Pages

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

"बाप"


"बाप"


मॅक दाते नावाची एक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट मयुरेशनी फेसबुक वर एक्सेप्ट केली. रोजचे बोलणे चालू झाले.
हाय- हॅलो चे बोलणे काही दिवसातच पर्सनल प्रॉब्लेम्स शेअर करण्यापर्यंत वाढले आणि फेसबुकवर एक घट्ट नाते मयुरेशला मिळाले.

मयुरेश - साधारण विशी - बाविशितला मुलगा. खूप काही करण्याची तडफड, जिद्द पण त्याच बरोबर काहीसा उद्धट. सोशल जग एवढं की घर आणि कुटुंब ह्यांना वेळ न देऊ शकणारा. बापाला कधीही समजून न घेणारा. सतत आरे ला कारे करणारा हा तरुण.

मॅक दाते - ५०शितला एक पुरुष पण तरीही आजच्या तरुण पिढी प्रमाणे सोशल असणारा. इन्फोसिस मध्ये टॉप चा इंजिनिअर.

कदाचित ही वयातली तफावत सुद्धा मयुरेशला त्याच्या जवळ खेचत असेल. मॅकला मयुरेश समजायला मदत करत असेल. कारण काहीही असो; अल्पावधीत ते दोघे खास झाले हे मात्र खरे!

मयुरेशला काहीही नवीन करायचे असो; तो पहिले मॅकशी चर्चा करणार मग घरी वडिलांकडे पैसे मागणार. मग ते जिम असो, चेसचा क्लास, मुवी की अगदी एखादी पार्टी असो.

फेसबुकच्या फ्रेंडशी मॅकशी बोलणं झालं की बाबाही पटकन होकार देतात हे मयुरेशला कळु लागलं परिणामी तो मॅक शी अजून जास्त जवळीक साधू लागला.

११ फेब, २०१७ चा दिवस. संपूर्ण जग आपापल्या व्हॅलेंटाईन बरोबर १४ फेब प्लॅन करत असते. एखादीला विचारावे कसे हा प्रयत्न करत असते तेंव्हा मयुरेश मागे कसा असेल???

त्याने ही गोष्ट मॅकला सांगायचे ठरवले. ठरल्या वेळेला फेसबुकवर येऊन मयुरेश मॅक शी गिरिजा बद्दल सांगितले. पहिले खूप वेळ काहीच रिप्लाय आला नाही. बिझी? बिझी? म्हणून ४ मेसेज गेले तेंव्हा कुठे मॅक चा रिप्लाय आला.

गो अहेड. घाबरु नको. दिल खोलके रख मेरे शेर. वर एखाद दोन कॅफे ची नावेही सजेस्ट केली. दिल खुष. थॅन्क्स म्हणून; गिरिजाला विचारायचा निर्धार करून मयुरेश ऑफ लाईन जातो.

दुसऱ्या दिवशी बाबांना व्हॅलेंटाईन डे साठी पैसे मागतो तोच बाबा म्हणतात; काय गरज?? अभ्यास करा.. फालतू पार्ट्या. कसली प्रेम करता?? कोण आहे मुलगी सांग.. घरी घेऊन ये. हे असले बाहेर भटकणे बरोबर नाही.

तोच एक भडका उडतो. "काय बाबा; फालतू आहात तुम्ही. आमचं वय आहे सगळं एन्जॉय करायचं. इथे एक गोष्ट मिळत नाही प्रेमाने .. लगेच.."
"हो ना; चेस, जिम साठी भिकाच मागतोस ना जसा. या घरात राहीचे असेल तर नीट बोलायचे"
"जातो हे घर सोडून. तुमच्यापेक्षा तो मॅक बरा. तुमच्याच वयाचा. पण बघा कसे फेसबुक वापरतो. एंकरेज करतो. सतत नाही नाही म्हणत. नाहीतर तुम्ही. पिढी बरोबर चालणे माहीत नाही का काही नाही... हाड!"
"हो??? कसा दिसतो रे हा मॅक? काय करतो काय??
मयुरेश एकदम ऐटीत सांगतो; "इन्फोसिस ला आहे. प्रोफाइल पिक्चर नाही ठेवला आहे सो माहीत नाही कसा दिसतो. पण विचार जुळतात. विचार जुळायला चेहरा माहीत असणं गरजेचं थोडी असते.. काय?"
बाबा शांत होऊन; " हो तर, ते पाहतोच आहे की. पोटचा गोळा पण एक विचार जुळतो आहे का बघ. काय आडनाव या मॅक चे? ख्रिसचन वाटतो."
"नाही, कोकणस्थ आहे. दाते आहे. आपलाच. सेम आडनाव... मॅक दाते. "
"दाते असून, पन्नाशीच्या आसपास असून हे असले विचार? फुस लावतो तुला??"
"तुम्हाला फुस च वाटणार. पिढी बरोबर बदलणे आहे अहो ते. सगळ्यांना नाही जमत..."
"काय पिढी पिढी बोलतो आहेस रे सारखा. आम्ही जन्माला घातलं म्हणून आली ही तुमची पिढी. त्याचीच भीती दाखवतो सारखा? आहे काय तुमच्या पिढीत?? सतत अर्ध्या चड्या घालून हिंडायचे, हा मित्र - तो मित्र. घरात पाय टिकतात का तुमचे??
"झाले चालू.." " हो.. ऐक. घरात चकार शब्द बोलायचा नाही. सतत मोबाईल, प्रोजेक्ट, मित्र. सतत बाहेरचे लोक. ह्यात तू; तुझी पिढी एवढे गुरफटला आहात की घरच्यांना काय हवं आणि नेमके तुम्हाला काय हवे कळणार कसे रे??? तो मॅक ढीग गप्पा मारेल. पैसे घ्यायला तर बाप लागतो ना?? आणि एवढा मूर्ख झाला आहेस तू ह्या बाहेरच्या जगात सतत राहून की लोकांच्या गर्दीत घरच्यांनाही ओळखत नाहीस तू..."
"काहीही बाबा. डोळे दिलेत मला देवांनी.. ओळखणार कसा नाही.. मुळात.."
"हो? डोळे दिलेत?? मग ओळखले मॅकला? मॅक दाते.. आपल्यातलाच.. सेम आडनाव. इन्फोसिस. पन्नाशीच्या आसपास.. वर तोंड करून सांगतोस.."
मयुरेश आवाक होऊन; "बाबा....!"
एका क्षणात डोळे पाणावतात. " काय सांगू? अवाक्षर बोलत नाहीस घरात. बाप वडीलधारी असला तरी मित्र ही असतो. एवढी तर तुमची पिढी माहीत आहे मला. अंगीकारले आहे मी. पण तू नवी पिढी करत ह्या मित्राला विसरलास.. काय करणार मग?? केलं लॉग इन फेसबुकला. म्हंटले इथून जाणून घेऊ मुलाला. तू एवढेही डोके नाही लावले की आपण जेंव्हा जेंव्हा लॅपटॉप उघडतो तेंव्हा तेंव्हा वडील मोबाईल घेऊन बसतात. तेवढेही निरीक्षण नाही घरच्यांचे. सगळी उमेद दिली. आवडले मुलाचे विचार. गिरिजा बद्दल सांगितलस तेंव्हा आधी तिची प्रोफाइल चेक केली. काय करते मुलगी; कशी दिसते. मग तुला रिप्लाय दिला. काय दुर्दैव आहे हे की मुलाचा वेळ मिळायला फेसबुकचा आधार घ्यावा लागला... "
मयुरेश रडू आवरत; " सॉरी बाबा. "
प्रेमाने जवळ घेत बाबा एकच सांगतात मयुरेश ला -
"बेटा, कोणीही बाहेरचं तुला समजून घेणार नाही का नवी उमेद देणार नाही. जगात फक्त दोनच व्यक्ती ते काम आपलं समजून करतात एक गुरू आणि दुसरं .... ' घर '!!!"
मयुरेश मिठी मारत " मी नेहमी लक्षात ठेवीन बाबा."
बाबा हसत; " बाकी काही नाही एवढं लक्षात ठेव... ' हम तुम्हारे बाप हैं!"...

दोघं हसत हसत गिरिजाचे फोटो बघतात. फेसबुकवर नाही. मयुरेश च्या मोबाईल मधले...!

- अनुराज.


क्षणीक मोह


क्षणीक मोह

एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.
कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.
पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.
पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले, "भाऊ...!!"
तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."
कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?" पुजारीबाबा हो म्हणाले.
त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.
पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''
🌀 तात्पर्य ::~
स्वार्थ,मोह हा वाईट असतो*, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो.त्यामुळे नेहमी प्रामाणिक रहा.


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा