ओढ निसर्गाची
पावसाळा संपता संपता उन पावसांचा खेळ सुरु होतो. थोडयाशा पावसाने भिजलेले रस्ते, पायवाटा उन्हात ओलसर सुक्या होतात. खेडयातील हया पायवाटा तर एवढया सुंदर वाटतात, की अगदी भान हरपून जाते.
ओठी नकळत मराठी गाणं येते.
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा......
माझ्या मनातला का तेथे असेल रावा.......
आपल्याला गुलाब, जाई, मोगरा, केवडा तसेच जास्वंद, तगर, रातराणी, शेवंती ही फुले परिचित असतात. पण अशी असंख्य निनावी फुले रानावनात फुलत असतात.
मला त्यांची नावे शोधण्यात
रस नाही. पण त्यांच सौंदर्य न्याहाळण्यात आनंद वाटतो. निरोपयोगी गवत म्हणून वाढलेली
वनस्पती इतकी सौंदर्य असू शकते. मुळात निसर्गात असलेली कोणतीही वनस्पती निरोपयोगी
नसतेच. हे फक्त माणसाला उपयोग नसतो किंवा माहित नसतो म्हणून आपण निरोपयोगी ठरवतो.
अशा रंगबेरंगी वनस्पतींच्या फुलांनीच तर निसर्ग बहरतो आणि आपल्याला भावतो. संसाराच्या रहाटगाडग्यात अस्वस्थता, ताण घालवायला निसर्ग हवाच. अशाच काही निनावी वनस्तींची टिपलेली छायाचित्रे. पिवळया पाकळयांचा मध्ये मातकट पुंकेसर असलेली रानभेंडीचे फुल न्याहाळताना अगदी भारीच वाटतो.
त्यातच कुरडूच्या फुलांचा मनोरा डोलत असतो. पांढरत काहीसा लालसर छटा असलेला तुरा.
छोटी छोटी पिवळी फुलांचा हिरव्या पानांवर पसरलेला सडा.
तर कुठे तेरडयाचा गुलाबी रंग व्यापलेला. मध्येच निळया पांढऱ्या फुलांनी ठिपक्या सारख्या सजवलेला साज.
अगदी मनमोहकच. बधा एकदा निरखुन तुम्हालाही त्याची अनुभूती येईल. व्हा समरस निसर्गाशी. संवाद साधा निसर्गाशी. आणि आम्हालाही कळवा.












