे
आईवडील तिच्या हातात कमीत कमी मोबाइल फोन कसा राहील हे पाहू लागले. ते मुद्दामहून तिच्यापासून
फोन लपवून ठेवू लागले, किंवा फोन दिला तरी कॅमेर्याचं अॅप कुलूपबंद करून ठेवू लागले.
शाळेत असेपर्यंत त्यांच्या या सगळ्या युक्त्या चालून गेल्या. पण कॉलेजात गेल्यावर मात्र
निशिगंधाला आपले आईवडील मुद्दाम आपल्याला फोटो काढण्यापासून प्रतिबंध करत आहेत हे कळून
चुकलं. तिने मित्राच्या मदतीने कॅमेर्याचं कुलूप उघडण्यासाठीचा पासवर्ड शोधून काढला.
पण आपल्या आईवडलांचं मन दुखावलं जाऊ नये, म्हणून तिने त्यांना त्याबद्दल काहीच सांगितलं
नाही. ती घराबाहेर पडली, की कुलूप उघडत असे.
०
माझ्याबरोबरच्या सेल्फ्यांचं
जे झालं, ते पाहून मला वाईट वाटत होतं. मी थोडी उदास झाले होते. तेवढ्यात, मागच्या
वर्षी कॉलेजच्या साडी डेला काढलेल्या फोटोने माझं लक्ष वेधलं, ‘शेवटी तू राहिलीस तर
एकटीच. कॉन्ग्रॅट्स!’
मी आजूबाजूचे फोटो
पाहत ते कसे असतील, कसे बोलतील याचा अंदाज बांधत होते. मला मघाशी त्या सेल्फ्यांचं
काय झालं असावं, हा प्रश्न सारखा बोचत होता. मी नुसतंच थँक्स म्हणाले.
गावाला गेल्यावरचा
झोपाळ्यावर बसलेला फोटो कुत्सितपणे म्हणाला, ‘अभिनंदन. पण तरी आनंदाने उड्या नको मारूस
फार! इथे कधी कुणाचं काय होईल काहीही सांगता येत नाही, कळलं!’
‘मघाशी काय झालं असेल त्या सेल्फ्यांचं?’ मी मनातला प्रश्न विचारून
टाकला.
साडी डे फोटो मला म्हणाला,
‘ते एक मोठं कोडंच आहे. काहींच्या मते त्या खूप मोठ्या पेनड्राइव्ह किंवा हार्डडिस्कमध्ये
जातात. आणि मग तिथे पडून राहतात. मग कधीतरी कोणीतरी त्यांना पाहतं आणि मग तिथूनही त्यांना
जावं लागतं. मग त्यांचं काय होतं हे कोणालाच माहीत नाही. काहींच्या मते एक फ्लॅश लाइट
त्यांना खाऊन टाकतो. आणि मग त्या कायमच्या जातातच. काहींचं मत जरा वेगळंय, त्यांचं
म्हणणंय की फ्लॅशच्या झोताने खाल्ल्यानंतर पुन्हा वेगळ्या रूपात त्या इथे येतात. पुन्हा
जातात आणि पुन्हा येतात. आता या सगळ्यातलं खरं काय हे कोणालाच नाही ठाऊक.’
मी नुसतीच मान हलवली.
तोच आईवडलांसोबतचा फोटो बोलू लागला, ‘पण तुला कदाचित थोडं अधिक काळ राहता येऊ शकतं
इथे. तुझं नशीब चांगलं असेल तर...’
‘कसं काय?’
‘आता माझंच बघ. शक्यतो मला अजून काही काळ तरी डिलिट केलं जाणार
नाही. किंवा आठवण म्हणून ठेवून दिलं जाईल कुठेतरी.’
‘हं... पण माझं नशीब तुझ्यासारखं असेल असं वाटत तरी नाहीये.’
‘तुझंही असू शकतं. समजा, तू सोशल मीडियावर गेलीस, तर निदान थोडा
वेळ तरी तू अमर!’
फेसबुक अॅप उघडलं गेलं.
झोपाळ्यावरचा फोटो
म्हणाला, ‘भारीये. मोठ्ठ्या जगात चाललीयेस तू! ऑल द बेस्ट!’
०
मस्त पावसाळा होता.
पावसाच्या एकामागोमाग एक सरी येत होत्या. हवा ओलीगार झाली होती. निशिगंधाच्या कॉलेज
ग्रुपपैकी सगळ्यांनाच क्लासमध्ये जायचा भयंकर कंटाळा आला होता. अचानक त्यांनी जवळच्याच
गडावर जायचं ठरवलं. सगळ्यांनी आपापल्या स्कूटर काढल्या आणि वेगाने कूच केलं.
निशिगंधाने आपली स्कूटी
कॉलेजमध्येच ठेवली आणि ती मित्राच्या बाइकवर बसून निघाली. पावसाने ओले झालेले केस,
भिजून नितळ झालेला चेहरा, त्यामुळे अधिकच चमकणारे डोळे, अंगाला घट्ट बसलेले ओले कपडे...
स्वतःचं हे वेगळंच, ‘फ्रेश’ रूपडं पाहून निशिगंधा स्वतःच्या अजूनच प्रेमात पडली आणि गडावर
पोचायच्या आधीच तिने स्वतःचे फोटो काढणं सुरू केलं.
गडावर ढग उतरले होते.
पाऊस भुरभुरत होता. सगळीकडे हिरवंगार झाल्याने डोळे सुखावत होते. त्याने उद्दीपित झालेल्या
निशिगंधाचं सटासट फोटो काढणं सुरूच होतं. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढत होती.
कधी या झाडामागे, कधी त्या खडकावर, तर कधी आडवाटेला जाऊन. फोटो काढण्याच्या भरात तिच्याही
नकळत ती आपल्या ग्रुपपासून अलग झाली आणि कोणत्यातरी वेगळ्याच वाटेला लागली.
०
मी खेचली गेले, तशी
मी घाबरले. वाटलं, फ्लॅश लाइटच्या प्रकाशात आपणही विरून जाणार. पण तसं काहीच झालं नाही.
मला एका चौकटीत बसवलं गेलं. मग क्रॉप करण्यात आलं. ब्राइटनेस, कॉन्ट्रॅस्ट, सॅच्युरेशन
असं काय काय बदलण्यात आलं. ब्युटिफिकेशनने माझे डोळे थोडे मोठे झाले, तर गाल आणि चेहरा
गुळगुळीत झाला. हनुवटी जरा वर उचलली गेली. पाउट आणखीन मोठा झाला. मग माझ्यावर वेगवेगळी
फिल्टर्स चढवून बघितली गेली. कधी ब्लॅक अँड व्हाइट, कधी रेट्रो, कधी सेपिया. आणि मग
शेवटी पिवळट-नारिंगी सेपियाचं फिल्टर चढवून पांढरी क्रूकेड फ्रेम माझ्यावर डकवण्यात
आली. आणि सेव्ह केलं. आता माझं नाव थोडं बदललं. नवीन अवतार, नवीन नाव – 00999-EDX
.
शेवटी निशिगंधाच्या
४३५६ फ्रेंड्समोर मला ठेवण्यात आलं. पहिले काही क्षण, मी गोंधळले, बावचळले. पण मला
भारीही वाटत होतं. एक, दोन, तीन लाइक्स, मग लव्ह्ज, मग वॉव्ज. कमेंट्स.... काही मिनिटांत
मी फेमस झाले. ढिगाने लाइक्स, कमेंट्स येऊ लागल्या.
०
ती वाट वेगळीच होती.
तिथली झाडं देवदारांसारखी उंचच उंच होती. हवा दाट, अधिक ओली आणि गार होती. आणि हा गारवा
सुखद नव्हता, तर बोचरा होता. उजेड अंधूक, करडा होता. पार्श्वभूमीवर सारखे घारींचे चीत्कार
ऐकू येत होते.
काही क्षण निशिगंधाला
आपण भरकटलो आहोत असं वाटलं खरं, पण तेवढ्यात एका आवाजाने तिचं लक्ष वेधलं. ‘किती सुंदर
आहेस तू!’
निशिगंधाने इकडेतिकडे
पाहिलं, तिला कोणीच दिसलं नाही.
‘अगं इकडे बघ, तुझ्या हातात, तुझा मोबाइल. तुझ्या सौंदर्याच्या
जादूने मला वेड लागलंय. मी तुझ्या प्रेमात पडलोय. पार बुडालोय. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत
घालवायचंय. प्लीज, हो म्हण.’
‘काय? तुझ्यासोबत? एका फाल्तू मोबाइलसोबत. आपली लायकी ओळखून तरी
बोलायचंस! फोटो काढायचं काम कर... चल, फुट्...’ असं म्हणून तिने एक पाउट काढला आणि
मोबाइल फोन आपल्यासमोर धरला.
००
इथले फोटो कॅमेर्यातल्या
गॅलरीसारखे नाहीयेत. जरा आगाऊ आणि स्वतःला जास्तच शहाणे समजणारे आहेत. कोण जास्त चांगलं
दिसतं याची सारखी तुलना करत राहतात.
शॉर्ट्स घातलेला फोटो
मला म्हणाला, ‘मला तर पहिल्या तीस सेकंदात यापेक्षा दुप्पट लाइक्स मिळाले होते!’
हिमालयातल्या बर्फातला
फोटो म्हणाला, ‘मला एक कळत नाही, हिच्यात आहे तरी काय एवढं? साधाच तर फोटो आहे. तरी
लोक वेड्यासारखे करतायत. माझ्यात काहीतरी तरी आहे, पण हे असे तर लाख असतात हल्ली.’
तोच पंजाबी ड्रेसमधला
फोटो म्हणाला, ‘अगं असं काय करतेस, पाउट किती मोठाय बघ! आवडणारच ना मग! आम्ही मात्र
कायमच किरकोळीत लाइक्स मिळवणार!’
‘बरोब्बर,’ रियानबरोबरची सेल्फी, सूर्यास्ताचा फोटो, मित्रमैत्रिणींबरोबरचा
ग्रुप फोटो, बहिणीच्या लग्नात काढलेल्या मेंदीचा फोटो, थर्टी फर्स्टच्या पार्टीचा फोटो
अशा सगळ्यांनीच एका सुरात म्हटलं.
माझ्यासारखेच असलेले
हे फोटो मला ज्या प्रकारे टोमणे मारत होते, माझ्याशी बोलत होते, त्याने वाईट वाटत होतं.
तर दुसरीकडे, फ्रेंड्सनी मात्र माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यामुळे मी हुरळून
गेले. मी विचार करू लागले की, आता पर्मनंट प्रोफाइल फोटो म्हणून आपली निवड नक्की होणार!
आपणच तर सर्वांत बेस्ट फोटो आहोत. येस! मग आपल्याला या सगळ्या फोटोंपुढे तोरा मिरवता
येईल. मग आपण व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटमध्येही जाऊ. आणि मग खरोखरच
अमर होऊ! कदाचित आपण इतके आवडू की आपली प्रिंट काढली जाईल, त्याला फ्रेम लावली जाईल
आणि बेडशेजारच्या टेबलावर ठेवलं जाईल... ‘वॉव!’ मी स्वतःलाच म्हणाले, ‘तू अशी नुसतीच
येऊन निघून जायला जन्मली नाहीयेस. तू वेगळी आहेस सगळ्यांपेक्षा, म्हणून तर आज इथे आहेस.
कमॉन!’
०
भटकता भटकता निशिगंधा
उंचच उंच झाडांचा भाग मागे टाकून एका पठारावर आली. तिथे लहानसहान झुडपं होती आणि एका
झुडपाच्या शेजारी एक मोठ्ठा काळा खडक होता. निशिगंधाला तो पाहताक्षणीच आवडला. ‘व्वा,
ऑसम. त्या दगडावर उभं राहून सेल्फी हवाच.’
ती धावत त्या खडकाकडे
गेली. त्यावर बसून तिने फोटो काढले. त्यांचा क्लिक-क्लिक असा आवाज होत होता आणि तो
आवाज तिच्या कानांना सुखावत होता.
अचानक, इतका वेळ कुंद,
पावसाळी असलेलं वातावरण बदललं. बोचरं ऊन पडलं. तापदायक ऊन. आणि त्याच्या धगीने खडकामागे
असलेला धुक्याचा दाट पडदा हां-हां म्हणता विरून गेला. खाली खोल दरी दिसू लागली. तो
खडक दरीच्या अगदी कडेवर होता. दरीत गच्च अरण्य परसलेलं होतं.
‘वॉव,’ असं म्हणून निशिगंधा खडकावर उभी राहिली. तिने एक सेल्फी
घेतला, मात्र ती प्रतिमा पाहून तिचा चेहरा आक्रसला, डोळे विस्फारले आणि ती काही क्षण
जागच्या जागी थिजून गेली. तिच्या तोंडून ऊं एवढाच एक हुंकार निघाला.
०
‘हाय...’ माझी तंद्री भंगली. पाहिलं, तर नवी सेल्फी आली होती
– 01000.
आणि मी त्या सेल्फीकडे
पाहतच राहिले. मला जे दिसत होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. असं कसं घडलं असावं?
01000ने विचारलं,
‘काय झालं? पुढे काय?’
मी गप्पच.
०
ती निशिगंधाची हजारावी
सेल्फी होती आणि त्यात ती जख्ख म्हातारी झाली होती. तिचे केस झडून गेले होते, टक्कल
पडलं होतं. डोळे म्लान, पूने भरले होते. चेहर्यावर रबरट सुरकुत्यांचा चिकट जाड थर
जमा झाला होता. नाकातून पिवळा शेंबूड गळत होता, आणि तो कोरड्या, फाटलेल्या ओठांतून
येत असलेल्या रक्तात मिसळला होता.
हा धक्का महाप्रचंड
होता. तिथल्या तिथे वीस वर्षांचा निशिगंधाला हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा तोल
जाऊन ती सरळ दरीत पडली.
०
मी कशीबशी तिला म्हणाले,
‘मला माहीत नाही... पण तू अशी... कशी...? काहीतरी
गडबड...’ मला काय होत होतं हे समजत नव्हतं.
01000 माझ्याकडे एकटक
पाहू लागली आणि मी तिच्याकडे. काही मिनिटांच्या फरकाने जन्मलेल्या आमच्यात जमीनअस्मानाचा
फरक होता. त्या काही मिनिटांत शंभर वर्षं झरकन सरून गेली असावीत असं वाटत होतं. तोच
फ्लॅश लाइट चमकला...
०
अंतःप्रेरणेने निशिगंधाच्या
आईवडलांना जे घडलं होतं, ते समजून चुकलं. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि डोळे
मिटले. पुन्हा तो बिनचेहर्याचा दाढीवाला साधू त्यांना दिसू लागला. ते म्हणाले, ‘तुमची
भविष्यवाणी खरी ठरली. आमची मुलगी तर गेली, पण तिच्या कहाणीचा शेवट असा व्हायला नको.
नाहीतर, सगळ्या मनुष्यजातीवर विपरित परिणाम होईल. प्लीज, या कहाणीचा शेवट बदला. काहीतरी
करा.’
त्यांच्या कळकळीच्या
विनंतीमुळे साधूचं मन द्रवलं. तो म्हणाला, ‘ठीक आहे. मी उःशाप देतो.’
त्यानंतर निशिगंधा
ज्या ठिकाणी मरून पडली होती, तिथे पांढर्या रंगाची, मंद सुगंध असणारी फुलं उगवून आली.
लोक त्यालाही ‘निशिगंधा’ म्हणू लागले. ती फुलंही निशिगंधासारखीच सुंदर होती. पण त्या
सौंदर्याखाली दबून राहिलेली खरी कहाणी मात्र लोक विसरून गेले, सेल्फ्यांचे घडे भरत राहिले, आणि कड्यावरून खाली
पडून, समुद्रात-धरणात बुडून लोक मरत राहिले… मरत राहतील!
----
(पूर्वप्रकाशित - मुराळी
नियतकालिक)
---
- प्रणव सखदेव