देव दिवाळी
खरे तर सण हे आनन्दासाठीच साजरे केले जातात. सध्या दिवाळी म्हणजे दिवाळ असच काहीस लोक बोलत असतात. देव दिवाळी शहरात साजरी केली जात नाही. पण गावात साजरी केली जाते.
माझे बालपण कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील गावातले . त्याकाळी गावात घर घरात माणसे असायची, म्हणजे घरात माणसेच राहतात, पण सध्या अशा गावातून केवळ वयस्क, म्हातारे, निवृत्त लोकच पाहावयास मिळतात. तर सांगायचं असं कि, गावात बरीच माणसे असायचीय, पोरेटोरे, शेतकरी, बाया माणसे ई. करती माणसे बहुतांश मुंबईत असायची. त्यांची फेरी शिमगा, गणपती किंवा घरातील काही समारंभ अथवा दुःख याकरिता गावी यायची.
आम्हा मुलाना आदल्या दिवसापासून उत्साह असायचा. या दिवसात थंडी चांगलीच पडलेली असायची. आदल्या संध्याकाळी आम्ही अंगणात गप्पा मारता मारता पैज लावायचो कि उद्या जो कोणी लवकर उठून पूजा करेल त्याला ५ - ५ बोरे इतरांनी द्यायची. हा, आता बोरे म्हणजे झाडाची बोरे नव्हेत, तर या दिवसात आमच्या कडे आजच्या सारखा फराळ वगैरे भानगड नसायची. तर शेतातील तांदळापासून घरीच तयार करण्यात आलेले पोहे आणि गहू अगर तांदळाच्या पिठात शेतातून काढलेले तीळ टाकून गोल आकाराची बोरे तयार केली जायची. रुचकर व आरोग्यदायी. तीही सकाळी उठून आजी करत असे.
रात्री हुरहुरत्या उत्साहाने झोपी जायचो. सकाळी पहिल्या कोंबड्याला आजी उठायची. पहिल्या कोंबड्याला म्हणजे, कोंबडा सकाळी ४ ते ४. ३० ला पहिल्यांदा बांग देतो, नंतर दुसरा म्हणजे ५. ते ५. ३० ला नंतर ६ते चांगले उजाडून बाहेर जाई पर्यंत, कोंबडा आरवण्यासाठी खास राखून ठेवला जायचा. पहिल्या कोंबड्याला जाग यायची, तो पर्यंत आजीने उठून चूल पेटवलेली असायची. शेकत शेकत पाणी गरम व्हायचे, आणि मग पटकन आंघोळ करून स्वारी तयार..
घरच्या देवाला ओवाळून नमस्कार करायचा. नंतर कंदिलाच्या प्रकाशात गोठ्यात जायचे, गुरेही ओळखीचे माणूस बघून आळोखे पिळोखे देत उभे राहाची. थोडासा हू हू करायची. गाई बैलांच्या शिंगाला तेल लावून आरती ओवाळायची, ज्यांच्या जीवावर आपण शेती करतो, पोट भरतो त्यांच्या पायी कृतज्ञता. ओवाळून झाल्या नंतर बाहेर येऊन तोंडाला दोन्ही हातांची कोण करून जोरात ओरडायचं इडा पीडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे.
आवाज ऐकून शेजारची मित्र मंडळी जागी व्हायची. काहींची आंघोळ सुरु असायची, माझा आवाज ऐकल्यावर त्यांची घाई व्हायची. करता करता सगळे जागे व्हायचे. आणि मग मी जिंकल्याने सर्वांकडच्या बोरे मला मिळायची. जिंकण्याची मजा वाटायची.
कोकणात पैसे अडका कमीच असायचा पण कमी पैश्यातही जी मजा यायची ती आताच्या दिवाळ सणात येत नाही, केवळ खर्च नसून आनंद असायचा.
आवाज ऐकून शेजारची मित्र मंडळी जागी व्हायची. काहींची आंघोळ सुरु असायची, माझा आवाज ऐकल्यावर त्यांची घाई व्हायची. करता करता सगळे जागे व्हायचे. आणि मग मी जिंकल्याने सर्वांकडच्या बोरे मला मिळायची. जिंकण्याची मजा वाटायची.
कोकणात पैसे अडका कमीच असायचा पण कमी पैश्यातही जी मजा यायची ती आताच्या दिवाळ सणात येत नाही, केवळ खर्च नसून आनंद असायचा.