मानव
विस्तवाचा शोध लागला. कांतडीं पाघरूं लागले. त्याचबरोबर प्रकट वाणीहि जन्मली. बोलायला लागण्यापूर्वी ते आधीं गाऊं लागलें असावेत. ज्या वेळेस त्यांना अस्वस्थ व असुखी वाटत असे त्या
वेळेसे ते सारे एकदम दु:खानें किंचाळत ; जेव्हां एकादी सुंदरशी शिकार त्यांना मिळे,
किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश पडे, तेव्हां ते आनंदानें आवाज करीत. हळूहळू या सर्वांतून अतुटक असें 'क' वर्गांतील गान
निर्माण झालें. त्यांच्यांतील जे अधिक प्रतिभावान्
व प्रगतिशील होते ते आपल्या मनांतील नवीनच उगवलेले विचार अधिक स्पष्टतेनें प्रकट करूं
लागले. आपल्या आवाजांत भर घालून, त्याला कांहीं
जोडून, ते विचार प्रकट करूं पहात. अशा रीतीनें
मानवी भाषेंतील पहिली अक्षरें जन्मास आलीं.
वाणीमुळें ज्याप्रमाणें
मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपासून पृथक् झाला, त्याचप्रमाणें हत्यारांच्या व नानाविध
यंत्राच्या शोधामुळेंहि हा गुहेंतील मानवप्राणीं मानवेतर प्राण्यांपासून निराळा झाला. आणि पहिलें यंत्र म्हणजे आपला हात. आपल्या या हातानें फेंकतां येतें हा अगदीं आरंभींचा
अति महत्त्वाचा शोध. हातानें जवळच नव्हे, तर
लांब अंतरावरसुध्दां दगड मारतां येतो हा शोध ज्या आदि काळांतील एडिसननें लाविला त्याचें
मानवजातीवर फार ॠण आहे. तो अज्ञात असा एडिसन
अत्यन्त बुध्दिमान् असला पाहिजे. संकृति व
सुधारणा त्याची अत्यंत ॠणी आहे. मारण्याची
जी सुंदर कला तींत त्या वेळेपासून मनुष्य इतर प्राण्यांच्या सदैव पुढें राहिला !
वस्तु कशी फेंकावी
हें कळतांच फेंकण्याच्या निरनराळ्या वस्तूंचा-अधिक प्रभावी हत्यारांचा-शोध होऊं लागला. दगडधोंडे व काठ्यालाठ्या त्याला अपुर्या वाटूं
लागल्या. आपलें भक्ष्य अधिक सहजतेनें मारतां
यावें म्हणून घांसून घांसून अणकुचीदार काठी तो करूं लागला. दगडांनासुध्दां धार लावून त्यांचे सुळके तो करी. मृतपशूंचें कांतडें सोलून काढण्यासाठीं, तसेंच मांसखंड
करण्यासाठीं या पाषाणी हत्यारांचा उपयोग मनुष्य करूं लागला. स्वत:साठीं व कुटुंबातील इतरांच्यासाठीं तो अशा
प्रकारें मांस तोडी.





