Pages

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

कंडक्टर....


मला भावला, म्हणून पाठवला...

कंडक्टर....

आज बऱ्याच दिवसांनंतर बार्शी ते पांगरी असा एस. टी. चा प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर, तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहून बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातून माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले, आता कंडक्टर येऊन तणतण करतोय की काय; पण झाले उलटेच!
त्या दरवाज्यातून काका, मामा, दादा थोडी जागा द्या! असं म्हणत एक ऐन पंचविशीतले कंडक्टर गाडीत चढले.
गाडी तर माणसांनी भरून वाहत होती. अशात कंडक्टर सीट तरी थोडीच रिकामी राहणार?
तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या! कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या. तेवढ्यात कंडक्टर बोलले, "बसा आज्जी, मी उभा राहतो". मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशीनवर बटने दाबून लगेच तिकीट फाडून ते म्हणाले, "द्या तेवीस रूपये"! माझ्याकडे तर बरोब्बर बावीस रूपयेच होते. एक रूपया शोधून सापडेना! तेव्हा कंडक्टर मला म्हणाले, "राहू द्या, नसला तर मी भरतो"!
त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहून मी सुखावलो. एकूणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमीटरच्या प्रवासात जाणवली. इथून तिथून माझ्यासोबतच उभे राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना "साहेब, एक सेल्फी काढू द्याल का, तुमच्या सोबत" असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले!
मी सर्वांना सांगितले, "असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो, म्हणून सेल्फी काढतोय!" सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रवासाचा शीण निघून गेला. गाडीतून खाली उतरून दरवाजा ढकलला, तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जीवन प्रवासात असाच आनंद देत-घेत आलोय म्हणूनच या प्रेमाचा हकदार झालोय!
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल, पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस. टी. ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, क्लीनर्सचे खूप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहून जास्त ग्रामीण भारत यांच्याच जीवावर इकडून तिकडं अन् तिकडून इकडं फिरतोय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजूनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला!
तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यांतून गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला, तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वाहायचे आणि यातूनही प्रवासी देवो भवः म्हणायचे!
खरंच हे ग्रेट आहे.
विषय एक रुपयाच्या मदतीचा नव्हता, ती करण्यामागच्या वृत्तीचा होता.
विषय सीटवर बसण्याचा नव्हता, तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता.
विषय हक्काच्या जागेचा नव्हता, तर हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता.
विषय तिकिटाचा नव्हता, तर ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता.
विषय सेल्फीचा नव्हता, तर आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता.
विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, तर एका माणसाच्या माणुसकीचा होता!
                                           
                                          लेखक अनामिक 


मायेचा ओलावा


मायेचा  ओलावा

सहलीची सूचना वर्गावर्गातून फिरली होती.सहलीला येणा-या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांकडे नावे येत्या शनिवार पर्यंत द्यायचीहोती.सहलीला प्रत्येकी दोन हजार रुपये खर्च येणार होता.शाळेतील मुलामुलींनी आपापली नावे द्यायला सुरुवात केली होती.सातवीतील गौरीची सहलीला जायची खूप ईच्छा होती.
सहलीला जाऊन नवीन ठिकाणांची माहिती मिळवावी.प्रेक्षणीय स्थळे डोळे पाहण्याचा आनंद घ्यावा असे तिला वाटत होते.शाळेतून घरी आल्यावर तिने आईजवळ सहलीला जायचा हट्ट धरला.
आई,मला सहलीला जायचं आहे.माझ्या वर्गातील सर्वच मुलेमुली जात आहेत.” असा सूर काढत गौरी हिरमुसून बसली.आजपर्यंत तिने कधीच काही आग्रहाने मागितले नव्हते.जे खायला मिळाले ते खाल्ले.
जसे कपडे आणले तसे कपडे घातले.दुस-यांनी वापरून टाकलेले कपडेसुध्दा आनंदाने परिधान केले.जुन्या वह्यांची उरलेली पाने शिवून अभ्यासासाठी वापरली.बाजारातील जुन्या पुस्तकांना कधीच नावे ठेवली नाहीत.
वर्गातील,शाळेतील मुलामुलींशी अभ्यास सोडून इतर बाबतीत कधी स्पर्धा केली नाही.शाळेतील सर्वात हुशार व समंजस विद्यार्थीनी म्हणून शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी तिची पाठ थोपटली होती.आई काळजीत पडली.
दोन हजारांची सोय कशी लावायची याचा विचार करू लागली.मोलकरीणीचे काम करून कसेबसे पोट भरता येते.शिल्लक चोचले पुरवता येत नाहीत.हे तिला ठाऊक होते.एकुलत्या एका लेकीला सहलीला पाठवायचा निर्धार तिने केला होता.लेकीचा बाप जिवंत असता तर त्याने गौरीला सहलीला पाठवलेच असते.
एक-दोन घरी हातउसणे मागितले पण काही फायदा झाला नाही.पैशांची काहीच सोय लागत नव्हती.काय करावे तिला काहीच सुचत नव्हते.घरातील लाकडाच्या जुन्या पेटीजवळ ती हतबल होऊन बसली.गौरीच्या आईला कोणताच उपाय सापडत नव्हता.
नवरा देवाघरी जाऊन आठ वर्षे उलटली होती पण चार सोन्याचे मणी अन् एक पदकाचे मंगळसूत्र तिच्या डोळ्यासमोर तरळले.तिने पेटीतून मंगळसूत्र काढले.साडीचा पदर कमरेत खोसला.लगबगीने सोनाराचे दुकान गाठले.
सौभाग्याची आठवण म्हणून जपलेली वस्तू काळजावर दगड ठेऊन मोडली अन् दोन हजार रुपये आणले.सकाळी गौरीला शाळेत जाताना पैशे द्यायचे असे तिने ठरवले.सकाळ झाली.कामाला जाण्याआधी आईने गौरीच्या हातात दोन हजार रुपये ठेवले.
आई कामाला निघून गेली.गौरीला पैसे मिळाले.तिला खूप आनंद झाला.आईने एवढे पैसे कुठून आणले असतील? हा प्रश्न तिला पडला. आपणास सहलीला जायला मिळणार असल्याने तिने भरभर कामे आटोपून शाळेत जायला निघाली.
तिने नीशाला शाळेत सोबत चालण्यासाठी आवाज दिला.दोघी शाळेकडे निघाल्या.सहलीला येत असल्याची बातमी तिने नीशाला सांगितली.नीशालाही आनंद झाला.”काल संध्याकाळी तुझी आई माझ्या घरी आली होती.माझ्या बाबांनी तुझ्या आईला पैसे दिले.”नीशाचे बोलणे ऐकून गौरी सुन्न झाली.
गौरीच्या अंगातील त्राण संपला.डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले.नीशाला शाळेत जायचे पुढे जायला सांगून ती मागे परतली.थेट सोनार काकाच्या घरी पोचली.
काकांशी अदबीने बोलली.चौकशी केली.मंगळसूत्र मोडून आईने आपल्यासाठी पैसे आणल्याचे तिच्या लक्षात आले.आईचे समर्पण,त्याग समजण्याइतकी ती मोठी झाली होती.
तिने विनवणी करून मंगळसूत्र परत घेतले.पैसे परत केले.संवेदनशील गौरीचा समंजसपणा पाहून काकांनाही नवल वाटले.शाळा आटोपून गौरी घरी आली.आई स्वयंपाक करत होती.भाजी शिजली होती.
भाकरी थापणे सुरू होते.तव्यावरची भाकर काढली. चुलीतील आर बाहेर काढला.भाकर शेकायला ठेवत गौरीला विचारू लागली.”भरलेस काय गं,सहलीचे पैसे? कधी जाणार आमची लाडोबाई सहलीला?” गौरीने आईकडे नजर टाकली.तिच्या पापण्या नकळत भिजल्या.आपसुकच ती आईच्या कुशीत शिरली.रडायला लागली.
“का रडतेस,काय झालं?” असे विचारताच तीने सहल रद्द झाली म्हणून सांगितले.
आईने पदराने गौरीची आसवे पुसली.
गौरीने रडत रडत आईचे मंगळसूत्र आईच्या हातावर ठेवले.हातात मंगळसूत्र बघून आईने गौरीला घट्ट मिठी मारली.
दोघीही ‘मायलेकी एकमेकींना घट्ट पकडून रडू लागल्या.



शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका


“उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका !”

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत अंथरुणात लोळत पडणे, मग पुढे चार वाजता आंघोळ करणे, संध्याकाळी सहा वाजता जेवणे (या दरम्यान मोबाईल हाताशी असतोच), रात्री साडे आठ-नऊ च्या सुमारास घराबाहेर पडणे आणि साधारणपणे पहाटे तीन-चार च्या सुमारास घरी येणे अशा दिनक्रमात ही मुलं-मुली जगतात. “दहावीपर्यंत बरं चाललं होतं पण काॅलेज सुरू झाल्यापासून सगळीच अवस्था बिकट झाली असा सगळ्या पालकांचा सूर असतो.

ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच सेमिस्टर परीक्षेत सगळ्या विषयांमध्ये नापास झालेल्या एका मुलाने मागच्या सहा महिन्यांमध्ये क्लासेसच्या नावाखाली दीड लाख रूपये पालकांकडून घेतले आणि क्लासेस न लावताच ते पैसे गर्लफ्रेंडवर खर्च केले. शिवाय पाॅकेटमनी च्या नावाखाली जवळपास ७५ हजार रूपये घेतले. पालकांनी एवढा खर्च केलाच, शिवाय काॅलेजची फी भरली, ती वेगळीच. एका मध्यमवर्गीय कुटुंबात हे घडतं, यावर आता विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. 

डोक्यावर रंगवलेल्या केसांचं टोपलं, विराट कोहलीसारखी राखलेली दाढी, छप्पन्न सेंटीमीटर (इंच नव्हे) छाती, भडक कपडे, फाटक्या जीन्स, पायात मरतुकड्या स्लीपर्स, तोंडात मावा किंवा सिगारेट धरलेली अशी तीन-तीन पोरं एकाच स्कूटरवरून मोठ्यानं हार्न वाजवत गावभर उंडारत फिरत असलेली आपल्यापैकी अनेकांना दिसत असतील. चार दिडक्यासुद्धा कमावण्याची अक्कल नाही पण तरीही गाड्या उडवत फिरणारी टाळकी सध्या उदंड झाली आहेत. अशाच एका मुलानं आज स्टंट करण्याच्या नादात एका गर्भवती महिलेला जोरात धडक दिली. त्या मुलाच्या मागे एक तंग कपड्यांतली मुलगी नको तितकी चिकटून बसलेली होती, आणि बहुतेक दोघेही भर दिवसा झिंगलेले होते. आजूबाजूची माणसं धावत येईपर्यंत दोघेही पसार झाले.

पोकर खेळणे, अनिर्बंध नाईट लाईफ जगणे, बेटींग करणे यात गुंतून पडलेली अनेक मुलं-मुली पाहण्यात येतात. एखादी वीस-बावीस वर्षांची मुलगी दिवसाकाठी पंधरा-वीस सिगारेटी व्यवस्थित ओढते, हे आता कॅज्युअल झालं आहे. हुक्का पार्लर्समध्ये १७-१८ वर्षांची मुलं-मुली दिवस घालवताना दिसत आहेत. दिवसभरात खाण्यापिण्यावर, पेट्रोलवर, व्यसनांवर दोन-तीनशे रूपये तर सहजच उडवणाऱ्या मुलां-मुलींची संख्या समाजात वेगाने वाढते आहे, यावर पालकांनी सीरियसली विचार करण्याची गरज आहे.

खरं तर सांगू नये, पण सांगतो. पालक हाॅटेलमधली जेवणं, खरेदी, वाढदिवस, परदेशी सहली यात रस घेतात, पण मुलांच्या प्रश्नांकडे जितकं आणि जसं लक्ष द्यायला हवं, तसं देत नाहीत. माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबाने दुबई ट्रीपसाठी साडेतीन लाख रूपये खर्च केले, पण मुलगी सलग दोन वर्षं बारावीत नापास झाली, काॅलेजमधल्या एका मित्राबरोबर लग्न करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला, घरातून अनेकदा पैसे चोरले, घरचे दागिने गायब केले, पण तिच्या काॅलेजमधल्या शिक्षकांना भेटायला जाण्यासाठी पालकांकडे वेळ नाही आणि काऊन्सेलरची अपाॅईंटमेंट म्हणजे वायफळ खर्च असं त्यांना वाटतं.

आपण आपल्या मुलांना गाडी, मोबाईल फोन, लॅपटाॅप, इंटरनेट, स्वतंत्र खोली, पाॅकेटमनी या गोष्टी का आणि किती प्रमाणात देतो, यावर पालक काही विचार करतात का? पुष्कळ पालकांकडे या प्रश्नांची उत्तरंच नसतात. आधुनिक आणि तथाकथित ‘सुजाण पालक होण्याच्या शर्यतीत भावना,संस्कार मागे पडतात आणि या वस्तूच पुढे जातात.
इन्स्टंट गोष्टींचा जमाना आला आहे. मुलं आणि पालक दोघांनाही सगळ्याच गोष्टी इन्स्टंट आणि रेडिमेड हव्या असतात. त्या तशा मिळत नाहीत, म्हणूनच मग शेवटी फरफट सुरू होते आणि सगळं कुटुंबच अस्वस्थ होतं. सगळ्या गोष्टींना पैशाची आणि श्रीमंतीची गणितं लागू करण्याचा प्रयत्न पालक जाणते-अजाणतेपणी करायला लागतात, तिथंच त्यांच्या मुलांमध्येही हीच वृत्ती रूजली तर, त्यात नवल वाटण्याचं कारणच नाही.

शेवटी काय, उंबऱ्याच्या आतलं जग बिघडलं की, सगळंच बिघडतं..! वेळीच शहाणपण आलेलं l


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा