Pages

रविवार, ३ मार्च, २०१९

गावपण हरवायला नको होतं


गावपण हरवायला नको होतं

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.

त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.
 चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.
कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.
 तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.
 पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.
रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.
 आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.
 दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.


परिस


परिस


मी शाळेत असताना शिक्षकांनी 'परिस 'या शब्दाचा अर्थ सांगितला होता.जर का परिस नावाचा दगड लोखंडाला
लावला तर लोखंडाचे सोने होते.....
मला जाम मजा वाटली.....खरच,परिस मिळायलाच पाहिजे.आपल्याकडे किती सोने होईल???? आपण किती श्रीमंत होऊ????
या कल्पनेने मी जाम खूष झाले. घरी येऊन मातोश्रींना विचारले" आई परिस कसा असतो गं????""
" आज हे काय नवीन????आई हसली.
मी ठरवले आपण परिस शोधायचा.....रस्त्यावर कुठेही वेगवेगळ्या आकाराचे,रंगाचे दगड मी शोधू लागले.माझ्याकडे बरेच दगड जमा झाले. मी ते लोखंडाला लावून पाहिले.लोखंडाचे सोने झाले नाही. मातोश्री घर आवरताना हे सगळे दगड फेकून देत असत.
हळूहळू मोठी झाले शिकले.नोकरी लागली.तरीही मनात
परिस होताच.जसे वय वाढत जाते तसे आपण अनुभवाने
शहाणे होतो..
आता समजून चुकले की परिस........म्हणजेच तुंम्ही चांगले शिका कष्ट करा.....गरजूंना मदत करा.चांगल्या
मार्गाने जा.याची फळे चांगलीच मिळतात.
थोडक्यात काय तर चांगले कर्म करणे हाच परिस
आणि त्याचे चांगले फळ मिळणे म्हणजेच सोने होणे
हा परिस आपल्या प्रत्येक जणांकडे आहे.



हेअर स्टाईल


हेअर स्टाईल 


सुट्टीचा दिवस होता..सोफ्यावर बसून छानसं कुठचंसं मॅगझीन वाचत होतो..इतक्यात सौंचं आगमन झालं...माझ्यासमोर येऊन उभी राहत विचारलं, " कशी दिसत्ये ? "...मी तिला वर पासून खालपर्यंत बघितलं..मला तसा काही फरक जाणवला नाही..पण तसं बोलायची सोय नसते..कारण बायको ज्याअर्थी असं विचारते, त्याअर्थी ती नक्की काहीतरी करामत करून आलेली असते..हां आता ती करामत कुठली आहे ते ओळखण्यासाठी मात्र, ईश्वरी देणगीच लागते..मी आपलं उगीच काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं, "वा..मस्तच दिसत्येस..फेशियल करून आल्येस का ?" ..." नाही रे...हेअर-कट करून आल्ये..बघ.."..म्हणत मागे वळली..आता मला अगदी खरं सांगायचं तर त्यातलं (घंटा) काही कळत नाही..मी आपलं उगीच 'वा..मस्तच "म्हणायचं काम मात्र इमानदारीत करतो.. मला वाटलं मी 'वा ' म्हंटलं म्हणजे संपला विषय..पण नाही...बायकोचा लगेच पुढला प्रश्न, " हा 'कट' मला चांगला दिसतो का रे ?..हा ना V कट आहे..." आता ही V कट म्हणजे काय भानगड असते बुवा ? (अर्थात मनात म्हटलं ).."हो हो ..एकदम मस्तच दिसतो हा कट तुला."- मी. "मला वाटतं, मला तो मागच्या वेळेस केला होता ना,तसा U कट च चांगला दिसतो..आज उगीच हा V कट केला.." -बायको..नियती माझ्या विरुद्ध हा कुठला 'कट' रचत होती हेच मला कळेना..आता तो 'कट' V होता कि U  होता हे मला कसं कळणार ?माझी उभी हयात, सलून मध्ये जाऊन फक्त " मिडीयम काप" सांगण्यात गेली...मला ते V किंवा U समजावं अशी अपेक्षा तरी का करावी म्हणतो मी..पण 'नवरा' हा एक असा प्राणी असतो, ज्याला पूर्ण प्रामाणिक राहून चालतच नाही..त्याला काहीही ढिम्म कळलं नाही तरी सगळं काही कळल्याचा आव आणावाच लागतो.."आज फार छान दिसत्येस हा " असं २-४ दिवशी म्हणावंच लागतं..तरच संसार सुखाचा होतो..असो.. पुढे अजून काही दिवसांनी मी केस कापून आलो..बायकोची फिरकी घ्यावी म्हणून तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो..तिच्याच स्टाईल मध्ये तिला विचारलं "कसा दिसतोय ?"....आता बायको सुद्धा थोडं खोटं बोलली तर नाही का चालणार ? पण नाही..आमची बायको भयंकरच प्रामाणिक..माझ्या तोंडावर हसत मला म्हणते, "एक नंबरचा चम्या दिसतोयस ".. एक अक्षरही न बोलता मी अंघोळीला निघून गेलो..आतमध्ये सुद्धा बायको बाहेर हसत असल्याचा आवाज येतच होता..
 
व.पु.काळे

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

कारण घाम गळत नाही


कारण घाम गळत नाही
         लहानपणी शाळेत जाण्यासाठी अनवाणी चार पाच किलोमिटर डोंगर दऱ्यातून, काटयाकुटयातून पाऊलवाटेन जाव लागे. घाम गळत होता. खिशातल्या मळकट रुमालाने पुसला जायचा. रुमालाचा रंग ही बहुधा दाट असायचा. कारण मळला हे लवकर कळू नये म्हणून.
        आता मी ऑफीसला जातो. बस मधून, लोकल मधून, कार मधून किंवा स्वत:च्या वाहनातून. आता घाम गळत नाही. कपाळावरचा दोन थेंब घाम लगेच पुसला जातो. कपाळावरच्या घामाचे दोन थेंब माणसाला गबाळा ठरवतात. खिशातल्या रुमालाचा रंग पांढरा आहे. रोज धूतला जातो.
        शाळेत जाताना शाळेचा ड्रेस एकच असल्याने सांभाळून ठेवला जायचा. पितळेच्या तांब्यात निखारे भरुन तो शर्टवर फिरवला की झाली कडक इस्त्री.
        आज मी ऑफीसला जाताना ऋतु नुसार कपडे वापरतो. उन्हाळयात पांढरे कपडे, पावसाळयात दाट रंगाचे कपडे. कपडयांना इस्त्री लाँडरीत होते. कारण मी घाम गाळत नाही.
        चालून चालून पायाची कातडी इतकी जाड व्हायची की कोणत्याही काटयाला भीक घालत नव्हती. आज मी वेगवेगळया चप्पल घालतो. टॉयलेटसाठी वेगळी, थोडया अंतरावर जाण्यासाठी निराळी, ऑफीससाठी निराळी आणि हो खास कार्यक्रमासाठी निराळी.
       पोटच्या खळगीसाठी घाम गाळून रात्री निवांत झोप येत होती. आज पोटाच्या घेरासाठी व्यायामशाळेत पैसे देऊन घाम गाळावा लागतो. त्याचाही फारसा उपयोग होत नाही. मग विविध औषधे, गोळया, डायटींग करावा लागतो. पुर्वी पैसा कमी असल्याने चैनीचे पदार्थ मिळत नसत. जीभेचे चोचले पुरवायला नव्हे तर पोट भरायला अन्न्‍ खात होतो. आज चव बघुन जेवतो. ताव मारतो.
घाम गाळल्यामूळे सडकून भूक लागायची. भूकेला चव नसायची. मीठ भाकरी पर्णब्रम्ह होते. भरल्या पोटी शांत झोप लागायची.
आज ऑफीसमधल्या चकचकीत वातावरणात घाम गळत नाही. एसीत तर मूळीच नाही. रात्री शांत झोप लागत नाही. नुसता डोकयाला ताप. पोटाचा घेर मात्र सुटला आणि डोक्याचा ताण नव्हे टेन्शन मात्र वाढले. हो. हल्ली मी मराठी शब्दापेक्षा इंग्लिश शब्दृ नेमका चपखल बसतो. टेन्श्न म्हटले की जरा जास्तच भावना पोहोचतात. मग काय टेन्शनलाही उपाय आहेतच की, गुत्ता, बार.
छे छे खरच मी काय कमावल? की गमावल.
होय ! मी घाम गमावला.

                                        एस.एस. मणवे

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

मानव


मानव


            विस्तवाचा शोध लागला.  कांतडीं पाघरूं लागले.  त्याचबरोबर प्रकट वाणीहि जन्मली.  बोलायला लागण्यापूर्वी ते आधीं गाऊं लागलें असावेत.  ज्या वेळेस त्यांना अस्वस्थ व असुखी वाटत असे त्या वेळेसे ते सारे एकदम दु:खानें किंचाळत ; जेव्हां एकादी सुंदरशी शिकार त्यांना मिळे, किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश पडे, तेव्हां ते आनंदानें आवाज करीत.  हळूहळू या सर्वांतून अतुटक असें 'क' वर्गांतील गान निर्माण झालें.  त्यांच्यांतील जे अधिक प्रतिभावान् व प्रगतिशील होते ते आपल्या मनांतील नवीनच उगवलेले विचार अधिक स्पष्टतेनें प्रकट करूं लागले.  आपल्या आवाजांत भर घालून, त्याला कांहीं जोडून, ते विचार प्रकट करूं पहात.  अशा रीतीनें मानवी भाषेंतील पहिली अक्षरें जन्मास आलीं.

            वाणीमुळें ज्याप्रमाणें मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपासून पृथक् झाला, त्याचप्रमाणें हत्यारांच्या व नानाविध यंत्राच्या शोधामुळेंहि हा गुहेंतील मानवप्राणीं मानवेतर प्राण्यांपासून निराळा झाला.  आणि पहिलें यंत्र म्हणजे आपला हात.  आपल्या या हातानें फेंकतां येतें हा अगदीं आरंभींचा अति महत्त्वाचा शोध.  हातानें जवळच नव्हे, तर लांब अंतरावरसुध्दां दगड मारतां येतो हा शोध ज्या आदि काळांतील एडिसननें लाविला त्याचें मानवजातीवर फार ॠण आहे.  तो अज्ञात असा एडिसन अत्यन्त बुध्दिमान् असला पाहिजे.  संकृति व सुधारणा त्याची अत्यंत ॠणी आहे.  मारण्याची जी सुंदर कला तींत त्या वेळेपासून मनुष्य इतर प्राण्यांच्या सदैव पुढें राहिला !

            वस्तु कशी फेंकावी हें कळतांच फेंकण्याच्या निरनराळ्या वस्तूंचा-अधिक प्रभावी हत्यारांचा-शोध होऊं लागला.  दगडधोंडे व काठ्यालाठ्या त्याला अपुर्‍या वाटूं लागल्या.  आपलें भक्ष्य अधिक सहजतेनें मारतां यावें म्हणून घांसून घांसून अणकुचीदार काठी तो करूं लागला.  दगडांनासुध्दां धार लावून त्यांचे सुळके तो करी.  मृतपशूंचें कांतडें सोलून काढण्यासाठीं, तसेंच मांसखंड करण्यासाठीं या पाषाणी हत्यारांचा उपयोग मनुष्य करूं लागला.  स्वत:साठीं व कुटुंबातील इतरांच्यासाठीं तो अशा प्रकारें मांस तोडी.
           आणि अशाच रीतीनें हळूहळू प्रगति होत आजचीं वाफेचीं यंत्रें जन्मलीं.  विद्युद्यंत्रें जन्मलीं.  हे शोध लागणें ही गोष्ट आश्चर्याची नसून हे शोध लागायला इतकीं हजारों वर्षे लागलीं हें आश्चर्य होय.  वास्तविक चारपांचशें वर्षांतच हें शोध लागले पाहिजे होते.  परंतु यासंबंधीं पुढें बोलूं.  सध्यां मानवजातीच्या त्या आरंभींच्या प्रगतीसंबंधींच बोलूं.  हीं जीं पहिलीं ओबडधोबड हत्यारें मानवानें निर्मिलीं, त्यांच्या साहाय्यानें दोन गोष्टी त्याला करतां येऊं लागल्या.  स्वत:चें संरक्षण करणें व दुसर्‍यास मारणें.  परंतु आपल्या ह्या अगतिक व एकाकी प्रयत्नांनीं तो या दोन्ही बाबतींत फारशी प्रगति करूं शकला नाहीं.  आपणाहून अधिक सामर्थ्यसंपन्न अशी एकादी वस्तु त्याला पाहिजे होती ; त्या सामर्थ्यसंपन्न शक्तिचें साहाय्य त्याला हवें होतें.  'आणि अत्यंत महत्त्वाचा असा एक शोध लावण्यांत त्याला यश आलें.  मानवानें ईश्वराला निर्मिलें.  देवाचा किंवा अनेक देवांचा शोध लागला.
             देवाचा शोध कसा लागला याविषयीं नाना उपपत्ती आहेत.  परंतु सर्वांत अधिक शक्य अशी पुढील उपपत्ति वाटते.  मानवप्राणी स्वत:च्या छाया पाण्यांत बघत.  स्वप्नांत आपल्या मित्रांच्या आकृती ते बघत.  आपणां सर्वांस जणूं दोन शरीरें आहेत असें त्यांना वाटलें.  एक हें दैनंदिन इंद्रियगम्य शरीर, ज्याला आपण हातांनीं स्पर्श करतों; आणि विशिष्टच प्रसंगीं कधींकधीं दिसणारें व बहुधा नेहमीं अदृश्य असणारें असें तें दुसरें छायामय शरीर.  मनुष्य मरतो तेव्हां त्याचें तें स्थूल शरीर पुरलें जातें; परंतु त्याचें तें दुसरें छायामय शरीर नष्ट होत नाहीं.  तें स्वप्नांत आपणांस दिसतें, भेटतें.  तें छायामय शरीर कोठेंतरी जिवंत असलेंच पाहिजे.
          समजा, एकाद्या जातीजमातीचा प्रमुख मनुष्य मेला.  तो जिवंत होता तेव्हां त्याला सारे भीत ; परंतु आतां मेल्यावर तो अधिकच भीतिप्रद झाला.  कारण त्याचें तें छायाशरीर आतां अदृश्य असणार.  छायाशरीरधारी तो नायक कधीं येईल व हल्ला करील तें कळणारहि नाहीं.  आपण कदाचित् त्याला असंतुष्ट केलें तर काय होईल, काय न होईल, असें या दुबळ्या व दुर्दैवी मानवाला वाटे.


मराठा लाइट इन्फंट्रीचा गौरवशाली वारसा


मराठा लाइट इन्फंट्रीचा गौरवशाली वारसा -


- लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर
Maharashtra Times: Feb 4, 2018

भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात 'मराठा'ची स्थापना झाली. त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या. या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठे होते. दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते. त्यांना सोडविण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युतवेगाने तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाइट (विद्युतवेगाने काम करणारी) बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचवेळी सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर्स पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दाखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मराठा रेजिमेंटचे नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे (मरणोत्तर) या दोघांनाही मिळाला. घाडगे यांनी सिटा डे कॅस्टेलो येथे जर्मन मशिनगनधारी सैनिकांना कंठस्नान घातले. मात्र, छातीवर लागलेल्या गोळीमुळे त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर शिपाई नामदेव जाधव यांनी एकट्यानेच सेनिओ नदीच्या तीरावर पराक्रम गाजवत जर्मनीची दोन ठाणी ताब्यात घेतली.
 दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मराठा बटालियनने ब्रह्मदेशातही मोठा पराक्रम गाजवला. त्यांचा पराक्रम पाहून ब्रिटिशही थक्क झाले. ज्या मराठ्यांनी आपल्याला विजयश्री मिळवून दिली, त्यांचा पराक्रम पाहता आणखी अधिक काळ आपल्याला भारतावर सत्ता गाजवणे शक्य नाही, हे त्यांना कळून चुकले आणि त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यलढ्याशी मराठा बटालियनचा थेट संबंध नसला, तरी त्यांचे युद्धकौशल्य आपल्यावर भारी पडेल, याची जाणीव ब्रिटिशांना होणे यात मराठा बटालियनचे मोठे योगदान आहे. उत्तर व दक्षिण कोरिया युद्धातही मराठा बटालियनचे मोठे योगदान होते.

स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्ती संग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे सैनिक बेळगाव, वेंगुर्लामागे गोव्यात पायी गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दमण दीव येथेही गाजवला. १९६२च्या युद्धात सिक्कीममध्ये मराठाची तुकडी आघाडीवर होती. १९६५ च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती. पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार हा परिसर ओळखला जातो, त्या पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीरचक्र मिळाले होते. हडपसरमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला ठक्कर विहार हा परिसर ज्यांच्या नावे ओळखला जातो, त्यांनी मिझोराम नागालँडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले होते. १९७१ च्या युद्धात तत्कालिन पूर्व पाकिस्तानात मराठा लाइटच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या २२ मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला ढाक्यावर कब्जा केला. या विजयाचे श्रेय या तुकडीलाच जाते. त्याचवेळी लाहोरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.

काश्मीर असो वा अरूणाचल, राजस्थान असो वा सियाचिन अशी एकही सीमा नाही, जिथे मराठाची तुकडी तैनात नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेतही मराठाची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. गरिबी, मागासलेपणा, भ्रष्टाचार याचा जवळून अनुभव घेतलेले आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात, याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे.

भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल वाय. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली. अलिकडे २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही मराठाचेच कर्नल होते.

असा हा मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी, आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाचे दैवत आहे. बोल श्री शिवाजी महाराज की जय ही आमची युद्धघोषणा आहे. आपण शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच मराठा रेजिमेंटमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येकाला शिकवले जाते. बाकी चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमी कावा आणि युद्धकौशल्य त्यांच्याकडे असतेच, त्याच्या बळावरच मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे, आणि यापुढेही राहील.

अशीही परंपरा

सध्या ईशान्य भारतातील लष्कराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेत कार्यरत असलेल्या ब्रिगेडिअर संग्राम मोहिते यांच्यारूपाने साताऱ्याच्या मोहित्यांची सहावी पिढी लष्करात आणि मराठा लाइटमध्ये सेवा देत आहे. हे कुटुंब शिवछत्रपतींचे सरसेनापती हंसाजी हंबीरराव मोहित्यांचे वंशज आहेत. मराठाला २५० वर्ष होत असताना या कुटुंबाने १२० वर्षाहून अधिक काळ मराठामध्येच सेवा बजावली आहे. वीरचक्र विजेते कर्नल सदानंद साळुंके यांचा मुलगा ब्रिगेडिअर समीर देखील मराठामध्येच कार्यरत आहे. मला स्वत:ला सहा मराठाचे नेतृत्व करायला मिळाले त्यानंतर माझ्या मुलानेही याच तुकडीचे नेतृत्व केले. सध्या तो मराठाच्याच माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या मोहिमांत कार्यरत आहे.


सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

दृष्टी


दृष्टी


एका देवळाच्या मागे एक दलदलयुक्त तळे असते. त्यात खूप सुंदर कमळे उमललेली असतात. त्या कमळान्मुळे परिसर खूप सुंदर दिसत असतो. येणारा जाणारा प्रत्येक जण कमळांची प्रशंसा करत असतो.
एक दिवस त्यातील एक कमळ स्वतःची स्तुती ऐकून खूष होते. त्याचवेळी त्याच्या मनात येते मी इतके “सुंदर पण हे काय?! माझ्या आजूबाजूला इतकी घाण, अस्वच्छता. याने माझे सौंदर्य कमी होत आहे. आणि सारखा असाच विचार करून ते कमळ दुःखी होऊ लागते. मग ते देवाकडे तक्रार करते. देवा तू मला असं चिखलात का ढकललं? ते काही नाही तू मला लवकर एका सुंदर तळ्यात रहायला जागा दे. देव त्याला समजावतो पण ते कमळ काही ऐकत नाही.
मग देव त्या कमळाची रवानगी एका राजवाड्यातल्या स्वच्छ तळ्यात करतो. तिथे पण जाणारा येणारा प्रत्येक जण त्या कमळाची स्तुती करतो. अन तळे स्वच्छ असल्याने तिथली माणसे, राजपुत्र छानछान म्हणून त्या कमळाला हात लावून ओरबाडू लागतात. त्या कमळाला आता पूर्वीपेक्षा जास्त त्रास होतो. मग ते देवाकडे जाऊन क्षमा मागते. मग देव त्याला समजावतो अरे तुझ्या आजूबाजूला चिखल हे तुझ्या संरक्षणार्थ व हिताचे आहे. कुठलीही गोष्ट उगाच नसते. कमळाला ते पटते आणि ते पूर्वीसारखे जुन्या तळ्यात आनंदाने राहू लागते.
थोडा विचार केला तर आपल्या आजूबाजूचे होणारे दुःख, त्रास हे आपले बळ वाढवणारे व हिताचेच असते. पण अहंकारामुळे आपण ते दुर्लक्षितो. थोडे आत्मनिरीक्षण, संयम बाळगला तर अशा दुःखरुपी चिखलात पण आपण आनंदाने व समाधानाने कमळासारखे दिमाखात उभे राहू शकतो.
तात्पर्य:- " दृष्टी दूषित असेल तर अमृताचे सेवन केले तरी त्याचा योग्य परिणाम दिसून येणार नाही. म्हणून दृष्टी अंतत: हेतू शुद्ध असावयास हवा, तरच सुयोग्य परिणाम अनुभवास येईल.


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा