कारण घाम गळत नाही
लहानपणी शाळेत जाण्यासाठी अनवाणी चार पाच
किलोमिटर डोंगर दऱ्यातून, काटयाकुटयातून पाऊलवाटेन जाव लागे. घाम गळत होता. खिशातल्या
मळकट रुमालाने पुसला जायचा. रुमालाचा रंग ही बहुधा दाट असायचा. कारण मळला हे लवकर कळू
नये म्हणून.
आता मी ऑफीसला जातो. बस मधून, लोकल मधून,
कार मधून किंवा स्वत:च्या वाहनातून. आता घाम गळत नाही. कपाळावरचा दोन थेंब घाम लगेच
पुसला जातो. कपाळावरच्या घामाचे दोन थेंब माणसाला गबाळा ठरवतात. खिशातल्या रुमालाचा
रंग पांढरा आहे. रोज धूतला जातो.
शाळेत जाताना शाळेचा ड्रेस एकच असल्याने सांभाळून
ठेवला जायचा. पितळेच्या तांब्यात निखारे भरुन तो शर्टवर फिरवला की झाली कडक इस्त्री.
आज मी ऑफीसला जाताना ऋतु नुसार कपडे वापरतो.
उन्हाळयात पांढरे कपडे, पावसाळयात दाट रंगाचे कपडे. कपडयांना इस्त्री लाँडरीत होते.
कारण मी घाम गाळत नाही.
चालून
चालून पायाची कातडी इतकी जाड व्हायची की कोणत्याही काटयाला भीक घालत नव्हती. आज मी
वेगवेगळया चप्पल घालतो. टॉयलेटसाठी वेगळी, थोडया अंतरावर जाण्यासाठी निराळी, ऑफीससाठी
निराळी आणि हो खास कार्यक्रमासाठी निराळी.
पोटच्या खळगीसाठी घाम गाळून रात्री निवांत
झोप येत होती. आज पोटाच्या घेरासाठी व्यायामशाळेत पैसे देऊन घाम गाळावा लागतो. त्याचाही
फारसा उपयोग होत नाही. मग विविध औषधे, गोळया, डायटींग करावा लागतो. पुर्वी पैसा कमी
असल्याने चैनीचे पदार्थ मिळत नसत. जीभेचे चोचले पुरवायला नव्हे तर पोट भरायला अन्न्
खात होतो. आज चव बघुन जेवतो. ताव मारतो.
घाम गाळल्यामूळे सडकून भूक लागायची.
भूकेला चव नसायची. मीठ भाकरी पर्णब्रम्ह होते. भरल्या पोटी शांत झोप लागायची.
आज ऑफीसमधल्या चकचकीत वातावरणात घाम
गळत नाही. एसीत तर मूळीच नाही. रात्री शांत झोप लागत नाही. नुसता डोकयाला ताप. पोटाचा
घेर मात्र सुटला आणि डोक्याचा ताण नव्हे टेन्शन मात्र वाढले. हो. हल्ली मी मराठी शब्दापेक्षा
इंग्लिश शब्दृ नेमका चपखल बसतो. टेन्श्न म्हटले की जरा जास्तच भावना पोहोचतात. मग काय
टेन्शनलाही उपाय आहेतच की, गुत्ता, बार.
छे छे खरच मी काय कमावल? की गमावल.
होय ! मी घाम गमावला.
एस.एस. मणवे


